त.भा.प्रतिनिधी
पुणे
प्रशांत महासागरात यावर्षी निर्माण झालेला एल निनो आतापर्यंतचा सर्वात तीव्र एल निनो ठरणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर(सीपीसी) ने वर्तविला आहे. हवामानाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असून, यामुळे भविष्यात हवामानाच्या दृष्टीने तीव्र स्वरुपाच्या घटना अनुभवण्यास मिळण्याचा इशारा आहे.
1950 साली निर्माण झालेला एल निनो हा अत्यंत तीव्र स्वरुपाचा होता. त्यानंतर 2023 सालच्या एल निनोमुळे 2024 हे वर्ष आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण ठरले आहे. यावर्षी जुलै महिन्यात प्रशांत महासागरात एल निनो निर्माण झाला असून, ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान त्याची तीव्रता सर्वाधिक असणार आहे.
2027 सालपर्यंत याचा प्रभाव राहणार आहे. यामुळे वातावरणात 2 अंश सेल्सिअसने फरक पडण्याची शक्यता आहे. सध्या विषुववृत्तीय पॅसिफिकच्या एका निश्चित पट्ट्यात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा 1.2 अंश सेल्सिअसने जास्त आहे, असे सीपीसीने म्हटले आहे.
जगभरातील हवामानावर परिणाम
दरम्यान, एल निनोमुळे जगभरातील हवामानावर परिणाम होणार आहे. यामुळे मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिकमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्मयता वर्तवण्यात आली आहे, तर उष्णकटिबंधीय हिंद महासागर, भारतीय उपखंड आणि ऑस्ट्रेलियाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्मयता अधिक आहे.
उत्तर गिनीच्या आखाताला लागून असलेल्या भूभागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. याउलट ग्रेटर हॉर्न ऑफ आफ्रिकामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मध्य अमेरिका, पॅरिबियन आणि वायव्य दक्षिण अमेरिकेच्या काही भागांसाठीही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. याउलट नैऋत्य अमेरिकेच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्मयता अधिक आहे. युरोपमध्ये, अंदाजानुसार उत्तर-दक्षिण दिशेत फरक दिसून येतो, ज्यात दक्षिण युरोपमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची आणि उत्तर युरोपमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्मयता वाढली आहे.
