ग्रामस्थांचा आरोप
चेंढरे ग्रामपंचायत ही अलिबाग शहरालगतची महत्त्वाची ग्रामपंचायत असून, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तिची लोकसंख्या अलिबाग नगरपरिषदेपेक्षाही अधिक आहे. वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे नागरीकरण आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत पाणीपुरवठ्याची व्यवस्था अपुरी पडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
नियमित पाणी का मिळत नाही
विशेष म्हणजे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीकडून वर्षाला जवळपास पावणेदोन कोटी ते दोन कोटी रुपयांच्या दरम्यान पाणीपट्टी वसूल केली जाते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी वसूल होत असताना नागरिकांच्या नळाला नियमित पाणी का मिळत नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
कामानिमित्त बाहेर असल्याची कारणे
मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर पोहोचला असता प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर आणि ग्रामविकास अधिकारी निलेश गावंड कार्यालयात उपस्थित नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते कामानिमित्त बाहेर असल्याचे सांगण्यात आले. तसेच मोर्चाबाबत माहिती नसल्याचे प्रशासक साळावकर यांनी दत्ता ढवळे यांना सांगितले. मात्र, याबाबत ग्रामविकासअधिकारी निलेश गावंड यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती, असे दत्ता ढवळे यांनी स्पष्ट केले.
सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन
अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खुर्च्या खाली आणून ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा निर्णय थांबविण्यात आला. त्यानंतर प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. त्यांनी लवकरात लवकर पाणीप्रश्न सोडवून ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.
Nagpur News: खोदकामावरून महापौर संतापल्या; दिले दंडात्मक कारवाईचे निर्देश
थेट प्रश्न प्रशासनाला विचारण्यात आला.
दरम्यान, चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत सात-सात मजली इमारती उभ्या राहत असताना त्या तुलनेत पाणीपुरवठ्याची पुरेशी व्यवस्था आहे का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. ‘पाण्याची व्यवस्था अपुरी असताना एवढ्या मोठ्या इमारतींना बांधकाम परवानगी कशी दिली जाते?’ असा थेट प्रश्न प्रशासनाला विचारण्यात आला.
पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला निवेदन देत पाणीपुरवठातातडीने सुरळीत करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची आग्रही मागणी केली. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चेंढरेकरांना पाण्यासाठी हंडा घेऊन रस्त्यावर उतरावे लागणे, हा प्रशासनाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी बी. एस. पाटील, दत्ता ढवळे, संदीप ढवळे, अविनाश राणे, प्रिया ढवळे, नागेश्वरी हेमाडे, सायली तांबे, नम्रता शिर्के यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
