Palghar News: प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सध्या केवळ १५ महिन्यांचा कालावधी उरला असून त्यातील सुमारे चार महिने पावसाळ्याचे आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात अवघ्या ११ महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणातील काम पूर्ण होणे कठीण असल्याचे प्रवाशांचे मत आहे.

विरार ते डहाणू दरम्यानच्या विविध टप्प्यांतील कामांचा आढावा घेतल्यास अनेक ठिकाणी माती भरणे, सपाटीकरण, ब्लँकेटिंग, रेल्वे रूळ टाकणे, पूल बांधकाम, ओव्हरहेड वायर पोल उभारणी आदी कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी बुलेट ट्रेन मार्गाच्या कामांमुळे चौपदरीकरणाच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचेही दिसून येते.
विविध टप्प्यांतील कामांची स्थिती
- विरार-वैतरणा (८.४४ किमी) : काही भागांत माती भरण्याचे काम पूर्ण झाले असले तरी ब्लँकेटिंग, रूळ टाकणे, पूल व सिग्नलची कामे बाकी आहेत. बुलेट ट्रेनसाठी उभारण्यात येणाऱ्या पिलर व गर्डरमुळे कामात विलंब होत आहे.
- वैतरणा-सफाळे (८.३२ किमी) या मार्गावर माती भरणे व पुलांची कामे सुरू आहेत. वैतरणा नदीवरील दोन मोठ्या पुलांपैकी एक जवळपास पूर्ण झाला असला, तरी दुसऱ्या पुलाचे मोठे काम बाकी आहे.
- सफाळे-केळवे रोड (५.८१ किमी) : या मार्गावर येथे माती भराव तसेच, ब्लँकेटिंगनंतर रेल्वे रूळ टाकण्यास सुरुवात झाली आहे. ओव्हर हेड वायरसाठी खांबही उभारले आहेत.
या मार्गावर पूर्व-पश्चिम बुलेट ट्रेनचा मार्ग जात असल्याने रेल्वे मार्गाच्या मधोमध बुलेट ट्रेन मार्गाचे खांब उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच, जुने स्थानक कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित न झाल्याने प्रकल्प रखडला आहे.
- केळवे रोड-पालघर (८.३७ किमी) काही भागांत रूळ टाकण्याचे काम सुरू झाले असले तरी पालघर येथील पॉवर सबस्टेशन नवीन जागेत कार्यान्वित न झाल्याने काम पूर्णत्वास जाऊ शकलेले नाही. पालघर स्थानकावरील एलिव्हेटेड डेकचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
- पालघर-उमरोळी (६.२३ किमी): माती भरणे, ब्लँकेटिंग आणि रूळ टाकण्याची प्रक्रिया सुरू असून ओव्हरहेड वायर पोल उभारण्यात आले आहेत.
- उमरोळी-बोईसर (५.७१ किमी) बोईसर मालवाहतूक यार्ड स्थलांतरित न झाल्याने बोईसर स्थानक परिसरातील कामे रखडली आहेत. नवीन फलाट व स्थानक इमारतीची कामेही प्रलंबित आहेत.
- बोईसर-वाणगाव (८.७२ किमी) : काही भागांत सपाटीकरणाचे काम सुरू असून रेल्वे वसाहती हटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. जुने स्थानक कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित केल्यानंतर त्या जागेतून रेल्वे मार्गाचे काम सुरू केले जाईल.
- वाणगाव-डहाणू (१२.२ किमी) : अनेक ठिकाणी केवळ माती भरण्याचे काम झाले आहे. डहाणू येथे लोकल गाड्यांसाठी आवश्यक टर्मिनल उभारणी अद्याप सुरू झालेली नाही.
स्थानकांवरील कामांचीही संथ गती
वैतरणा, सफाळे आणि उमरोळी येथे नवीन फलाटांच्या कामांना सुरुवात झाली असली, तरी केळवे रोड, पालघर, बोईसर, वाणगाव आणि डहाणू येथे अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. सफाळे वगळता इतर सात स्थानकांवर नवीन पादचारी पुलांचे कामही सुरू झालेले नाही. केळवे रोड येथील पादचारी पुलाची स्थिती डिसेंबर २०२५ मध्ये जशी होती, तशीच एप्रिल २०२६मध्येही कायम असल्याचे निदर्शनास येत आहे.
डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी
विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम बाजूला ठेवून डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. १५ डब्यांच्या डहाणू लोकलच्या काही फेऱ्या १ मेपासून सुरू केल्या असल्या तरीही गर्दीच्या वेळी आणखी फेऱ्या तातडीने वाढवणे आवश्यक आहे, याकडे डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सचिव दयानंद पाटील यांनी लक्ष वेधले.

