Headlines

पूर्व भारतात कमी दाबाचं क्षेत्र, राज्यातील मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील आठवड्यासाठी हवामान विभागाचा अंदाज काय?| Maharashtra Times


Weather Update: राज्यात शुक्रवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. हलक्या पावसाला सुरूवात झाली असून १८ जुलै २०२६ रोजी राज्यातील १७ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

18 जुलै हवामान
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचं पुनरागमन झालं आहे. शुक्रवारी दिवसभर पश्चिम महाराष्ट्रासह ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी बरसल्या. शनिवारपासून संपूर्ण राज्या पावसाचा जोर वाढणार असून येत्या आठवड्यात मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. १८ जुलै रोजी राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात ३०-४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पूर्व भारतात कमी दाबाचं क्षेत्र

हवामान विभागानेजारी केलेल्या अंदाजानुसार बंगालच्या महासागरात आठवड्याच्या सुरुवातीला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं. हे क्षेत्र पूर्व भारत पसरलं. उत्तर ओडिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये व्यापलं होतं. यामुळे महाराष्ट्रात पावासाच्या हलक्या सरी बरसल्या. पण हे क्षेत्र सध्या उत्तर ओडिशा आणि झारखंडच्या भागांमध्ये केंद्रित आहे आणि येत्या २४ तासांमध्ये ते कमकुवत होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली सध्या महाराष्ट्रापासून दूर जात आहे. त्यामुळे राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण करणारी कोणतीही प्रणाली सक्रिय नाही आहे. येत्या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरातील मान्सूनला चालना देणाऱ्या प्रणाली सक्रिय झाल्या तरचं सर्वत्र पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

१८ ते २३ जुलैदरम्यान कोकण आणि गोव्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये येत्या एक ते दोन दिवसांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी १८-१९ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासह ताशी ४०-५० किमी वेगाना वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस होईल. संपूर्ण जुलै महिन्यात महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये सरासरीहून कमी पाऊस होईल असेच चित्र दिसत आहे. केवळ कोकण किनारपट्टीवर संपूर्ण राज्याच्या तुलनेत चांगला पाऊस झालेला दिसत आहे.

महामुंबईत पावसाचा अंदाज?

ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमध्ये १७ जुलैपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवार-रविवारी मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ठाणे आणि नवी मुंबई शहरांमधील अंतर्गत भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

विदर्भात यलो अलर्ट जारी

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी भंडारा, गोंदिया, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणात परिस्थिती काय?

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोकणात यंदा चांगला पाऊस झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा