ओटवणे प्रतिनिधी : बांदा- दाणोली या जिल्हा मार्गाचे सध्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम सुरू असून सातुळी शाळा, बावळाट मुलांडावाडी, विलवडे तिठा येथे दयनीय अवस्था झाली आहे. याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ महिला व वाहन चालकांना बसत असून या धोकादायक जिल्हा मार्गावर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन हा जिल्हा मार्ग वाहतुकीस सुरळीत करावा अशी मागणी या भागातून होत आहे.
सध्या या जिल्हा मार्गावर सातुळी शाळा, बावळाट मुलांडावाडी, विलवडे तिठा या ठिकाणी खड्ड्यांसह चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पादचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना या या जिल्हा मार्गावरून चालणे मुश्किल झाले आहे. काही ठिकाणी खड्ड्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी नूतनीकरण करायचे आहे. त्या ठिकाणी सध्या झालेल्या रस्त्याच्या दयनीय अवस्थे दखल घेऊन तात्काळ हा रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा अशी वाहन चालकांची मागणी आहे.
अति उत्साही पर्यटकांना आवरा!
दरम्यान या जिल्हा मार्गावर ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे त्या परिसरात पर्यटकांच्या गाड्या सुसाट वेगाने धावत असल्यामुळेही शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या जिल्हा मार्गावर गस्त घालून या अति उत्साही पर्यटकांना आवरावे अशी मागणी ही या भागातून होत आहे.
