Headlines

‘एआय’मुळे मंदी येईल?| Maharashtra Times


कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) झपाट्याने वाढणारा वापर अनेक क्षेत्रांतील रोजगारांवर परिणाम करत असून, ग्राहकांची क्रयशक्ती घटल्यास अर्थव्यवस्थेतील मागणी आणि विकासालाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'एआय'मुळे मंदी येईल
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीधर लोणी: अनेक उद्योग आणि व्यवसायात तज्ज्ञ, जाणकार आणि कुशल कर्मचाऱ्यांची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान घेत असल्याची बातमी काही नवीन नाही. विविध सल्लासेवांत ‘एआय’चा वापर वाढत असल्याच्या आणि त्यामुळे तेथील रोजगारांवर परिणाम होत असल्याच्या बातम्याही नव्या नाहीत. विविध प्रकारच्या रोजगारांत ‘एआय’ मानवाची जागा घेणार, हे कालचे भाकीत आजचे वास्तव आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, त्यातील एक कळीचा प्रश्न म्हणजे, ‘एआय’मुळे बाजारपेठेत मंदी येऊ शकते काय?

रोजगारांत मानवाची जागा घेणारे ‘एआय’ स्वत: ‘मानव’ नाही. त्याला मानवासारख्या गरजा नाहीत; ते खात-पित नाही, कपडे घेत नाही, वाहन वापरत नाही, घर घेत नाही, खरेदीसाठी बाजारात वा मॉलमध्ये जात नाही. त्यामुळे ते ग्राहक नाही! रोजगार असलेले लोक आपल्या कमाईचा मोठा वाटा वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीसाठी वापरत असतात. त्यांचे काम ‘एआय’ करू लागल्याने आणि त्यांना अन्य रोजगार न मिळाल्याने ग्राहक म्हणून त्यांची क्षमता काही प्रमाणात कमी होणार, यात शंका नाही. विविध क्षेत्रांत सध्या ‘एआय’चा वाढत असलेला वापर आणि भविष्यातील त्याची आणखी वाढणारी क्षमता पाहता, प्रचलित रोजगारांत मोठ्या प्रमाणावर कपात होण्याची शक्यता अधिक आहे.

प्रत्येक नवीन तंत्रज्ञान आधीच्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक गतीने लोकांपर्यंत पोहोचत असते. कम्प्युटर विकसित झाल्यानंतर तो सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ३० ते ३५ वर्षे लागली. जगातील वीस टक्के लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘पर्सनल कम्प्युटर’ला पंधरा वर्षे, स्मार्ट फोनला चार ते पाच वर्षे आणि इंटरनेटला दोन वर्षे लागली. या उलट पहिल्या दोन वर्षांतच ‘एआय’ ४० टक्के लोकांपर्यंत पोहोचले आहे. थोडक्यात, अन्य कोणत्याही तंत्रज्ञानाच्या प्रसारापेक्षा ‘एआय’चा प्रसार अधिक गतीने होतोय. अडीच वर्षांपूर्वी ‘एआय’कडे लोक कुतूहल म्हणून पाहत; ‘हे तंत्रज्ञान चांगले असले, तरी मानवासारखे काम करू शकेल काय,’ अशी साशंकता व्यक्त करीत. मात्र, ‘ग्लोबल एआय डिफ्युजन रिपोर्ट’च्या २०२६च्या अहवालानुसार, सध्या जगात एक अब्जाहून अधिक लोक ‘एआय टूल्स’चा वापर करीत आहेत. स्मार्ट फोन, समाज माध्यमे आदींचा विचार करता वापरणाऱ्यांची संख्या दीड अब्जांहून अधिक जाते. हा वापर केवळ ‘एआय’शी गप्पा मारणे किंवा त्याच्याकडून माहिती घेणे यांपुरता मर्यादित नाही, तर अनेक जण आपल्या व्यवसायाला अनुकूल असे ‘एआय’ प्रारूप विकसित करण्यासाठी होत आहे. पुढील पाच वर्षांत ‘एआय टूल्स’ वापरणाऱ्यांची संख्या तीन अब्जांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.

‘एआय’चा हा वाढता वापर अनेक क्षेत्रांतील रोजगाराच्या मुळावर येत आहे. जागतिक स्तरावर तंत्रज्ञान कंपन्यांनी ‘एआय’साठी केलेल्या फेररचनांत गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत दीड ते दोन लाख नोकऱ्या गेल्याची आकडेवारी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावरील परिणामही ठळकपणे दिसत असून, २०२५-२६ या काळात ४० हजार रोजगार गेल्याचे सांगितले जाते. नजीकच्या भविष्यात ‘एआय’मुळे आणखी मोठ्या प्रमाणावर रोजगारकपात होण्याचा इशारा ‘गोल्डमन सॅक्स’, ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’, ‘मॅकेन्झी’ आदी संस्थांनी दिला असून, काही नव्या रोजगारांच्या निर्मितीची शक्यताही वर्तविली आहे. मात्र, ‘एआय’ रोजगाराच्या मुळावर येत आहे, हे कटू सत्य आहे. या पार्श्वभूमीवर ‘उत्पादन, रोजगार, वेतन, खरेदी (मागणी), पुन्हा उत्पादन’ हे पारंपरिक अर्थचक्र धोक्यात येण्याची आणि त्यामुळे मंदी निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. ती प्रत्यक्षात येऊ नये यासाठी ‘एआय’च्या वापराला मानवी चेहरा देण्याची, नवीन रोजगार निर्माण होण्याची आणि कल्पक उपायांची गरज आहे.

Shridhar.Loni@timesofindia.com

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा