Headlines

US Attack Oil Tanker: हल्ला झालाय, आग लागलीय, जहाज बुडतंय! USच्या हल्ल्यानंतर 24 भारतीय संकटात, मदतीसाठी SOS कॉल


US Attack Oil Tanker: मध्य पूर्वेतील तणावाची स्थिती कायम आहे. भारतीय खलाशी असलेल्या तेल टँकरवर अमेरिकेच्या नौदलानं क्षेपणास्त्र हल्ला केला. यानंतर टँकरच्या इंजिन रुमला भीषण आग लागली.

us attack tanker
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: ‘सर, आम्ही मोटर टँकर मारिवॅक्समधून बोलतोय. जहाजाला आग लागली आहे. जहाज बुडतंय. कृपया आम्हाला मदत करा.’ ओमानच्या किनाऱ्यापासून जवळ समुद्रात अडकलेल्या एका भारतीय खलाशाचा आवाज, त्याच्याकडून केली जाणारी मदतीची याचना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर तेल टँकर एमटी मारिवॅक्सवर असलेल्या २४ भारतीयांचा जीव संकटात सापडला. जहाजाच्या इंजिन रुमवर क्षेपणास्त्र धडकताच आग लागली आणि जहाजाला मोठं भगदाड पडलं.

क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर जहाजावरील भारतीय खलाशांचा जीव धोक्यात सापडला. SOS कॉलच्या माध्यमातून एका कर्मचाऱ्यानं मदत मागितली. ‘अमेरिकेच्या नौदलानं हल्ला केला आहे. क्षेपणास्त्रानं आमच्या इंजिन रुमचा वेध घेतला आहे. खाली मोठं भगदाड पडलं आहे. कृपया लवकर मदत पाठवा. आम्ही सगळे २४ कर्मचारी भारतीय आहोत,’ अशा शब्दांत कर्मचाऱ्यानं मदतीसाठी साद घातली.
Maharashtra TimesAir Canada Pilot: 16 वर्षांचं करिअर, 900 उड्डाणं; पायलटबद्दल महत्त्वाचा उलगडा, लाखो प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला

सोमवारी ओमानच्या मसिराह किनाऱ्याजवळ तेल वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला झाला. पलाऊचा झेंडा असलेल्या तेल टँकरला लक्ष्य करण्यात आलं. अमेरिकेच्या नौदलानं तेल टँकरवर क्षेपणास्त्र डागलं. हे जहाज इराणच्या बंदराकडे जात असल्याचा अमेरिकेचा आरोप होता. अमेरिकेच्या नाकाबंदीचं उल्लंघन केल्यानं हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

हल्ल्याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाचं मुंबई स्थित मॅरिटाईम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर सक्रिय झालं. दुपारी २ वाजून २० मिनिटांनी त्यांना हल्ल्याची माहिती मिळाली. यानंतर मॅरिटाईम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरनं तातडीनं ओमान मॅरिटाईम सर्च अँड रेस्क्यू सेंटरशी संपर्क साधला. यानंतर संपूर्ण मोहिमेवर बारीक नजर ठेवली.
Maharashtra TimesPakistan Helicopter Crash: POK मध्ये पाकिस्तानी सैन्याचं हेलिकॉप्टर क्रॅश; पायलटसह 21 सैनिकांचा मृत्यू, घातपाताचा संशय
मॅरिटाईम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरकडून हल्ल्याची माहिती मिळताच ओमानच्या रॉयल एअर फोर्सनं बचाव कार्य सुरू केलं. मसिराह बेटावरील हवाई तळावरुन एक हेलिकॉप्टर टँकरच्या दिशेनं रवाना झालं. जवळपास २० मिनिटांत हेलिकॉप्टर जहाजापर्यंत पोहोचलं. तिथे अडकलेल्या २४ भारतीय खलाशींची सुरक्षित सुटका करण्यात आली.

भारत आणि ओमान यांच्यात असलेल्या समन्वयामुळे सगळ्या भारतीय नागरिकांचा जीव वाचल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलानं दिली. हिंदी महासागरात भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं तटरक्षक दलानं म्हटलं आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा