Headlines

USS Abraham Lincoln: USच्या युद्धनौकेवर गंभीर परिस्थिती; खलाशांकडून जीव देण्याचे प्रयत्न, अमेरिकेत संतापाची लाट


USS Abraham Lincoln: अमेरिकेच्या युद्धनौकेवरील खलाशांनी जीव देण्याचे प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत.

US trump lincon
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तेहरान: मध्य पूर्वेतील तणावाची स्थिती पाच महिन्यांनंतरही कायम आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष संपलेला नाही. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरील दबाव कायम आहे. अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौका मध्य पूर्वेत तैनात आहे. प्रदिर्घकाळ प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असल्यानं खलाशांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे. यामुळे खलाशांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. नौदलाविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

मध्य पूर्वेत तैनात असलेल्या अब्राहम लिंकन युद्धनौकेवरील अनेक खलाशांनी समुद्रात उडी मारण्याचे प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युद्धनौकेवरील परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचा इशारा खलाशांच्या कुटुंबियांनी आणि अमेरिकेच्या खासदारांनी दिला आहे. अब्राहम लिंकन युद्धनौकेवर ५ हजार कर्मचारी आहेत. ते सलग २५० दिवसांपासून समुद्रात आहेत. इतका मोठा कालावधी समुद्रात घालवल्यानं त्यांची मानसिक स्थिती हळूहळू बिघडू लागली. ही युद्धनौका मे महिन्यात अमेरिकेला परतणार होती. तसं नियोजन आधीच झालेलं होतं. पण युद्धाशी संबंधित मोहिमांमुळे युद्धनौका मध्य पूर्वेतच ठेवण्यात आली.

USS

द गार्डियन आणि द हिलनं दिलेल्या वृत्तानुसार, खलाशांनी समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या खुलाशांच्या कुटुंबियांनी या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अनेक खलाशांच्या मनात जीव देण्याचे विचार येत आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक चिंतेत आहेत.

गेल्या गुरुवारी सॅन डिएगोमध्ये जवळपास २०० कुटुंबियांची एका सभागृहात भेट झाली. त्या बैठकीत कार्यवाहक नौसेना सचिव हंग काओ आणि वरिष्ठ कमांडर्सच्या समोर कुटुंबियांनी त्यांची समस्या, व्यथा मांडल्या. तिथे असलेल्या एका महिलेनं तिच्या पतीनं पाठवलेला मेसेज अधिकाऱ्यांना वाचून दाखवला. उद्या सकाळी मी उठणार नाही, अशी अपेक्षा आहे, असा मेसेज पतीनं केल्याचं पतीनं सांगितलं.

uss lincoln

नौदलाच्या नेतृत्त्वानं आपला विश्वासघात केल्याचा आरोप दुसऱ्या एका खलाशाच्या कुटुंबियानं केला. ‘ड्युटीचा कालावधी वारंवार वाढवण्यात आल्यानं माझ्या पतीनं समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. मी घाबरलो असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्याला अपमानास्पदरित्या सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, अशी भीती त्यांना वाटते. माझे पती अतिशय थकून गेले आहेत,’ असं एनाबेल लोमा यांनी सांगितलं. त्यांचे पती अब्राहम लिंकन युद्धनौकेवर तैनात आहेत.