Headlines

बहुमजली व्यावसायिक इमारतींच्या पुनर्मोजणीचे काम सुरू


महसूल वाढीसाठी मनपाने कंबर कसली : मनपा आयुक्तांची सूचना

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : महानगरपालिकेच्या हद्दीतील मोठ्या आणि बहुमजली व्यावसायिक इमारतींकडून मालमत्ता कराची योग्य रक्कम भरली जावी. जेणेकरून महानगरपालिकेच्या महसुलात वाढ होईल यासाठी महापालिकेच्या महसूल विभागाकडून शहरातील विविध भागातील इमारतींच्या पुनर्मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. एकंदरीत महसुलात वाढ व्हावी यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत.

नुकतेच महापालिकेच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील श्रीकृष्ण देवराय सर्कलच्या प्रभाग क्र. 28 मधील जेएनएमसी रोडवरील विविध बहुमजली व्यावसायिक इमारतींना भेट देऊन इमारतींच s पुन्हा मोजमाप केले. ज्या इमारती कर अधिकार क्षेत्राच्या अखत्यारीत येतात, पण त्यांनी योग्यरित्या कर भरलेला नाही. तसेच ज्या इमारती आतापर्यंत कर अधिकार क्षेत्राच्या अखत्यारित नव्हत्या तशा इमारतींची पाहणी करून तपासणी करण्यात आली आहे.

जेएनएमसी रोडवरील चार ते पाच बहुमजली व्यावसायिक इमारतींच्या मोजमापासह कर आकारणीचा आढावा घेण्यात आला. इमारतींचे क्षेत्रफळ, वापर आणि कराशी संबंधित कागदपत्रांची पाहणी करण्यात आली. गरज भासल्यास संबंधित इमारतींकडून सुधारित कर आकारण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत.

महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्या आदेशानुसार उत्तर विभागीय झोनल आयुक्तालय कार्यालयाकडून मालमत्तांच्या पुनर्मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. इमारतींच्या पुनर्मोजणीचे काम उत्तर विभागातील विविध भागांमध्ये सुरू राहणार आहे. यापूर्वी देखील महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील इमारतींबाबत चर्चा करण्यात आली होती. अनेक जणांकडून कर भरला जात नाही. इतकेच नव्हे तर चार-पाच मजली इमारत असली तरी त्यांच्याकडून केवळ पहिल्या मजल्याचीच घरपट्टी भरली जाते. तसेच लांबीरुंदीही कमी सांगून महापालिकेचा कर चुकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे इमारतींच्या पुनर्मोजणीचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मध्यंतरी महसूल विभागाकडून विविध भागातील रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या पुनर्मोजणीचे काम हाती घेण्यात आले होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत