Navi Mumbai News : सीबीडी बेलापूर सेक्टर १५ -ए येथील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मेडिकल कॉलेजचा मार्ग अखेर मोकळा झाला.या भूखंडावर कोणताही कायदेशीर मालकी हक्क,अधिकार अथवा हितसंबंध नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, नवी मुंबई :सीबीडी बेलापूर सेक्टर १५-ए येथील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजच्या प्रकल्पासमोरील महत्त्वाचा कायदेशीर अडथळा दूर झाला आहे. संबंधित भूखंडावर कोणताही कायदेशीर मालकी हक्क, अधिकार अथवा हितसंबंध नसल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने ‘४० प्लस मास्टर क्रिकेटर असोसिएशन, नवी मुंबई’ची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे या भूखंडावर रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज उभारण्याचा नवी मुंबई महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
जागेचा वापर स्थानिक नागरिक खेळ व मनोरंजनासाठी
मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम गोखले यांच्या खंडपीठाने २७ ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला. सर्व्हे क्रमांक ४ मधील सुमारे २१ हजार ६२३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा भूखंड सिडकोच्या मालकीचा असून, तो महापालिकेला भाडेपट्ट्याने देण्यात आल्याचे सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले. याचिकाकर्त्या संस्थेने या जागेचा वापर स्थानिक नागरिक खेळ व मनोरंजनासाठी करीत असल्याचा दावा केला होता.
संस्थेची मागणी
तसेच, सीआरझेडच्या नियमांचा हवाला देत पर्यावरणीय आक्षेपही नोंदविण्यात आले होते. २०२४ मधीलई-निविदाआणि भाडेपट्टा करार रद्द करून या जागेवर कोणतेही बांधकाम करू नये, तसेच ती स्थानिक रहिवाशांसाठी खुल्या मैदानासाठी राखून ठेवावी, अशी मागणी संस्थेने केली होती. मात्र, न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा संबंधित भूखंडावर कायदेशीर हक्क नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कायदेशीर मालकी किंवा भाडेपट्टा असलेल्या संस्थेला बांधकाम करण्यापासून रोखण्याचा अधिकार याचिकाकर्त्यांना देता येणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले.
महापालिकेने बेलापूर-नेरुळ नोडमधील १४ भूखंडांचा संदर्भ न्यायालयासमोर दिला. त्यापैकी एन-१०७ हा भूखंड खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्याचे महापालिकेने निदर्शनास आणले. त्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या क्रीडा गरजांसाठी पर्यायी जागा उपलब्ध असल्याचे न्यायालयाने नमूद केले. दरम्यान, याच विषयावरील जनहित याचिकाही १३ फेब्रुवारी २०२६ रोजी फेटाळण्यात आल्याची माहिती न्यायालयास देण्यात आली. तसेच ३० सप्टेंबर २०२४ रोजीचा अंतरिम आदेशही न्यायालयाने हटविला.
या निर्णयामुळे रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज प्रकल्पावरील न्यायालयीन अडथळा दूर झाला असला, तरी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या इतर पर्यावरणीय अथवा वैधानिक मंजुरींना न्यायालयाने मान्यता दिली आहे, असा याचा अर्थ नसल्याचेही स्पष्ट केले आहे
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा