Headlines

US Iran Peace Deal: ट्रम्प यांचा दावा फुसका! US-इराण करारात अखेरच्या क्षणी गेम; होर्मुझचा विषय जगाला ‘महागात’ पडणार


US Iran Peace Deal: अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या साडे तीन महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपल्याची घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. दोन्ही देशांत झालेल्या करारात अखेरच्या क्षणी महत्त्वाचा ट्विस्ट आला.

iran us and hormuz
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या १०७ दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धाचा शेवट करण्यासाठी शांती कराराची घोषणा झाली. या करारानंतर जगानं सुटकेचा निश्वास टाकला. आता या घटनाक्रमात नाट्यमय वळण आलं आहे. युद्ध संपल्याची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांनंतर इराणनं एक मोठा दावा केला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यावसायिक जहाजांकडून इराण आणि ओमान कर किंवा महसूल आकारू शकतात, अशी तरतूद अमेरिकेसोबत झालेल्या करारात असल्याचा दावा इराणनं केला आहे.

इराणची सरकारी वृत्तसंस्था फार्सनुसार, अखेरच्या क्षणी ऐतिहासिक कराराच्या मसुद्यात काही महत्त्वाचे आणि मोठे बदल केले गेले. त्यामुळे अमेरिका बॅकफूटवर गेली. अखेरच्या क्षणी गेम झाल्यानं २० टक्के तेल वाहतूक होत असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणचं वर्चस्व अधिक मजबूत होणार आहे.
Maharashtra TimesDonald Trump: भारतीय जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! ट्रम्प यांनी इराणवर खापर फोडलं; वातावरण तापलं
अखेरच्या मिनिटाला करारात बदल
इराणी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चा अंतिम टप्प्यात असताना कराराच्या मसुद्यात बदल करण्यात आला. त्यामुळे इराणला फायदा झाला. मसुद्यात करण्यात आलेल्या बदलांमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराण आणि ओमानचं सार्वभौमत्व अधोरेखित झालं आहे. अंतिम करारात होर्मुझ सामुद्रधुनीतील मॅरिटाईम सर्व्हिसेसचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे या मार्गातून होणाऱ्या वाहतुकीचं भविष्य आता इराण आणि ओमानच्या हाती असेल. करारात मॅरिटाईम सर्व्हिसेस या शब्दांचा उल्लेख झाल्यानं इराणला मोठा फायदा होणार आहे.

जहाजांकडून कराची वसुली करण्याचा इराणचा अधिकार अमेरिकेनं मान्य केला आहे. सुरुवातीचे ६० दिवस इराण जहाजांना कोणत्याही शुल्काशिवाय होर्मुझमधून जाऊ देईल. त्यानंतर मात्र इराण आणि ओमान यांच्याकडून शुल्क आकारणी केली जाईल. अमेरिकेसोबत झालेल्या करारात याचा अगदी स्पष्ट उल्लेख आहे. होर्मुझ मार्गातून होणाऱ्या कमाईचा वापर इराण त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी करेल.
Maharashtra TimesMiddle East Crisis: प्रत्येक घरात हाहाकार माजला असता! कतारनं इराणला मोठी ऑफर दिलेली; नाकारल्यानं जगावरचं संकट टळलं
होर्मुझमधून इराण अब्जावधी डॉलर्सची कमाई करू शकेल. या पैशांचा वापर देशाच्या आर्थिक विकासासाठी केला जाईल. युद्धामुळे इराणचं बरंच नुकसान झालं आहे. होर्मुझच्या दुसऱ्या टोकाला ओमान आहे. त्यामुळे या करारात ओमानचादेखील समावेश करण्यात आला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली होईल आणि इथला प्रवास टोल फ्री असेल, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. पण तो फुसका ठरताना दिसत आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा