Delhi Premier League : दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सेंट्रल दिल्ली किंग्सने न्यू दिल्ली टायगर्सवर ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यावेळी दोघांनी वादळी खेळी करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे. काल झालेल्या रोमांचक सामन्यात सेंट्रल दिल्ली किंग्सने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यू दिल्ली टायगर्सचा तब्बल ९ विकेट्स राखून धुव्वा उडवला. पावसामुळे व्यत्यय आल्याने हा सामना निर्धारित २० षटकांऐवजी १८-१८ षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये धावांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला.
न्यू दिल्ली टायगर्सने दिले १८५ धावांचे आव्हान
प्रथम फलंदाजी करताना न्यू दिल्ली टायगर्सने १८ षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावांचा मजबूत डोंगर उभा केला. कर्णधार हिम्मत सिंहने आक्रमक सुरुवात करत अवघ्या २१ चेंडूत ४६ धावा कुटल्या आणि संघाला वेगवान सुरुवात करून दिली. त्याला केशव दलाल सिंहने ३१ चेंडूत ३९ धावा करत चांगली साथ दिली. तर, शेवटच्या षटकांमध्ये मनीष सहरावतने वेगाने धावा गोळा करत १९ चेंडूत ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
विजयासाठी मिळालेल्या १८६ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सेंट्रल दिल्ली किंग्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. अंडर-१९ वर्ल्ड कप विजेता कर्णधार यश धुल आणि सिद्धार्थ जून यांनी न्यू दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे काढली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल १२६ धावांची भक्कम भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. यश धुलने तुफानी फलंदाजी करत अवघ्या २८ चेंडूत ७६ धावा ठोकल्या. त्याच्या या स्फोटक खेळीत ६ चौकार आणि ८ गगनभेदी षटकारांचा समावेश होता. त्याच्या आक्रमक शैलीमुळे न्यू दिल्ली टायगर्सचे गोलंदाज अक्षरशः दबावाखाली आले.
यश धुल बाद झाल्यानंतरही २० वर्षीय सिद्धार्थ जूनने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. त्याने युगलसैनीच्या साथीने फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली आणि संघाचा विजय निश्चित केला. हातात विकेट्स असल्याने आणि आवश्यक रनरेट नियंत्रणात असल्याने सेंट्रल दिल्ली किंग्सने हे आव्हान अतिशय सहज पार करत ९ विकेट्स राखून शानदार विजय नोंदवला. सिद्धार्थ जूनने शेवटपर्यंत नाबाद राहत केवळ ३४ चेंडूत ८३ धावांची मॅचविनिंग खेळी केली आणि संघाला एकतर्फी विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा