Headlines

TMKOCचं वेड, ९०० किमी प्रवास करून मुंबई गाठली, गस्ती पथकानं अल्पवयीन मुलाला घेतलं ताब्यात; असित कुमार मोंदींची प्रतिक्रिया चर्चेच


मुंबई: छोट्या पडद्यावरची अत्यंत लोकप्रिय मालिका ‘ तारक मेहता का उल्टा चश्मा ‘ या शोची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे, याचा प्रत्यय गेल्या १८ वर्षात अनेकदा आलाय. आता आणखी एक अशीच थक्क करणारी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथला एक १६ वर्षीय मुलगा ‘तारक मेहता’ मालिकेत काम करायचं म्हणून घरातून पळाला. या मालिकेत अभिनय करण्याची संधी मिळावी म्हणून तब्बल ९०० किलोमीटरचा प्रवास करून थेट मुंबईतील फिल्म सिटी गाठली.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकारांना भेटण्यासाठी , मालिकेचा सेट पाहण्यासाठी अल्पवयीन चाहत्यांनी घरातून पळ काढल्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. आता नुकताच असाच प्रकार पुन्हा घडल्यानं निर्माते असित कुमार मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देत अभिनय करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण कलाकारांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

शाळेत जाण्याच्या बहाण्यानं घर सोडलं

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी हा मुलगा सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जातो असं सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, शाळेत न जाता तो थेट छिंदवाडा रेल्वे स्थानकावर पोहोचला. तिथून तो नागपूर आणि पुढं कनेक्टिंग ट्रेन पकडून तो शुक्रवारी सकाळी मुंबईतील गोरेगाव स्थानकात उतरला.

गोरेगाव स्थानकावरून तो पायी चालत गोरेगाव पूर्व इथल्या फिल्म सिटी परिसरात ‘तारक मेहता…’ च्या सेटचा शोध घेत फिरत होता. फिल्म सिटी परिसरात एकटाच फिरताना पाहून आरे पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकानं (मोबाइल युनिट) त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. चौकशी दरम्यान त्यानें अत्यंत निष्पापपणे सांगितलं की, त्याला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत काम करायचं आहे आणि म्हणूनच तो मुंबईत आला आहे. पोलिसांनी तात्काळ त्याच्या पालकांशी संपर्क साधला.

Maharashtra TimesLopamudra Raut Home Theft Case: लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरी तब्बल १ कोटींची चोरी, चोरीच्या पैशातून दोन गुंठे जमीन खरेदी; तपासात धक्कादायक माहिती उघड
मुलाच्या पालकांनी छिंदवाड्यात त्याची हरवल्याची तक्रार नोंदवली होती. सध्या हा मुलगा पोलिसांच्या सुरक्षित देखरेखीत असून, त्याला घरी घेऊन जाण्यासाठी त्याचे वडील मुंबईला पोहोचले आहेत.

निर्माते असित कुमार मोदींनी दिली प्रतिक्रिया

या घटनेचं गांभीर्य लक्षात ‘तारक मेहता…’ चे निर्मातेअसित कुमार मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

मोठी स्वप्नं पहा, तुमच्या आवड जोपासा, आणि त्यासाठी मेहनत घ्या. पण नेहमी लक्षात ठेवा की, स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा स्वप्नाइतकाच महत्त्वाचा असतो. तुमचं शिक्षण, तुमची सुरक्षितता आणि पालकांचा विश्वास या गोष्टींना नेहमी पहिले प्राधान्य दिल पाहिजे, असं असित कुमार मोदींनी म्हटलं आहे.

एन्टरटेनमेंट इंडस्ट्री आणि अभिनयाबद्दल तरुणांमध्ये असा उत्साह पाहणं आनंददायी आहे. आमच्या मालिकेनं गेल्या अनेक वर्षांत अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. योग्य तयारी, संयम आणि योग्य मार्गाचा अवलंब केला तर कौशल्याची दखल नक्कीच घेतली जाते. पण पालकांना अंधारात ठेवून असं धोकादायक पाऊल कधीही उचलू नका. आमच्या शोमध्ये काम करायचं असल्यास नेहमी तुमच्या पालकांच्या उपस्थितीतच आमच्या अधिकृत कास्टिंग टीमशी संपर्क साधा.

Maharashtra TimesAmit Rai Chhatrapati Shivaji Maharaj Film : इतिहास ब्रिटिशांनी लिहिला असता तर वेगळा असता! बॉलिवूड दिग्दर्शक ऐतिहासिक नोंदींच्या आधारे करणार छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा
शिकत राहा, शिक्षण पूर्ण करा आणि स्वप्ने जरूर पहा… पण योग्य मार्गाने!, असं म्हणत त्यांनी तरुण कलाकारांना मार्गदर्शन केलं.

१८ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य

२८ जुलै २००८ रोजी सुरू झालेली ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या कौटुंबिक मालिकांपैकी एक आहे. या मालिकेची लोकप्रियता आजही कायम असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षक या शोशी जोडलेले आहेत.