Headlines

अवघ्या 72 तासांत 2.7 लाख फोन बुक! सॅमसंगच्या नव्या ‘Galaxy Z Fold 8’ आणि ‘Flip 8’ ने स्मार्टफोन मार्केट हलवले। Maharashtra Times


सॅमसंग कंपनीने भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. सॅमसंगच्या नुकत्याच लाँच झालेल्या ‘Galaxy Z Fold 8’ आणि ‘Galaxy Z Flip 8’ या नव्या फोल्डेबल स्मार्टफोन्सनी अवघ्या 72 तासांत तब्बल 2,71,000 बुकिंग्सचा टप्पा पार करत प्री-ऑर्डरचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Samsung Galaxy Z Fold 8। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
सॅमसंगच्या नुकत्याच लाँच झालेल्या ‘Galaxy Z Fold 8’ आणि ‘ Galaxy Z Flip 8 ‘ या नव्या फोल्डेबल स्मार्टफोन्सने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. 72 तासांत तब्बल 2,71,000 बुकिंग्सचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या वर्षी सॅमसंगला जेवढ्या प्री-ऑर्डर्स मिळवण्यासाठी तब्बल 15 दिवस लागले होते, तेवढा पल्ला कंपनीने यंदा अवघ्या 3 दिवसांत गाठला आहे. विशेष म्हणजे मोठ्या शहरां सोडून भारताच्या छोट्या शहरांमधूनही (टियर-2 आणि टियर-3) या महागड्या आणि प्रगत फोल्डेबल फोन्सना ग्राहकांकडून खूप मोठी मागणी आल्याचे सॅमसंगने सांगितले आहे.

नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, सध्या सुरू असलेल्या प्री-ऑर्डरच्या काळात ‘Galaxy Z Fold 8’ ला ग्राहकांकडून खूप जास्त पसंती मिळत आहे. यापूर्वी याविषयी कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नव्हती. मात्र, आता स्वतः सॅमसंगने जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतात ‘Galaxy Z Fold 8’ मालिका आणि ‘Galaxy Z Flip 8’ च्या प्री-ऑर्डर्सबाबत अधिकृत माहिती जाहीर केली असून, हा आजवरचा सर्वात मोठा रेकॉर्ड ठरला आहे.

फीचर्स कोणते?

  • कॅमेरा सेटअप: मागील बाजूस तीन कॅमेरे, 200MP वाइड अँगल, 50MP अल्ट्रा-वाइड अँगल आणि 10MP टेलिफोटो सेन्सर, सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर दिला आहे.
  • प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरेशन 5 चिपसेट, 16 जीबी पर्यंत रॅम आणि 1 टीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. या फोल्डेबल फोनमध्ये ग्रेफाइट कूलिंग स्ट्रक्चरचा वापर केला आहे.
  • कनेक्टिव्हिटी: Wi-Fi 7, 5 जी, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप सी पोर्ट आहे. फोनमध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.
  • बॅटरी: 45 W वायर्ड चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, 20W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.

72 तासांच्या आत तब्बल 2,71,000 फोन्स बुक

ज्या बाजारपेठेत हा नवा रेकॉर्ड झाला आहे ती बाजारपेठ म्हणजे भारत आहे, जो तांत्रिकदृष्ट्या पृथ्वीवरील दुसरा सर्वात मोठा स्मार्टफोन बाजार आहे. सॅमसंगने जाहीर केले आहे की त्यांनी नव्या फोल्डेबल कारभारासाठी (लाईनअप) विक्रमी संख्येने प्री-ऑर्डर्स मिळवल्या आहेत. अवघ्या पहिल्या 72 तासांच्या आत तब्बल 2,71,000 फोन्स बुक झाले आहेत.

गेल्या वर्षी, कंपनीला ‘Galaxy Z Fold 7’ आणि ‘Galaxy Z Flip 7’ या फोन्ससाठी एवढ्या मोठ्या संख्येपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 15 दिवस लागले होते. याव्यतिरिक्त, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘Galaxy Z Fold 8’, ‘Galaxy Z Fold 8 Ultra’ आणि ‘Galaxy Z Flip 8’ च्या एकूण प्री-ऑर्डर्सपैकी 45 टक्के ऑर्डर्स या टियर-2 शहरे आणि त्याहून लहान गावांमधून आल्या आहेत. सॅमसंगच्या मते, हे भारतातील एका “अफाट आणि अजूनही न गाठलेल्या बाजारपेठेच्या क्षमतेकडे” बोट दाखवते.

सॅमसंग कंपनी या रेकॉर्डला फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या क्षेत्रातील एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल मानते. याचे कारण काय? तर सॅमसंगच्या दृष्टीकोनातून, हा बदल “ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतीक आहे, जिथे नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पना आता केवळ मोठ्या मेट्रो शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही.”

भारतातील किमती बऱ्याच जास्त आहेत?

  • भारतात या फोन्सच्या किमती साहजिकच अमेरिका, युरोप आणि कोरियापेक्षा वेगळ्या आणि जास्त आहेत. भारतातील किमती खालीलप्रमाणे आहेत:
  • Galaxy Z Flip 8: या फोनची किंमत 1,24,999 रुपयांपासून ($1,306) सुरू होते.
  • Galaxy Z Fold 8 (बेस मॉडेल): या मॉडेलची किंमत 1,79,999 रुपये ($1,881) आहे.
  • Galaxy Z Fold 8 Ultra: या सर्वात महागड्या मॉडेलची किंमत 1,99,999 रुपयांपासून ($2,090) सुरू होते.
शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा