Headlines

दीड दमडी: गुप्तहेर चंदूच्या कथा – deed damdi tambi durai special article on cjp delhi protest



-तंबी दुराई

चंदूला बालपणापासूनच रहस्यांची उकल करण्याचा नाद होता. त्याला विशेषतः बोटांच्या, हातांच्या ठशांचे खास आकर्षण होते. कोणतेही रहस्य ठशांच्या मदतीने शोधून काढता येते, असे चंदूचे मत होते. लहानपणी एकदा चंदू रडत होता. तो का रडत आहे ते कोणालाच कळेना. चंदूची देखभाल करण्यासाठी, त्याला दूध पाजण्यासाठी एक मुलगी ठेवली होती. ‘बाटलीतले सर्व दूध त्याने संपवले, तरी त्याचे पोट कसे भरले नाही?’ असे ती मुलगी म्हणाली.

तेव्हा चंदू त्याच्या बोबड्या बोलांनी म्हणाला, ‘बातलीवलचे थते तपाता.’ बाटलीवरचे ठसे तपासले तेव्हा लक्षात आले की बाटलीवर फक्त त्या मुलीच्याच हाताचे ठसे आहेत, बाल चंदूच्या इवल्या हाताच्या ताज्या ठशांच्या पत्ताच नव्हता. म्हणजे त्या मूलीने चंदूला दूध पाजलेच नव्हते, सगळे दूध स्वतःच गट्टम केले होते. बाल चंदूला तेव्हापासूनच सगळे लाडाने गुप्तहेर चंदू म्हणू लागले. चंदू शाळेत जाऊ लागला. चंदू हुशार होताच, त्याची बुद्धी अभ्यासाव्यतिरिक्तही सगळीकडे चाले.

केमिस्ट्रीचे सर विद्यार्थ्यांना फार मारायचे. त्यांना शिकवताच येऊ नये म्हणून एकदा कोणीतरी त्यांच्या चष्मा चोरला. मारके सर संपूर्ण पंचेचाळीस मिनिटे रागाने धुमसत होते. त्यांचा तास संपला आणि ते गेले त्यानंतर कुणी तरी चुपचाप त्यांचा चष्मा टेबलवर आणून ठेवला. तोवर चंदूची ख्याती शाळेत सगळीकडे परसली होती आणि चष्मा कोणी लपवला होता ते चष्म्यावर उमटलेल्या ठशांवरून चंदू शोधून काढेन याचा सगळ्यांना भरवसा होता. परंतु ही ख्याती त्या चोरापर्यंतही पोहोचली होती, त्यामुळे त्याने त्या चष्म्यावर आपल्या हाताचे ठसे उमटणार नाहीत याची काळजी घेतली होती. सगळ्यांना वाटले की चंदूची हुशारी या प्रकरणात निरुपयोगी ठरली आहे. परंतु चंदू कसला वस्ताद. त्याने सगळ्यांना वर्गाबाहेर काढले, सरांचे टेबल, टेबलाची उंची, विद्यार्थ्यांची बाके, विद्यार्थ्यांची सरासरी उंची या सगळ्याचे नीट निरीक्षण केले, अभ्यास केला आणि मग तो हसतमुखाने बाहेर आला.

टेबलाची रुंदी बघता, टेबलाच्या समोरच्या कोपऱ्यावर हात टेकवल्याशिवाय चष्मा त्याच्या मूळ जागी ठेवणं शक्यच नव्हतं. चोर विद्यार्थ्याने चष्म्यावरचे ठसे पुसले तरी टेबलाच्या या कोपऱ्यावर त्याने हात नक्कीच टेकवला असणार. चंदूने हे सरांना सांगितले. टेबलाच्या कोपऱ्याला टेकलेल्या हाताचे ठसे आणि चार संशयीत विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे तपासण्यात आले, त्यातून चष्माचोर नेमका सापडलाच. गुप्तहेर चंदूच्या या कारनाम्याची शाळेत खूप चर्चा झाली. हेडमास्तर म्हणाले, ‘याला म्हणतात एखाद्या विद्यार्थ्याने आपला ठसा उमटवणे!’

बघता बघता चंदू कॉलेजात जाऊ लागला. कॉलेजात त्याचे नाव आधीच पोहोचले होते आणि त्याचा फॅनक्लबही तयार झाला होता. एकदा चंदूच्या एका मित्राला वर्गातील एका मूलीने प्रेमपत्र पाठवले. पण त्या पत्राचा पेच असा होता ती त्यात तिने आपले नाव लिहिले नव्हते. ‘माझं तुझ्यावर खरं प्रेम असेल तर तू मला शोधून काढशील’ असं त्या पत्रात शेवटी लिहिलेलं होतं. अर्थात तो विद्यार्थी चंदूकडे आला आणि त्यानं पत्र दाखवलं. चंदू म्हणाला, ‘माझी कीर्ती या कॉलेजमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, त्यात तू माझा मित्र आहेस याची सुद्धा सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे या पत्रावर तिने हाताचे ठसे उमटू दिले नसतील याची मला खात्री आहे.’ आणि ते खरेही निघाले. परंतु चंदूमधला गुप्तहेर असा थोडीच हार पत्करणार होता? प्रत्येक जण आपल्या कामाचे ठसे सोडून जातोच यावर त्याचा ठाम विश्वास होता.

चंदू एकटाच कॉलेजात सगळीकडे भटकला, कुठे काही ठशांचा धारा-दोरा सापडतो का याची पाहणी केली. तो असाच भटकत असताना त्याचे लक्ष कचरा वाहून नेणाऱ्या छोट्या गाडीकडे गेले. त्या गाडीतील एका गोष्टीने त्याचे लक्ष वेधले. तो गाडीजवळ गेला आणि विचारले, ‘हे ग्लोव्ज कुठे सापडले?’ कचरावाला म्हणाला, ‘लायब्ररीतल्या डस्टबिनध्ये.’ चंदू लायब्ररीयनला भेटला, त्याच्या वर्गातली कोण मुलगी गेल्या दोन दिवसात लायब्ररीत बराच वेळ बसली होती, याची माहिती घेतली. काही तरी निमित्त काढून त्या मूलीकडून स्टॅटिस्टिक्सच्या नोट्स घेतल्या. गोल्व्ज आणि नोट्सवरील ठसे जुळले आणि चंदूने लगेचच घटनांची साखळी जोडली. आपल्या मित्राची प्रेयसी त्याने त्या ठशांवरून ट्रेस केली. या गोष्टीला आता २५ वर्षे झाली, ते जोडपे आजही लग्नाच्या वाढदिवशी चंदूला आभाराचा मेसेज पाठवायला विसरत नाही.

पुढे चंदूचे हे ठसे तपासण्याचे वेड किंवा छंद असाच वाढत राहिला. कुणी घरी येऊन गेलं की त्या व्यक्तीच्या ठशांचे फोटो तो काढून ठेवू लागला. ‘मी तुझ्या घरी आल्याचं मला आठवत नाही’ असं कुणी म्हटलं की तो लगेचच आपल्याकडील ठशांचा अल्बम काढून दाखवी आणि ‘हे बघ अमूक तारखेला, आमच्या सोफ्याच्या हँडलवर तुझ्या हातांचे उमटलेले ठसे’ असं सांगे. नोकरी वगैरे लागल्यावर चंदू एकदा मुलगी पाहायला गेला. मुलीच्या आईने कौतुकाने सांगितले की ‘पोहे आमच्या छबूने केले आहेत.’ तर चंदू लगेचच त्यांच्या किचनमध्ये गेला, कढई, चमचा यावरील ठसे त्याने भिंगातून पाहिले, मुलीच्या हाताच्या ठशांशी ते मॅच होतात याची खात्री करून घेतली आणि ‘खरंच, पोहे तुमच्या छबूनेच केले आहेत.’ असं सर्टिफिकेट दिलं.

‘माझा मुलगा फार चाणाक्ष ठसेतज्ज्ञ आहे’ असं चंदूचे वडील कौतुकानं म्हणाले, परंतु अशा संशयखोर मुलाला आपली मुलगी देणार नाही, असं मुलीचा बाप म्हणाला, त्यामुळे त्या ‘पाहण्याचं’ पुढे काहीच होऊ शकलं नाही. अशी बरीच वर्षे गेली. चंदू जिथं जाईल तिथं आपल्या कामाचा ठसा उमटवत राहिला. त्याची कीर्ती वाढत राहिली आणि सगळे त्याला ठसेतज्ज्ञातला दादा म्हणू लागले. अशातच एक दिवस दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन झाले. लाखो विद्यार्थी जमा झाले. दगडफेक झाली. दगड पोलिसांनी मारले की पोलिसांना मारले असा प्रश्न पडला आणि मग चंदूला राहवेना. त्याच्यातला गुप्तहेर ठसे तज्ज्ञाने नवी शोधमोहीम त्याने हाती घेतली!



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत