Headlines

सर्वसामान्य प्रवाशांना मोठा झटका! एसटीच्या भाड्यात 13.56 टक्के वाढ


सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका देणारी माहिती समोर येत आहे. कारण एसटी महामंडळाने भाडेवाढीचा मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या भाड्यात तब्बल 13.56 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

ST Bus Fare Hike
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. अखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात, या भाडेवाढीमुळे यापुर्वी केलेली साध्या बसेसची 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द होईल, असं शासनाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करुन स्पष्ट करण्यात आलं आहे.

एसटी महामंडळाच्या आर्थिक शाश्वततेसह प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य होती. वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कार्यावर आर्थिक ताण निर्माण होत असल्याने, सेवा सुरळीत ठेवण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय आवश्यक ठरला आहे, असं शासनाने म्हटलं आहे.

ही भाडेवाढ एसटीची सेवा अधिक सक्षम आणि टिकाऊ बनविण्यासाठी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासासाठी आवश्यक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण सेवा कायम राखण्यास त्यामुळे मदत होणार आहे, असं देखील राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

एसटीचे नवे दर पुढीलप्रमाणे:

ST Bus Fare Hike

मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या भाडेवाढीवर प्रतिक्रिया दिली आहे. “राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग आणि टायर यांच्या किमतीत झालेली वाढ यामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य ठरली आहे”, असं मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

“ही भाडेवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित सेवा देण्यासाठी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर दाखविलेला विश्वास कायम ठेवावा, ही अपेक्षा आहे”, अशी प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटीच्या भाडेवाढीनंतर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “तिकीट दर पाचच्या पटीत केल्यामुळे सुट्या पैशाचा घोळ मिटला. प्राधिकरणाचे आभार”, अशी प्रतिक्रिया श्रीरंग बरगे यांनी दिली.