ओटी भरण्यासाठी महिलांची गर्दी : फुले, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सनी फुलला परिसर
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : वडगावची ग्रामदेवता मंगाईदेवीची यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडली. वडगाव, शहापूर, जुने बेळगाव येथील भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगाईदेवीचा यात्रोत्सव पार पडला. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वडगावच्या मंगाईदेवीची यात्रा पारंपरिक पद्धतीने पार पडली. या निमित्ताने मंदिराला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. मंगळवारी सकाळपासून वडगाव परिसरात भाविकांची गर्दी दिसून आली. पारंपरिक पद्धतीने धनगरी ढोलांचे वादन करीत वडगावमध्ये प्रदक्षिणा घालण्यात आली. मंदिरांना भेटी देऊन त्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डोक्यावर ओटीचे सामान घेऊन महिला मंदिरात दाखल झाल्या. मानकरी चव्हाण-पाटील कुटुंबीयांच्या उपस्थितीत ओटी भरण्यात आली. त्यानंतर विधीवत पूजन करून गाऱ्हाणे उतरविण्यात आले.
मंगाईदेवीच्या नावाचा जयघोष करीत यात्रेला प्रारंभ झाला. सुरक्षिततेसाठी वडगावमध्ये ठिकठिकाणी बॅरिकेड्स घालण्यात आले होते. विशेषत: मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले हेते. केवळ भाविकांना ये-जा करण्यासाठी हे रस्ते खुले करण्यात आले होते. विष्णू गल्ली, यरमाळ रोड, मंगाईनगर, बाजार गल्ली या परिसरातील रस्ते गर्दीने फुलले होते. मंदिर परिसरात सर्वत्र ओटी, फुले यांचे स्टॉल मांडण्यात आले हेते. बाहेरील बाजूला खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू, खेळणी यांचे स्टॉल गर्दी खेचत होते. दुपारी झालेल्या पावसातही भाविकांची गर्दी मात्र कमी झाली नव्हती. सायंकाळनंतर ही गर्दी वाढत गेली. पोलीस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवून गर्दी नियंत्रित करण्यात आली.
