सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. परिमल नाईक यांना सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेने सुरवातीपासून दिलेल्या महत्व पूर्ण योगदाना निमित्ताने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूर येथे १६ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती आदरणीय श्री. भूषण गवई यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. कोल्हापूर सर्किट बेंच स्थापनेच्या चळवळीत आणि या कार्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ व सर्वच वकील वर्गाने दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अॅड. परिमल नाईक यांचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने कोल्हापूर येथे पाहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. रवींद्र घुगे साहेब, न्यायमूर्ती कर्णिक साहेब, न्यायमूर्ती कोलाबावाला साहेब आणि न्यायमूर्ती कुलकर्णी साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेब, खासदार छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूर सर्किट बेंचमधील सर्व सन्माननीय न्यायमूर्ती या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
या सोहळ्यात सिंधुदुर्ग सहित रत्नागिरी, सांगली, सातारा,सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातील वकील संघटनेच्या अध्यक्षांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना तसेच कायदेविषयक वर्तुळातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
