Headlines

Thane Vidhan Parishad Election Ravindra Phatak wins unopposed after NCP SP Abhijeet Pawar withdraws; बिनविरोध निवडणुकीचे ‘फाटक’ खुले, आधी पत्नी आता पतीही विरोधाशिवाय विजयी, पवारांच्या निर्णयाने शिवसेनेचा गुलाल


Vidhan Parishad Election : नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक यांनी देखील बिनविरोध विजय संपादन केला होता, त्यानंतर आता खुद्द फाटकही परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत

Thane Vidhan Parishad Ravindra Phatak Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे – पालघर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने रिंगणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी गुरुवारी अचानक माघार घेतली. पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमयरित्या माघार घेतल्याने महायुतीकडून शिवसेनेच्या वतीने रिंगणात असलेले उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडणुकीचे ‘फाटक’ एकप्रकारे खुले झाले आहे.

वैयक्तिक कारणावरुन अर्ज माघारी

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचे रवींद्र फाटक तसेच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे महापालिकेचे गटनेते अभिजित पवार एकमेकांसमोर रिंगणात होते. मात्र गुरुवारी सकाळी पवार यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. हा अर्ज वैयक्तिक कारणांमुळे मागे घेत असल्याचे पवार यांच्या निकटवर्तीयांकडून स्पष्ट करण्यात आले.
Maharashtra TimesDelhi Fire : माझं कर्तव्य होतं ते! हॉटेलात आग, व्यापाऱ्याने लोकांच्या सुटकेसाठी गाद्या पसरल्या, दोन लाखांचं नुकसान, पण 8 जीव वाचले!
दरम्यान, आपण कोणतीही निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढत असतो. मात्र, या निवडणुकीत अपेक्षित असलेली गणिते जुळून येत नसल्याचे दिसून आल्याने आम्ही माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे आम्ही संघटनात्मक बांधणी करण्याकडे भर देऊन पुढील निवडणुकांना सामोरे जाणार आहेत, असे या पार्श्वभूमीवर पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितले. तसेच ‘मविआ’चा उमेदवार असणार्‍या पवार यांच्या अर्ज माघारीच्या प्रक्रियेत आम्हाला विश्वासात न घेतल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे व काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला.

अर्ज मागे घेताना प्रकाश आंबेडकर यांचा फोन; काँग्रेसबाबत वंचितचा मोठा निर्णय

शिवसेनेच्या गोटात जल्लोष

या निवडणुकीकरिता महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. त्याबाबत मी त्यांचा आभारी आहे. ९० टक्के मतांचे संख्याबळ आमच्याकडे होते. त्यातूनच आमच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी सांगितले. ‘मविआ’ उमेदवाराच्या माघारीचे वृत्त समजताच फाटक यांच्या समर्थकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष केला. तसेच आज, शुक्रवार, ५ जून रोजी टेंभी नाका येथील आनंदाश्रमात उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्यासह बिनविरोध आमदार म्हणून निवडून आलेले रविंद्र फाटक हे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
Maharashtra TimesKolhapur Accident : मुंबईकर कुटुंबाने कोल्हापुरात घर बांधलं, सुट्टीत गावी मुक्काम, टेम्पोखाली चिरडून चौघांचा मृत्यू, वृद्ध आजीवर वाईट वेळ

‘बिनविरोध’ निवडीचा योगायोग

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक यांनी देखील बिनविरोध विजय संपादन केला होता. या मतदारसंघात याआधी विधानपरिषदेचे माजी उपसभापती स्व. वसंत डावखरे यांना देखील ‘मातोश्री’वरून पाठींबा देत त्यांचा बिनविरोध विजयी होण्याचा मार्ग सुकर करण्यात आला होता. त्यामुळे ‘बिनविरोध’ निवडीचा अनोखा योगायोग या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा