Headlines

Vadhavan Port: वाढवण बंदर महामार्ग प्रकल्पात फसवणूक; आदिवासी कुटुंबाचे 50 लाख लुबाडले, प्रशासकीय त्रुटींचा दलालांकडून गैरफायदा


Vadhavan Port Highway: देशातील सर्वांत मोठ्या बंदराला जोडण्यासाठी महामार्ग उभारला जात असून त्या कामांच्या भूसंपादन प्रक्रियेत एक मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कागदत्र देण्याच्या प्रक्रियेदरम्यान या आदिवासी परिवाराची फसवणूक झाली.

वाढवण बंदर फसवणूक
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, पालघर: देशातील सर्वांत मोठ्या वाढवण बंदरासाठी उभारल्या जाणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या भूसंपादनात डहाणू तालुक्यातील तवा येथील एका आदिवासी कुटुंबाची ५०.२८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. २.९३ कोटी रुपयांच्या मोबदल्यातून दलाल, प्रशासनातील कंत्राटी व कनिष्ठ कर्मचारी तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ही लुबाडणूक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

किरण पालवा व कुटुंबीयांना जमिनीचा मोबदला लवकर मिळवून देण्याचे आमिष दाखवत तीन दलालांनी मोबदल्यातील निम्मी रक्कम मागितली. पालवा यांनी त्यांना नकार दिला. मात्र, संमतीपत्र व कागदपत्रांच्या प्रक्रियेदरम्यान दलाल सतत त्यांच्यासोबत असत.

Maharashtra TimesMHADA lottery 2026: म्हाडाच्या घरांसाठी अक्षरशः झुंबड! मुंबईतल्या 2640 घरांसाठी 82 हजारांहून अधिक अर्ज, शेवटचे 3 दिवस बाकी

दुसऱ्याच बँकेत खाते उघडले

तवा येथील किरण पालवा व त्यांच्या चार नातेवाईकांच्या १२५ गुंठे जमिनीसाठी भूसंपादन विभागाने २.९३ कोटींचा मोबदला मंजूर केला होता. इतर वाटेकऱ्यांचे संमतीपत्र २० एप्रिलला भूसंपादन विभागाकडे सादर केले होते. मोबदल्याची रक्कम महाराष्ट्र बँकेच्या कासा शाखेत जमा करण्यासाठी प्रक्रियाही पूर्ण झाली होती. त्यानंतर किरण पालवा यांच्या पॅनकार्ड व बँक खात्यात तांत्रिक अडचण असल्याचे सांगून २१ एप्रिलला बोईसरला बोलवून बायोमेट्रिक करण्यात आले. प्रत्यक्षात ही कृती करताना, पालवा यांना न सांगता बोईसरच्या कोटक महिंद्रा बँकेत त्यांचे बचत खाते उघडण्यात आले.

महिनाभरानंतरही मोबदला न मिळाल्याने पालवा यांनी चौकशी केली असता संपूर्ण रक्कम अदा झाल्याचे समोर आले. त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेतील तपासणीत खात्यातील ५०.२७ लाख रुपये विविध व्यवहारांतून परस्पर वापरल्याचे उघड झाले. त्यात रोख रक्कम काढणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, मद्यखरेदी तसेच इतर खात्यांमध्ये पैसे वर्ग केल्याचे आढळले. या प्रकरणी पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या सूचनेनंतर बोईसर एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बोईसरमध्ये दलाल व बँक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने किरण पालवा यांच्या बायोमेट्रिक्स पडताळणीआधारे कोटक बँकेत खाते उघडल्याचा आरोप आहे. त्यांना वेलकम किट दिले नाही. मोबदल्याची रक्कम महाराष्ट्र बँकेऐवजी कोटक बँकेत जमा करण्यात आली. पालवा यांच्या पॅनकार्डवर स्वाक्षरी असतानाही प्रक्रिया अंगठ्याद्वारे पूर्ण केली. लाभार्थी एकदाही बँकेत न जाता कोट्यवधींचे व्यवहार झाल्याने अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताचा आरोप होत आहे.

Maharashtra TimesVadhavan Port: वाढवण बंदराचं भविष्य धोक्यात? जमीन संपादन प्रक्रियेत दिशाभूल, 40 हजार झाडांची कत्तल; अनेक आरोपांमुळे प्रकल्पाला विरोध

प्रशासकीय त्रुटींचा दलालांकडून गैरफायदा

‘ग्रीनफिल्ड महामार्ग (वाढवण बंदर) प्रकल्प राष्ट्र हिताचा प्रकल्प असल्याने नियमांच्या चौकटीत राहून लाभार्थ्यांना मोबदला मिळावा, यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. भूसंपादन मोबदल्याविषयी तक्रारींची तातडीने चौकशी करून कारवाई केली जाईल,’ असे प्रभारी जिल्हाधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा