NMMT Buses: नवी मुंबई शहरातील वाढत्या प्रवासी संख्येसाठी एनएमएमटीच्या ताफ्यातील बस सेवा वाढवण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत ५१ बस दाखल झाल्या असून लवकरच आणखी १०० बस दाखल होतील.

घणसोलीत लोकार्पण पूर्ण
घणसोली येथील परिवहनच्या बस आगारात या ५१ बसचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील, परिवहन समितीचे सभापती विकास झंजाड, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, पाणीपुरवठा समितीचे सभापती रविकांत पाटील, प्रभाग समिती अध्यक्षा ललिता मढवी, नगरसेवक, परिवहन समिती सदस्य तसेच अधिकारी उपस्थित होते. या नव्या पर्यावरणपूरक बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे, असा विश्वास वनमंत्री नाईक यांनी व्यक्त केला आहे.
सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात ४१६ बस कार्यरत आहेत. नव्याने १५० सीएनजी बसचा समावेश करण्यात येत असून, त्यापैकी ६५ बस उपक्रमाला मिळाल्या आहेत. उर्वरित ८५ बस लवकरच ताफ्यात दाखल होणार आहेत. ६५ पैकी ५१ बसचे लोकार्पण शनिवारी झाले आहे. सीएनजी बसमुळे इंधन खर्चात बचत पर्यावरण होण्याबरोबरच संवर्धनालाही चालना मिळेल, असे सांगण्यात येते. लोकार्पणासाठी या बस फुलांनी आकर्षक सजवण्यात आल्या होत्या. या बसचे लोकार्पण करून मंत्री गणेश नाईक यांनी तिकीट काढून बसने प्रवासी केला.
बस फेऱ्यांच्या संख्या वाढणार
दोन वर्षांपूर्वी परिवहन उपक्रमाच्या ताब्यात सरासरी ५०० बस होत्या. मात्र यातील शंभर बस भंगारात गेल्यावर बसची संख्या कमी झाली. त्यामुळे शहरातील अनेक बस मार्गावरील बस फेऱ्या कमी झाल्या आहेत. एक बस निघून गेल्यावर दुसरी बस जवळपास एका तासाने येते. दोन बस धावण्यामधील अंतर वाढल्याने प्रवाशांचा वेळ बसची वाट बघण्यातच वाया जात असतो. प्रवाशांना बसची वाट बघत ताटकळत बसथांबांवर उभे राहावे लागत आहे. त्यामुळे बस वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे. आता आलेल्या सीएनजी बसमुळे महत्त्वाच्या मार्गांवरील बस वाढतील अशी अपेक्षा आहे.
यावेळी महापौर सुजाता पाटील यांनी, नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत ४०० महिलांना बसचालक प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे भविष्यात एनएमएमटीमध्ये महिला बसचालक कार्यरत होतील, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. परिवहन समितीचे सभापती विकास झंजाड यांनी परिवहन उपक्रम स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.
एक हजार बसची गरज
बसमधील प्रवाशांची संख्या लक्षात घेता परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात ८०० ते १००० बसची गरज आहे. मात्र परिवहनच्या ताब्यातील बसची संख्या पाचशेच्या घरातही नाही. यामुळे अनेक मार्गावर प्रवासीसंख्या मोठी असूनही बससंख्या अपुरी आहे. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसची वाट पाहत राहावे लागते. दोन बस फेऱ्यांमध्ये अंतरही मोठे आहे. त्यामुळे परिवहन उपक्रमात आणखी बस लवकरात लवकर येण्याची गरज लवकर येण्याची गरज आहे, असे सांगण्यात येत आहे.
बेस्टच्या ई-बसच्या तुलनेत सीएनजी बसने प्रवास अधिक सुखद होतो का बेस्टप्रमाणे एनएमएमटीमध्ये सुद्धा ई-बस दाखल झाल्या पाहिजेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा

