Headlines

Tej Sapru : ‘अभिनेत्रीसोबत उभं राहून ते मला शिव्या देत होते’, राजेश खन्नांबद्दल अभिनेत्याचा दावा; म्हणाला, ‘खूप वाईट वाटलेलं’


Tej Sapru : ज्येष्ठ अभिनेते तेज सप्रू यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजेश खन्ना यांच्यासोबतचा शुटिंगचा अनुभव सांगितला आहे.

Tej Sapru On Rajesh Khanna
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. अशातच आता बॉलिवूड अभिनेते तेज सप्रू यांनी राजेश खन्ना यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. शुटिंगदरम्यान राजेश खन्ना यांनी तेज यांना शिवीगाळ केलेली, असं त्यांनी सांगितलं आहे.

अभिनेत्यानं सांगितला प्रसंग

ज्येष्ठ अभिनेते तेज सप्रू यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तेज सप्रू यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. तेज सप्रू म्हणाले की, ‘आम्ही एका सिनेमाचं काश्मीरमध्ये आऊटडोअर शूटिंग करत होतो. त्यावेळी अचानक माझ्या मागून कोणीतरी शिवीगाळ करत असल्याचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर ते राजेश खन्ना होते. त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही, कारण त्यावेळी ते एका अभिनेत्रीसोबत होते आणि मला शिव्या देत होते. मला त्या अभिनेत्रीचं नाव सांगायचं नाही.’

Maharashtra TimesThalapathy Vijay : तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा काडीमोड रद्द! पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे
तेज सप्रू पुढे म्हणाले की, ‘या प्रसंगानंतर मी खूप निराश झालेलो. शिवीगाळ केल्यामुळे मला खूप वाईट वाटलेलं. त्यावेळी सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक शिबू मित्रा यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मी इतर वेळी खूप शांत असतो, पण एकदा मला राग आला तर ते समोरच्यासाठी खूप वाईट ठरतं आणि शिबू मित्रा यांच्यासोबत मी १० ते १५ चित्रपटांमध्ये काम केलं होतं, त्यामुळे ते माझी समजूत काढत होते.’

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

‘राजेश खन्ना यांच्यासाठी माझ्या मनामध्ये खूप आदर होता आणि आहे. फक्त त्यांचा नाही तर कोणत्याही ज्येष्ठ कलाकरांचा मी कायम मान राखतो. पण, एवढा आदर देऊनही अशी शिवीगाळ केल्यानं मला खूप वाईट वाटलेलं. दुसऱ्याच दिवशी माझा आणि राजेश खन्ना यांचा एकत्र शॉट होता. पण, मी त्यांच्याशी काहीच बोललो नाही. मी दिग्दर्शकांकडून सीन समजून घेतला. शॉट झाल्यानंतर मी पुन्हा येऊन माझ्या खुर्चीवर बसलो, त्यावेळी राजेश खन्ना मागून आले आणि म्हणाले, ‘काल जे झालं ते विसरून जा’ यावर मी त्यांना म्हणालो, ‘सर माझी काहीही चूक नसताना तुम्ही मला शिवी दिलीत’ यावर राजेश खन्ना म्हणाले, ‘नाही! जे झालं ते सोड आता. संध्याकाळी पॅकअपनंतर माझ्यासोबत चल.’ त्यांनी दिग्दर्शकांनाही मला त्यांच्यासोबत पाठवायला सांगितलं. मी नाही म्हणत असताना राजेश खन्ना मला त्यांच्याबरोबर घेऊन गेले आणि रात्रभर आम्ही गप्पा मारल्या.’ असं तेज यांनी शेवटी सांगितलं. ‘द रेडीफ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तेज सप्रू बोलत होते.