फ्रिजमधून येणारा घाण वास ही अनेक घरांतील सामान्य समस्या आहे, जी बहुतेक वेळा अन्न साठवण्याच्या चुकीच्या पद्धती आणि अपुऱ्या स्वच्छतेमुळे निर्माण होते. याकडे दुर्लक्ष केल्यास अन्नपदार्थ लवकर खराब होऊ शकतात आणि फ्रिजमध्ये जंतूंची वाढ होण्याचा धोका वाढतो. मात्र काही सोप्या सवयी आणि नियमित स्वच्छता केल्यास फ्रिज नेहमी ताजे, स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवता येते.

फ्रिजमधून घाण वास का येतो?
फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न दीर्घकाळ पडून राहिल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू लागते. काही पदार्थ सांडल्यास किंवा झाकण न लावता ठेवल्यास त्यातून दुर्गंधी निर्माण होते. ही दुर्गंधी हळूहळू संपूर्ण फ्रिजमध्ये पसरते आणि इतर अन्नपदार्थांवरही परिणाम करते.
उघडे अन्न कधीही ठेवू नका
शिजवलेले अन्न किंवा कापलेली फळे-भाज्या थेट फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय अनेकांना असते. असे अन्न लवकर खराब होते आणि त्याचा वास इतर पदार्थांमध्येही मिसळतो.नेहमी हवाबंद (एअरटाइट) डब्यांचा वापर करा. त्यामुळे अन्न जास्त काळ ताजे राहते आणि फ्रिजमध्ये दुर्गंधीही पसरत नाही.
7
लिंबू आणि कॉफीची मदत घ्या
नैसर्गिक पद्धतीने फ्रिजचा वास कमी करायचा असेल तर लिंबाचे काप किंवा कॉफी पावडर उपयोगी ठरते.एका वाटीत कॉफी पावडर किंवा लिंबाचे तुकडे ठेवले तर फ्रिजमध्ये ताजेपणा टिकून राहतो. काही जण सक्रिय चारकोलचाही वापर करतात, जो दुर्गंधी शोषण्यासाठी प्रभावी मानला जातो.
बेकिंग सोड्याचा वापर करा
फ्रिजमधील वास कमी करण्यासाठी बेकिंग सोडा अत्यंत प्रभावी उपाय आहे.एका छोट्या वाटीत बेकिंग सोडा भरून फ्रिजच्या एका कोपऱ्यात ठेवा. तो वातावरणातील दुर्गंधी शोषून घेतो. दर महिन्याला हा बेकिंग सोडा बदलल्यास अधिक चांगला परिणाम दिसून येतो.
आठवड्यातून एकदा फ्रिज तपासा
अनेक वेळा कालबाह्य झालेले पदार्थ, खराब झालेली फळे किंवा शिळे अन्न फ्रिजमध्ये दिवसन्दिवस पडून राहते. त्यामुळे संपूर्ण फ्रिजमध्ये दुर्गंधी निर्माण होते.आठवड्यातून किमान एकदा फ्रिजमधील सर्व वस्तू तपासा. खराब झालेल्या किंवा वापरण्यायोग्य नसलेल्या वस्तू त्वरित बाहेर काढा.

