महिलांच्या शरीररचनेमुळे लघवीच्या मार्गाला संसर्ग होण्याचा धोका तुलनेने जास्त असतो. त्यामुळे लघवीनंतर प्रायव्हेट पार्टची स्वच्छता योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. पुढून मागे स्वच्छ करणे, भाग कोरडा ठेवणे, साबण किंवा जोरदार जेट स्प्रेचा वापर टाळणे यासारख्या छोट्या सवयी संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. UTI, फंगल इन्फेक्शन किंवा सतत खाज-जळजळ होत असल्यास स्वतःहून उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

लघवीनंतर स्वच्छता करण्याची योग्य पद्धत आणि दिशा
लघवी केल्यानंतर संबंधित भाग स्वच्छ करताना नेहमी सौम्य आणि कोमट पाण्याचा वापर करणे पसंत केले पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता करताना पाण्याचा किंवा पुसण्याचा हात हा नेहमी ‘पुढून मागच्या बाजूला’ (Front to back) असावा, तो कधीही ‘मागून पुढच्या बाजूला’ (Back to front) असू नये. स्वच्छतेची चुकीची पद्धत वापरल्यास गुदद्वाराजवळील जिवाणू (लघवीच्या आणि योनीच्या मार्गाकडे ओढले जातात, जे महिलांमधील युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) साठी मुख्यत्वे कारणीभूत ठरतात. याव्यतिरिक्त, जिवाणू आणि बुरशी यांना वाढण्यासाठी ओलसर वातावरण लागते, त्यामुळे लघवीनंतर धुण्यासोबतच तो भाग नेहमी कोरडा ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
स्वच्छतेसाठी साबण आणि जेट स्प्रेचा वापर करावा का?
खाजगी भाग स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करणे अजिबात योग्य नाही आणि असा सल्ला दिला जात नाही. कारण साबणामध्ये असणारे रसायने त्या नाजूक भागातील त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात, ज्यामुळे तिथे जळजळ, खाज किंवा ॲलर्जी निर्माण होऊ शकते. स्वच्छतेसाठी साधे कोमट पाणी आणि पाण्याचा हलका फवारा पुरेसा असतो. आंघोळीचा किंवा टॉयलेटमधील तीव्र दाबाचा ‘जेट स्प्रे’ वापरणे टाळावे. साबणासारख्या तीव्र रासायनिक घटकांऐवजी केवळ कोमट पाण्याचा सौम्य वापर करणे हे त्वचेचे नैसर्गिक आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत सुरक्षित मानले जाते.
लघवीनंतर खाजगी भाग स्वच्छ करण्याचे आरोग्यदायी फायदे
लघवी झाल्यानंतर खाजगी भागाची योग्य प्रकारे स्वच्छता करणे हे महिलांच्या दैनंदिन आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. लघवीनंतर नियमित आणि योग्य पद्धतीने स्वच्छता केल्याने खालील महत्त्वाचे फायदे होतात:
- त्वचेची स्वच्छता (Skin hygiene) उत्तम प्रकारे राखली जाते.
- दुर्गंधी येण्याची समस्या कमालीची कमी होते.
- त्वचेची होणारी जळजळ आणि चट्टे पडणे थांबते.
- युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) आणि फंगल किंवा यीस्ट इन्फेक्शनचा (Yeast infections) धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. त्यामुळे स्वच्छतेची योग्य सवय महिलांना अनेक संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवते.
लघवीचा pH म्हणजे काय आणि तो वाढल्यास काय घडते?
pH हे कोणत्याही द्रवाचे आम्लयुक्त (Acidic) किंवा अकॅलाइन (Alkaline) स्वरूप मोजण्याचे एक परिमाण आहे. मानवी लघवीचा एक विशिष्ट pH असतो, जो सहसा ४.५ ते ८ या रेंजमध्ये असतो. लघवीचा हा pH तुम्ही दिवसभरात काय खाता, कोणती औषधे घेता आणि शरीरात पाण्याचे प्रमाण किती आहे यावर पूर्णपणे अवलंबून असतो. जेव्हा लघवीचा pH वाढतो, तेव्हा लघवी अल्कलाइन बनते. अशी अल्कलाइन लघवी ही मूत्रपिंडात खडे तयार होण्यासाठी अत्यंत अनुकूल मानली जाते. तसेच काही विशिष्ट जिवाणू अल्कलाइन लघवीमध्ये अधिक वेगाने वाढतात. म्हणूनच, लघवीचा pH योग्य पातळीत राखणे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते.
महिलांनी ‘हे’ लक्षात ठेवावे
महिलांनी आपल्या शरीराच्या रचनेचे गांभीर्य समजून घेऊन दैनंदिन स्वच्छतेबाबत जागरूक राहिले पाहिजे. लघवीनंतर केवळ पाणी मारून सोडून न देता, ती जागा कोरडी राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. ओलावा आणि चुकीच्या दिशेने केलेली स्वच्छता हेच फंगल इन्फेक्शन, व्हॅजायनायटिस आणि युरीनरी संसर्गाचे मुख्य मूळ असते. जर कोणत्याही महिलेला पांढऱ्या स्रावाचा त्रास, सतत खाज किंवा लघवी करताना जळजळ जाणवत असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता किंवा संसर्ग स्वतःहून बरा होईल अशी वाट न पाहता त्वरित तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. योग्य वेळी केलेले निदान आणि उपचार पती-पत्नी दोघांनाही वारंवार होणाऱ्या संसर्गापासून सुरक्षित ठेवतात.
आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले
आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.
- नवीन आवृत्ती
- Aug 31, 2026, 12:57 PMMedically Reviewed byDr. Dr Arati Adhe Rojekar
- Aug 31, 2026, 12:57 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम
