two minor brothers drowned in lake during rang panchami celebration tragic incident in futala village ; रंगपंचमीचा आनंद ठरला शेवटचा, तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा करुण अंत; गोंदियावर शोककळा
two minor brothers drowned in lake during rang panchami celebration tragic incident in futala village ; रंगपंचमीचा आनंद ठरला शेवटचा, तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा करुण अंत; गोंदियावर शोककळा
गोंदियाच्या सडक अर्जुनीतील फुटाळा येथे रंगपंचमी खेळून तलावात आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून करुण अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
रंगपंचमी खेळल्यानंतर आंघोळीला गेलेल्या दोन भावांचा करुण अंत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गोंदिया : संपूर्ण देश रंगांच्या उत्सवात न्हाऊन निघाला असताना, गोंदिया जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा येथे रंगपंचमी खेळल्यानंतर तलावात आंघोळीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. सागर गहाणे (१६) आणि प्रणय गहाणे (१३) अशी या मृत मुलांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आनंदाच्या उत्सवावर काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, आज रंगपंचमीचा सण असल्याने फुटाळा गावात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. अबालवृद्धांनी एकमेकांवर रंगांची उधळण करत सणाचा आनंद लुटला. दुपारच्या सुमारास अंगावरचा रंग काढण्यासाठी सागर आणि प्रणय या दोन्ही भावंडांनी गावच्या तलावात आंघोळीला जाण्याचा बेत आखला. मात्र, हा बेत त्यांच्या जीवावर बेतेल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.
पाण्याचा अंदाज चुकला अन् घात झाला
दुपारच्या कडक उन्हात दोन्ही मुले तलावात उतरली. आंघोळ करत असताना खेळता खेळता ते तलावाच्या खोल भागात गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही कोवळ्या जीवांचा पाण्यात गुदमरून अंत झाला. काठावर असलेल्या काही लोकांच्या ही बाब लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता.
ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक तरुणांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. आपल्या घरातील दोन चिमुकल्यांचे मृतदेह पाहून पालकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून, आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
रंगांच्या या उत्सवात दोन सख्ख्या भावांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने फुटाळा गावातील चुली आज पेटल्या नाहीत. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सणासुदीच्या काळात जलाशयांच्या ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घ्यावी.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा