![]()
‘१ झपूर्झा, साहित्य सहवास, वांद्रे पूर्व’ आमचा सध्याचा पत्ता. गेली जवळ जवळ ५७ वर्षं आमचा हाच पत्ता आहे. केवढ अप्रूप होतं मला या पत्त्याचं! आमचं आमच्या मालकीच हे पहिलंवहिलं घर. लहानपणापासून ज्या साहित्याची ओढ होती, कौतुक होतं, त्या साहित्याच्या सहवासातच मी पुढे आयुष्यभर राहणार होते. तसं तर माझा नवरा – नारायण आठवले (नाना) – साहित्यिकच होता. म्हणजे त्या दृष्टीने मी साहित्य सहवासात असणारच होते, पण हे वेगळंच होत. नवरा साहित्यिक होता, तरी तो नवरा होता, माझ्याशी वादावादी करणार होता, भांडणार होता. इथे तसं काही होणार नव्हतं. मी आदराने कधी कोणाकडे गेले, तर माझं अगत्याने स्वागत होणार होतं. मी, काय लिहिते, वाचते याची विचारणा होणार होती, नव्हे झालीच. म्हणून मलाही लिहावंसं वाटायला लागलं आणि मी लिहिलंही थोडफार. त्यातूनच, अनुराधा पुनर्वसु, या लेखिकेचा जन्म या ‘१ झपूर्झा’ मध्ये झाला. त्याच खरं श्रेय अर्थात माझ्या साहित्यिक नवऱ्याचंच.
आमचे सख्खे शेजारी २ झपूर्झा मध्ये राहणारे रा. भि. जोशी – ज्यांची शाळकरी वयात वाचलेली ‘गरिबाची अधेली’ ही कथा डोक्यात ठाण मांडून बसलेली होतीच. शिवाय ते आता नुसतेच रा. भि. नव्हते, ते आता जोशी काका होते. ते आणि जोशी काकू, सुधाताई, दोघांनीही मला घरी बोलवून माझ्या पुढ्यात बसून माझ्या ‘अस्सा नवरा’ या पहिल्यावहिल्या पुस्तकाचं मन(माझं)भरून कौतुक केल होत. पुस्तक त्यांना का आवडल, कोणती उपमा, कोणती वाक्यं त्यांना आवडली, हे सुद्धा नेमकेपणाने सांगितलं. त्या नंतर कधीच, कोणाही कडून माझं असं कौतुक मी अनुभवलं नाही. साहित्य सहवासातल्या आयुष्याचा हा माझा सर्वांत मोठा ठेवा होता आणि आहे. या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा आमच्या झपूर्झा इमारतीच्या गच्चीवर झालं होतं. त्या वेळी वसंत सबनीसांच कथाकथन झालं होतं.
आमच्या वरच्या मजल्यावर ‘३ झपूर्झा’ मध्ये अनंत काणेकर राहायचे. दार उघडलं की कधी वर जाणारे किंवा खाली उतरणारे काणेकर दिसायचे, पण कधीही दोन शब्द बोलल्याशिवाय पुढे जायचे नाहीत. मग मला त्यांच्यापेक्षा माझंच कौतुक वाटायचं.
आमच्या कॉलनीची निर्मिती ज्या प्रतिभावंतांच्या प्रेरणेतून झाली, त्याच आचार्य अत्रे आणि अनंत काणेकर यांनी साहित्य सहवासातील इमारतींना आकर्षक आणि समर्पक नाव दिली. आमचं झपूर्झा, समोर आनंदवन , त्याच्या मागे शाकुंतल , झपूर्झाच्या शेजारी अभंग, त्याच्या बाजूला वाग्वैजयंती, मग उष:काल, रागिणी, पुढे ज्ञानदेवी आणि त्यानंतर फुलराणी.
‘आनंदवन’मधल्या चवथ्या मजल्यावरच्या बाल्कनीत बसलेले विंदा आणि सुमाताई यांना आमच्या पहिल्या मजल्यावरच्या स्वयंपाकघरातला माझा वावर सहज दिसायचा. एकदा मी सिंकपाशी उभी राहून काहीतरी घासत होते. तेवढ्यात विंदांची सूचना, ‘वहिनी, ते रांगोळीने घासा. पटकन स्वछ होईल.’ आमच्या विंदांना ‘ज्ञानपीठ’ मिळालं तेव्हा नानांनी त्यांच्या इमारतीला आणि कॉलनीच्या गेटला रोषणाई करून आनंद व्यक्त केला. त्यातही सांगण्यासारखी गोष्ट अशी की रोषणाई करणाऱ्या दुकानदाराला ही गोष्ट कळल्यावर त्यांनी नानांकडून पैसे घेतले नाहीत. आमच्या आनंदात तोही अशा तऱ्हेने सहभागी झाला होता.
याच ‘आनंदवन’मध्ये पहिल्या मजल्यावर डॉ. पु. ज. देवरस राहायचे. ‘साहित्य सहवास’ची सर्वांचं लक्ष वेधून घेणारी बाग उभी करायचं श्रेय त्यांचंच. कदंब, कैलासपती सारखी दुर्मीळ झाडं त्यांनीच इथे रुजवली. ‘शाकुंतल’मध्ये राहणारे धर्मवीर भारती सुद्धा वृक्षवल्लरीना अगत्याने सोयरे मानणारे. त्यांनी सुद्धा कॉलनीत बरीच झाडे रुजवली. कॉलनीतली सातवण – सप्तपर्णी – पहिल्यांदा फुलली याची ‘गंध वार्ता’ त्यांनी किती कौतुकाने अख्ख्या कॉलनीला कळवली होती. त्यांनी तसा एक बोर्ड करून झाडावर अडकवला होता.
एखाद्या अबोल पण कामसू गृहिणी प्रमाणे पांढरा चाफा बागेत सतत फुलत असतो, आपला परिसर मंद सुगंधाने सुखवित असतो. रातराणीचं रात्रभराचं सुगंधी अधिराज्य संपवत प्राजक्त आपल्या नाजुक देहाला न पेलवणारा गंधभार पहाटवाऱ्यावर उधळीत असतो. विविध फुलापानांनी आमची बाग सदैव अशी बहरत असते.
रात्रीच्या वेळी गंगाधर आणि वासंतीबाई गाडगीळ यांची कॉलनीत फेरी असायची. मी आणि आश्लेषा आम्ही दोघी देखील रात्री कॉलनीत फिरायचो. त्याच वेळी अश्विनी भिडे-देशपांडे आणि निरंजनी या माय लेकी सुद्धा फिरत असायच्या. एकदा फिरता फिरता थांबून अश्विनी हातातला बकुळाच्या फुलांचा गजरा दाखवत म्हणाली, ‘बकुळाचा घमघमाट आणि सडा पाहून मला राहवलं नाही. मी तनुजाला सुईधागा घेऊन यायला सांगितलं, आणि मग बकुळीखालीच उभं राहून हा गजरा बनवला.’ या परता सुखोपभोग तो कोणता?
‘आनंदवन’मध्येच काही वर्षांनी य. दि. फडके राहायला आले. त्यांची पत्नी वासंतीबाई आणि मी समवयस्क. साधारण समान आवडीनिवडीमुळे आमच्यात विशेष जवळीक निर्माण झाली. हळूहळू साहित्यिकांच्या सहवासाने कॉलनी फुलू लागली. परस्परांच्या ओळखी वाढायला लागल्या. काहींचे कौटुंबिक संबंध नव्याने जुळत गेले. ज्यांचे आधी पासून होते, ते अधिक घट्ट होत गेले.
रोजच्या व्यापातापातून निवृत्त झालेल्या, लेखन वाचनाची विशेष आवड असलेल्या माझ्यासारख्या आम्ही काही जणी रोज संध्याकाळी एकत्र बसू बोलू लागलो. ताई काणेकर आणि सुमाताई करंदीकर या दोघी जणी ‘झपूर्झा’च्या कट्ट्यावरच बोलत बसायच्या. बोलणाऱ्यांची आणि बसणाऱ्यांची संख्या वाढायला लागली तशी ‘झपूर्झा’चा कट्टा अपुरा पडु लागला आणि बसणाऱ्यांच्या गरजेतून आजचा कट्टा उभा राहिला. हा कट्टासुद्धा लेखिका दीपा गोवारीकर यांचा मुलगा अविनाश, प्रसिद्ध फोटोग्राफर, याने खास लक्ष घालून उभा केला. कट्ट्यावरची उपस्थिती वाढत होती, वाढत आहे. विजयाबाई ( राजाध्यक्ष), मी, वासंतीबाई फडके, दीपाताई, आम्ही काही वाचलेलं, काही स्वतः लिहिलेलं, एकमेकींना वाचून दाखवू लागलो. त्यात रस असणाऱ्या एकएकजणी येत राहिल्या, आमच्या वेगवेगळ्या उपक्रमांत भाग घेत राहिल्या. हे सगळं बघणारी शाझिया गोवारीकरसारखी ‘साहित्य सहवास’ची साहित्यप्रेमी सून इतकी प्रभावित झाली, की तिने चक्क आम्हा लेखिकांना मुद्दाम लिहायला लावून, सर्वस्वी स्वतःच्या हिमतीवर, जबाबदारीवर ‘कट्ट्यावरच्या गप्पा’ (हे नाव विजयाबाईंनी सुचवलं होतं), हे पुस्तक तयार केलं. कॉलनीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात हे पुस्तक समारंभपूर्वक आमच्या हाती तिनं सोपवलं. सर्वार्थाने हा अगदी ‘ना भूतो ना भविष्यती’ असा ठेवा आमच्या पदरात पडला. हे पदर सुद्धा तिनेच आम्हाला दिले. हो, तिने सगळ्या लेखिकांना एक साडी आणि पुस्तकाच्या दोन प्रती आश्विनीच्या हस्ते आम्हाला दिल्या!
‘१ झपूर्झा, साहित्य सहवास’ ने असं आणखी काय काय अनुभवल’ म्हणून सांगू! सोपानदेव चौधरी यांच’ काव्य गायन, त्यांच्या अगदी पुढ्यात बसून ऐकता आलं. निरंजन उजगरे क्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि नारायण सुर्वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले म्हणून त्यांचा सत्कार आम्ही याच ‘१ झपूर्झा’ मध्ये केला. या वेळी विंदा आणि सुमाताई करंदीकर यांनाही आम्ही बोलावलं होतं. या मागे अर्थातच नानांचं साहित्यिक मित्रांविषयीचं अगत्य हेच कारण होतं. अरविंद गोखले, के. ज. पुरोहित, विजया राजाध्यक्ष, म. वा. धोंड, दि. के. बेडेकर, मधुकर तोरडमल अशी मंडळी काही ना काही निमित्ताने इथे येऊन गेली आहेत. डॉक्टर वसंत अवसरे तर इथे दोन दिवस राहूनही गेले आहेत. अ. का. प्रियोळकर, मे. पु. रेगे अशा मोठ्या माणसांचा साहित्य सहवासातला वावर पाहता आला. डॉक्टर अशोक रानडे यांच्या सारख्या संगीत तज्ज्ञाचा थोडा फार सहवास लाभला. डॉ. बाळ फोंडक्यांसारखे श्रेष्ठ शास्त्रज्ञ आमच्या मैत्रिमंडळात सहज सामील झाले. मधुसूदन कालेलकर यांच्यासारख्या नाटककाराने नानांच्या ‘मी हरिणी, मीच व्याध’ या कादंबरीवर आधारलेलं ‘ही वाट दूर जाते’ हे नाटक केलं. नानांच्या ‘नाही प्रीत पतंगाची खरी’ या कादंबरीवरून करण्यात आलेल्या ‘आहुती’ या चित्रपटाला त्या वर्षीचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला. या दोन्ही गोष्टींनी ‘१ झपूर्झा’च्या आनंदात भरच घातली.
हे सगळं लिहिताना मला अचानक कोलंबीच्या भज्यांचा सुवास जाणवतो आहे. ही भजी सुद्धा ‘१ झपूर्झा’ मध्येच तळून नानांनी कॉलनीच्या एका फन फेअर मध्ये नेली होती. वर एक बोर्ड लावला – ‘कोकणस्थ ब्राह्मणाच्या हातची शुद्ध कोलंबीची भजी’ सर्वांनीच यातली गंमत अनुभवत भज्यांचा आस्वाद घेतला होता.
असंच काही ना काही साहित्य सहवासातल्या लहान मोठ्या सगळ्यांपाशी असेल. मी हे लिहून व्यक्त केलं इतकच. कारण मी आता मावळतीच्या तीरावर आहे. माझेही हर्ष खेद मावळत आहेत, पण ‘१ झपूर्झा आणि साहित्य सहवास’ सुद्धा मावळतीकडे चाललं आहे हे कंटकशल्य मात्र बोथटणं कठीण आहे. कारण मनोमनी ‘१ झपूर्झा, गडे १ झपूर्झा’ हेच राहील.
