Headlines

दोन महिन्यांपासून पूल तयार, पण उद्घाटनाचा मुहूर्त नाही; मंत्र्यांच्या वेळेपायी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील पूल रखडला| Maharashtra Times


SCLR-BKC Connector: सांताक्रूझ -चेंबूर लिंक रोडवरील मिसिंग लिंक असलेल्या पुलाचं काम अखेर पूर्ण झालं आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचणं सोपं होणार आहे. पण उद्घाटनासाठी अजून तारीख मिळाली नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड - बीकेसी कनेक्टर
मुंबई: गेल्या १० वर्षांपासून सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडमुळे मुंबईकरांना मोठा फायदा झाला आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांदरम्यान सिग्नल-मुक्त प्रवासासाठी या लिंक रोडचा वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. कलानगर जंक्शनवरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी हा पूल बांधण्यात आला आहे. परंतु, दोन महिन्यांपूर्वीच या पुलाचं काम पूर्ण झालं आहे. परंतु, मंत्र्यांना वेळ नसल्यामुळे या प्रकल्पाचं उद्घाटन रखडलं आहे.

सर्व तपासण्या पूर्ण तरी उद्घाटन रखडलं

वांद्रे-कुर्ला संकुल – सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडपर्यंत विस्तारित पुलाची नागरिक अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत आहे. या पुलासाठी सर्व आवश्यक तपासण्या आणि सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. वाहतुकीसाठी हा पूल सज्ज आहे. परंतु, अजूनपर्यंत औपचारिक उद्घाटन समारंभासाठी तारीख मंजूर झाली नसल्याने सोहळा लांबला आहे. या विलंबामुळे मुंबईतील सर्वात व्यस्त व्यावसायिक केंद्र असलेल्या वांद्रे कुर्ला संकुलात जाणाऱ्या हजारो नागरिकांचे हाल होत आहेत.

Maharashtra TimesMumbai News: महामुंबईला तिहेरी गती! मेट्रो, लिंक रोड आणि दुहेरी बोगद्यांच्या कामाला गती; ऑगस्टपासून प्रवासात दिलासा मिळणार

वांद्रे पूर्व येथील कलानगर जंक्शन मुंबईतील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्र-वरळी सी-लिंक, शीव आणि इतर अनेक महत्त्वाच्या मार्गांना जोडणारं हे जंक्शन आहे. गर्दीच्या वेळी प्रत्येक दिशेने वाहनचालक या चौकात येतात. त्यामुळे तासंतास प्रवासी वाहतूककोंडीत अडकलेले असतात. हा नवा उन्नत कनेक्टर सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील एक ‘मिसिंग लिंक’ आहे. या पुलावर वाहतूक सुरू झाली की ‘बीकेसी’मार्गे पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर सहजपणे प्रवास करता येणार आहे. त्यामुळे शहारतील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या मार्गांना बायपास करून थेट प्रवास करता येणार आहे.

मार्गामुळे प्रवाशांना मोठा फायदा

या पुलामुळे कलानगरवरील वाहतुकीचा भार कमी होणार असून पूर्व उपगनर, बीकेसी आणि पश्चिम उपनगरात जाणाऱ्यांच्या वेळेत बचत होणार आहे. “कलानगरमधील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही दररोज संघर्ष करतो आणि जेव्हा व्हीआयपी हालचाली होतात तेव्हा परिस्थिती आणखी बिकट होते. पण मंत्र्यांना याची काळजी वाटत नाही,” अशी खंत जंक्शनवर तैनात असलेल्या एका वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने मुंबई मिररशी बोलतना व्यक्त केली. मार्ग तयार असला तरी बॅरिकेड लावून तो बंद करण्यात आला आहे.

Maharashtra TimesHarbour Local : CSMT-गोरेगाव हार्बर लोकल दीड महिने बंद राहण्याचे संकेत, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेचं काम, वांद्य्रात नवा फलाट

कुर्ला येथील रहिवासी आणि लिंक रोडचा वारंवार वापर करणारे ईसा शेख म्हणाले, “हा लिंक रोड खूप उपयुक्त ठरेल. बीकेसी येथून प्रवास करणाऱ्या लोकांना सध्या एससीएलआरमध्ये प्रवेश करण्यासाठी कलिना मार्गे जावे लागते. पण या नवीन कनेक्शनमुळे वेळेची बचत होईल आणि वाहतुकीची कोंडी कमी होईल. मी वारंवार कामासाठी बीकेसीला प्रवास करतो आणि सध्या मी सुमारे १५ ते २० मिनिटे ट्रॅफिकमध्ये अडकतो. एकदा का हे सगळं सुरू झालं की माझा प्रवासाचा वेळ पाच मिनिटांनी कमी होईल अशी माझी अपेक्षा आहे.” दरम्यान, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना याबद्दल विचारल्यानंतर ते म्हणाले ,”प्रकल्पाचं अंतिम टप्प्यातील काम सुरू असून पुढील आठवड्यात उद्घाटन होणार आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा