Manmad-Indore Railway Project: मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. बाळापूर ते पुरमेपाडा या मार्गावर येणाऱ्या गावातील शेतकरी अल्प मोबदल्यामुळे नाराज आहेत. त्यांनी शासनाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, धुळे: मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. बाळापूर ते पुरमेपाडापर्यंतची रेल्वेलाइन टाकताना धुळे तालुक्यातील बाळापूर, वडजाई, पिंपरी, सावळदे, अवधान, लळिंग, राणमाळा, आर्वी आणि पुरमेपाडा गावातील शेती बाधित होणार आहे. परंतु, अल्प मोबादला दिला जात असल्याने शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी रोहन कुवर यांना निवेदन देत आपल्या मागण्या मांडल्या. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, विश्वासात घेतले जात नाही, तोपर्यंत शासनाच्या कुठल्याच कर्मचाऱ्याला, प्रतिनिधीला तसेच भूसंपादन प्रक्रियेला शेतकरी सहकार्य करणार नाहीत, अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांना मांडली.
यावेळी मनमाड-इंदूर (बाळापूर ते पुरमेपाडा) रेल्वेमार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे जयेश चौधरी, डॉ. प्रशांत साळुंखे, डॉ. योगेश गवळी, सुधाकर पाटील, भूषण पाटील, विशाल तिवारी, अनिल बारस्कर, महेश बडगुजर, विक्रन साळवे, गुनूस खाटीक, भावेश दहीहंडे, सुधीर बडगुजर, विठोबा शिंगाडे अन्य शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मिळणारा प्रस्तावित मोबदला हा सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत अल्प आहे. शासनाचा कुठलाच कायदा शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे योग्य मूल्यांकन करू शकत नाही. जमीन अधिग्रहणामुळे शेतकऱ्यांची शेती, उत्पन्नाचे साधन व कुटुंबाचा उदरनिर्वाह धोक्यात येणार आहे. बागायती/सिंचन सुविधा असलेल्या सुपीक जमिनीचा नाश होणार आहे. पर्यायी जमीन, पुनर्वसन किंवा रोजगाराबाबत कोणतीही ठोस व लेखी हमी देण्यात आलेली नाही. संबंधित शेतकऱ्यांशी व ग्रामसभेशी सविस्तर चर्चा व सहमती न घेता प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने भूसंपादनाला विरोध करत आहेत.
बाळापूर, पिंपरी, अवधान ही गावे महापालिकेच्या हद्दीत असून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ व ६ लगतची गावे आहेत. उर्वरित गावे ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ लगतची आहेत. सन २०१४ मध्ये धुळे महापालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ मधील बाधित शेतकऱ्यांना ८००० प्रति चौरस मीटरने मोबदला देण्यात आला. त्या धर्तीवर सर्व बाधित शेतकरी यांना मोबदला देण्यात यावा, ज्या शेतजमिनीचे तीन तुकडे झाले आहेत. त्या शेतजमिनीला पूर्णपणे बाजारभावानुसार योग्य तो मोबदला देण्यात यावा, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा