Headlines

नांदगावात डाव्या आघाडीची निदर्शने:दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळला




नांदगाव खंडेश्वर येथे गुरुवार, २३ जुलै रोजी दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डाव्या आघाडी व वंचित बहुजन आघाडीने निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान शहरात बंदही पाळण्यात आला. डावी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील बसस्थानक चौकात जोरदार निदर्शने केली. त्यांनी शहरातून मोर्चा काढत व्यापारी, दुकानदार, कामगार, शेतकरी तसेच सामान्य नागरिकांना महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने सकारात्मक चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असून, त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनात देशातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसोबतच शिक्षण क्षेत्रातील वाढते व्यापारीकरण, शिक्षणाचे खाजगीकरण, जनविरोधी नवे शैक्षणिक धोरण, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विविध प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली. बसस्थानक परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात आंदोलकांनी तहसीलदारांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. बंदच्या पार्श्वभूमीवर नांदगाव शहरातील व्यापारी व नागरिकांनीही या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. या आंदोलनात भाकपचे जिल्हा सचिव कॉ. सुनील मेटकर, तालुका सचिव कॉ. संतोष सुरजुसे, माकपचे तालुका सचिव कॉ. श्याम शिंदे, वंचितचे तालुका अध्यक्ष रोशन गाडेकर, भाकपचे विनोद तऱ्हेकर, नारायणराव भगवे, संजय मंडवधरे, जया मंडवधरे, हरिदास देशमुख, हरिदास राजगिरे, माधव ढोके, अरुणभाई शिंदे, ज्ञानेश्वरराव शिंदे, विनोद वैद्य, प्रशांत कुर्जेकर, मोरेश्वर वंजारी, दादाराव दादरवाडे, प्रज्वल ढोके, यश वैद्य, रोशन वैद्य, यश वैरागडे, कार्तिक राजकुळे, दीप सावळे, हर्षद गाढवे, नदीम शेख, राजगुरू शिंदे, मोहसीन शेख यांच्यासह डाव्या आघाडीचे पदाधिकारी, विद्यार्थी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत