Team India Physio Kamlesh Jain News : श्रीलंका कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघातील स्टार खेळाडूंच्या दुखापतींनी बीसीसीआयची झोप उडवली आहे. खेळाडूंच्या या इंजरी सत्रामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल प्रचंड संतापले असून बोर्डाने कोणावर कारवाईचा बडगा उगारला आहे?

खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे कर्णधार आणि प्रशिक्षक त्रस्त
गेल्या काही काळात संघातील अनेक महत्त्वाच्या शिलेदारांना दुखापतींमुळे मैदानाबाहेर राहावे लागले आहे. ज्यामध्ये स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत नवा चेहरा ठरला आहे. याशिवाय हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हते. यांच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीला मुकला असून दुसऱ्या सामन्यातील त्याच्या सहभागावर अनिश्चितता आहे. तर साई सुदर्शनला फिटनेसचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच संघात स्थान देण्यात आले.
इंग्लंड दौऱ्यादरम्यान या दुखापतींवर जोरदार चर्चा रंगली. कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सततच्या या समस्येमुळे कमालीचे नाराज आहेत. ऐनवेळी खेळाडू अनफिट ठरत असल्याने त्यांना आपली सर्वोत्तम ‘प्लेइंग-११’ मैदानावर उतरवता येत नाहीये.
लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर शुभमन गिल काय म्हणाला?
“सामन्याच्या दिवशी सकाळी मैदानावर आल्यावर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त असल्याचे कळणे अत्यंत निराशाजनक असते. जर तुम्ही ५ गोलंदाजांसह मैदानात उतरलात आणि त्यातील ८०% फिट असलेला खेळाडू ५ षटकांनंतरच बाहेर गेला, तर उरलेला भार कोणी सोसायचा? संघाला स्वतःच्या फिटनेसच्या दर्जात तातडीने सुधारणा करावीच लागेल.”
CoE आणि सपोर्ट स्टाफच्या कार्यपद्धतीवर संशय
खेळाडूंच्या वाढत्या दुखापतींमुळे बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलन्स (CoE) आणि वैद्यकीय पथकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमवर पूर्ण विश्वास नसल्याने काही वरिष्ठ खेळाडू उपचारासाठी खाजगी तज्ज्ञांची मदत घेत आहेत. तसेच, माजी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच सोहम देसाई यांच्या जागी एड्रियन ले रू यांची निवड झाल्यापासून फिटनेस ट्रेनिंगच्या पद्धती बदलल्या आहेत; परंतु या नव्या पद्धतींशी जुळवून घेणे खेळाडूंना कठीण जात असल्याचे दिसते.
श्रीलंका मालिकेनंतर मोठ्या फेरबदलांची चिन्हे
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “जेव्हा प्रशिक्षक आणि कर्णधाराला त्यांचे १५ सर्वोत्तम खेळाडूच उपलब्ध होत नाहीत, तेव्हा योग्य संघ निवडणे कठीण होते. संघात टिकून राहण्याच्या स्पर्धेत खेळाडू स्वतःवर खूप ताण घेतात. अशा वेळी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे ही सपोर्ट स्टाफ आणि CoE ची जबाबदारी आहे.”
भारताचे आगामी वेळापत्रक अत्यंत व्यस्त असून त्यात श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. ही मालिका संपताच बीसीसीआय मुख्य फिजियोथेरेपिस्ट कमलेश जैन आणि टीम डॉक्टर डॉ. रिझवान खान यांच्या जागी नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. कमलेश जैन २०२२ मध्ये नितीन पटेल यांच्या जागी भारतीय संघात आले होते, मात्र आता दुखापतींचे प्रमाण पाहता बोर्ड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

