ST Bus Smart Card: एनसीएमसी कार्ड घेण्यासाठी १ ऑगस्टपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती परंतु अनेक प्रवाशांची नोंदणी अद्याप अपूर्ण होती. त्यामुळे राज्य सरकारने कार्ड घेण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वृत्तानंतर मुदतवाढ
‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘एनसीएमसी’ कार्डच्या नावाखाली सुरू असलेल्या गोंधळाचे ‘रांग हटेना त्रास मिटेन’ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि अन्य सवलतधारकांना अद्याप ‘एनसीएमसी’ कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. सद्यस्थितीत हे कार्ड काढण्यासाठी मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात अधिकृत केंद्रांबाहेर रांगा लागल्या आहेत. प्रवाशांकडून केंद्रांची संख्या वाढवण्याच्या मागणीकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लाभार्थींच्या अडचणींत अधिक वाढ झाली आहे.
Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांना दिलासा मिळणार! ७ स्थानकांवरील २० फलाटांची उंची वाढवणार; अपघातांचा धोका कमी होणार
‘एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुदतवाढ देण्यात आली’, असे महामंडळाचे म्हणणे आहे. राज्यात सद्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास (अमृत ज्येष्ठ नागरिक) आणि ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी भाड्यात ५० टक्के सवलत दिली जात आहे. पण अनेकदा या सवलतींचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे ही प्रणाली अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञान-आधारित करण्याच्या उद्देशाने स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. हे कार्ड सुरू झाल्यानंतर प्रवास डिजिटल होणार आहे. कागदी पासच्या जागी कॅशलेस तिकीट प्रणालीचा वापर होईल आणि स्वयंचलित नोंदींच्या माध्यमातून सुविधांचा गौरवापर थांबवता येणार आहे.
कोणत्या योजनांसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक
एसटी प्रवासात सवलतींसाठी सध्या अनेक योजना सुरू आहे. त्यापौकी महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांसाठी ५० टक्के सवलत, ६५-७५ वयोगटातील प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास, शालेय विद्यार्थ्यांसाठी ६६.६७ टक्के सवलतीसह मासिक पास आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत इयत्त १२ वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत पास या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे.
स्मार्ट कार्डसाठी प्रक्रिया काय?
प्रत्येक एनसीएमसी कार्ड प्रत्येक लाभार्थी प्रवर्गासाठी वेगवेगळ्या ओळखपत्राशी जोडले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी कार्डं त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले असतील, ज्येष्ठ नागरीक आणि महिलांना त्यांच्या आधार कार्डशी जोडून स्मार्ट कार्ड मिळतील, दिव्यांग व्यक्तींचे कार्ड त्यांच्या यूडीआयडी क्रमांकाशी जोडलेलं असेल. दरम्यान, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि राज्य पुरस्कार विजेत्यांना आपापल्या विभागीय मुख्यालयातून कार्ड मिळतील.
अधिकृत केंद्रांवर जाऊन एनसीएमसी कार्ड घेता येणार आहे. हे कार्ड केंद्रावर कॅश देऊन किंवा यूपीआयद्वारे रिचार्ज करता येतं. सवलतीच्या तिकिटांची रक्कम कार्डच्या वॉलेटमधून वजा केली जाईल. कार्डशिवाय प्रवास करणाऱ्यांना १ सप्टेंबरपासून पूर्ण भाडं भरावं लागणार आहे.

