Headlines

Strait Of Hormuz: इराणला जोडीदार मिळाला, होर्मुझमध्ये हालचालींना वेग; भारत संकटात, इंधन दर पेटण्याची चिन्हं


होर्मुझच्या सामुद्रधुनीत हालचालींना वेग आला आहे. इराणनं एक महत्त्वाचा करार करण्याची तयारी सुरू केली आहे. हा करार झाल्यावर होर्मुझमधील वाहतुकीची स्थिती पूर्णपणे बदलेल.

iran oman
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तेहरान: होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक महागण्याची दाट शक्यता आहे. या भागातून होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची आणि त्यावर सेवा शुल्क आकारण्याची तयारी इराण आणि ओमाननं सुरू केली आहे. त्यासाठी दोन्ही देशात करार होणार आहे. न्यूयॉर्क टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

इराण आणि ओमान यांच्यात करार झाल्यास होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अमेरिकेच्या हस्तक्षेपाशिवाय सागरी वाहतूक सुरू होईल. पण इराण आणि ओमान होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवतील. त्यांच्या मंजुरीशिवाय एकही जहाज सामुद्रधुनी पार करू शकणार नाही. मात्र यावर अमेरिकेचा आक्षेप आहे.

नव्या व्यवस्थेनुसार पर्शियन आखातातून येणारी जहाजं इराणच्या किनाऱ्याला लागून असलेल्या मार्गिकेतून जातील. तर अरबी समुद्रातून निघणारी जहाजं ओमानच्या किनाऱ्याच्या जवळून जातील. त्यांच्यासाठी ती मार्गिका निश्चित केली जाईल. यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराण आणि ओमान यांचं वर्चस्व निर्माण होईल. युद्धाआधी हा एक आंतरराष्ट्रीय जलमार्ग होता. इथून होणारी वाहतूक मोफत होती. पण आता परिस्थिती बदलली आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवणाऱ्या इराण आणि ओमानला एक निश्चित शुल्क द्यावं लागेल. इराणी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, औपचारिक टोल घेण्याचा आमचा हेतू नाही. सेवा शुल्क आकारण्यासाठी आम्ही आग्रही आहेत. या पैशांमधून तेल टँकर्सना सुरक्षा दिली जाईल. या माध्यमातून येणारं उत्पन्न इराण आणि ओमान वाटून घेतील.

इराण आणि अमेरिकेत होत असलेल्या कराराला अमेरिकेनं विरोध केला आहे. अशा प्रकारचा कोणताही करार आम्ही स्वीकारणार नसल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं. मोफत वाहतुकीत अडथळा आणणाऱ्या कोणत्याही कराराला आमचा विरोध असेल, असं रुबियो म्हणाले.

होर्मुझ सामुद्रधुनीत इराण आणि ओमाननं सेवा शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यास भारतात जबर झटका बसू शकतो. भारत होर्मुझ मार्गे मोठ्या प्रमाणात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करतो. यासोबतच आखाती देशांशी व्यापार करण्यासाठीही याच मार्गाचा वापर करतो. अशा परिस्थितीत होर्मुझ ओलांडण्यासाठी सेवा शुल्क द्यावा लागल्यास भारताचा ऊर्जा आयातीवरील खर्च वाढेल. याचा परिणाम खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या दरावर होईल. त्यामुळे इंधन महाग होईल.