![]()
‘तुमच्या दोघींची मैत्री अशी कशी? तुम्ही दोघी एकमेकींचं उष्टं कसं खाता?’
मला आणि सुमुखीला पाहून निवास काकाला हा प्रश्न नेहमी पडायचा. आणि मग त्याचं ठरलेलं पालुपद –
‘तुम्हा दोघींविषयी एक ‘ल ले’ पक्षी ललित लेख लिहिला पाहिजे!’
श्रीनिवास विनायक कुलकर्णी – उत्कृष्ट ललित लेखक, संवेदनशील साहित्यिक आणि शिस्तबद्ध संपादक. पण माझ्यासाठी तो एवढ्या मोठ्या नावाचा लेखक नव्हता. तो होता फक्त ‘निवास काका’. मृणाल (देव) कुलकर्णी आणि ऋषिकेश जोशी यांच्यासाठी ‘निवास मामा’.
माझ्या जन्माच्या कितीतरी आधीपासून त्याचं माझ्या आजोळी, कराडला येणं-जाणं होतं. मोठ्या मामाशी बुद्धिबळ खेळायला तो यायचा. माझी आई वासंती (वळवडे) मुझुमदार आणि त्याची ओळख तिथलीच. त्यांची मैत्रीही कराडच्या मातीतली. पुढे माझ्या डॅडींशी – अरुण मुझुमदार यांच्याशी – त्याचं उत्तम सूत जमलं. मुंबईत ‘मौज’च्या कामासाठी आला, की दिवसन्दिवस, कधी आठवडेही तो आमच्याकडे राहायचा.
आईच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा तो साक्षीदार होता आणि आम्ही त्याच्या. त्याच्या लग्नात म्हणे सगळ्या विधींच्या वेळी मी त्याच्या शेजारीच होते. निदान जुने फोटो तरी तसंच सांगतात!
डॅडी आणि निवास काका यांचं सूत जमण्याचं एक कारण दोघांचीही तीक्ष्ण विनोदबुद्धी. निवास काकाची स्मरणशक्ती अफाट आणि निरीक्षणशक्ती त्याहून तीक्ष्ण. आमच्याकडे असताना तो अनेकदा खोलीच्या एका कोपऱ्यात शांत बसलेला असायचा. स्वतः फारसं बोलणार नाही; पण समोरच्या माणसाचं बोलणं, हावभाव, हालचाली – सगळं टिपत राहणार.
पाहुणे गेल्यावर मग डॅडी आणि त्याची चर्चा रंगायची. शब्द कमी, हावभाव जास्त आणि हसणं भरपूर.
त्याचं हसणंही खास. ओठ दाबून हसायचा.
‘का हसलास?’ मी विचारायचे.
‘कुठे काय? मी हसलोच नाही!’
चेहरा निर्विकार. आणि खुर्चीतल्या खुर्चीतच एक हालचाल करून स्वतःला सावरून बसायचा.
आमच्याकडच्या प्रत्येक मुक्कामात आमचं किमान एक भांडण ठरलेलं. कारण बहुतेकदा तोच! मुद्दाम माझी खोडी काढायचा. मला तेव्हा त्याचा मिश्किलपणा कळत नसे. मी चिडायचे, वाद घालायचे आणि शेवटी पाय आपटत खोलीत निघून जायचे. त्याला बहुधा अपेक्षित असलेला शेवट हाच असावा!
त्याचं पहिलं पुस्तक ‘डोह’ प्रसिद्ध झालं, तेव्हा आई-डॅडींबरोबर मलाही त्यानं वेगळी प्रत दिली. त्यावर लिहिलं होतं –
‘पण वाचणार कधी?’
रास्तच प्रश्न. मी तेव्हा दहा वर्षांचीही नव्हते.
पुस्तकापेक्षा मला त्याच्या अक्षराचाच मोह अधिक होता. वळणदार, नक्षीदार अक्षर. मराठी असो की इंग्रजी, त्याची स्वतःची एक ठेवण. पाकिटावरचा पत्ता पाहिला तरी पत्र निवास काकाचं आहे हे कळायचं. लहानपणी आमचा बराच पत्रव्यवहार झाला. तो नियमित उत्तर द्यायचा आणि त्यात आईसाठी एखादा खोचक निरोपही –
‘आईला सांग, तिला माझं पत्र मिळालं असेलच. ती उत्तर देईल अशी अपेक्षा नाही.’
त्याचं अक्षर मला आवडतं हे माहीत असल्यामुळे माझ्या हट्टाखातर त्याने एकदा आमची टेलिफोन नंबरची अख्खी वही स्वतःच्या अक्षरात लिहून दिली होती – A ते Z!
मोठी झाल्यावर त्याचं साहित्य वाचू लागले. ‘डोह’ मात्र उशिरा वाचलं; आधी ‘पाण्याचे पंख’. कदाचित त्याचं मुखपृष्ठ आईनं केलं होतं म्हणून असेल.
त्याच्या लेखनात गावाकडचं जग होतं; पण भाषेत रांगडेपणा नव्हता. त्याच्या स्वभावातला तिरकसपणाही लेखनात सहसा येत नसे. भाषा साधी, सहज आणि वाचकाला बरोबर घेऊन जाणारी. निसर्ग असो, गावातला रस्ता असो, पारावरचा माणूस असो किंवा त्याचा मुलगा आलोक – त्याच्या नजरेतून बारीक तपशील सुटत नसे आणि तो तपशील सगळ्या बारकाव्यांसह लिखाणात उतरायचा.
लेखनातली ती सहजता मात्र सहज मिळालेली नव्हती.
लेख असो वा पुस्तक, पहिला आराखडा त्याने कधी तसाच्या तसा छापायला पाठवला नाही. एखाद्या शब्दासाठी तो दोन-दोन दिवस थांबायचा. डॅडींशी चर्चा, आईशी चर्चा; कधीकधी मलाही विचारायचा. त्याच्या मनात जे आहे ते ‘जवळपास’ सांगणारा शब्द त्याला चालत नसे. त्याला नेमका शब्द हवा असे.
त्या एका शब्दासाठी थांबण्याची तयारी हेच कदाचित त्याच्या लेखनाचं रहस्य होतं.
त्याच्याबरोबर कोल्हापूर, सांगली, औदुंबरच्या परिसरात दोन-तीनदा भटकले. त्याचा लोकसंग्रह अफाट. कितीही छोट्या गावात गेलो तरी त्याला ओळखणारं, त्याचा पाहुणचार करायला उत्सुक असलेलं कुणीतरी भेटायचंच.
मी मोठी होत गेले तसा त्याचा तिरकस विनोदही माझ्यासाठी खुला झाला.
‘शंकर रामाणी यांचं अक्षर शेताच्या कुंपणासारखं दिसतं,’ अशी टिप्पणी तो आता माझ्यासमोरही सहज करू लागला होता.
आमच्या घरी येणाऱ्या अनेकांशी त्याची मैत्री झाली. त्यात चित्रकार गोपाळ अडीवरेकर खास. अडीवरेकर निघाले, की निवास काका त्यांना ‘खालपर्यंत’ सोडायला जायचा. आणि अर्ध्या तासाने परतायचा.
‘इतका वेळ कुठे होतास?’
‘कुठे काय?’
एकदा त्याच्यामागोमाग दोन मिनिटांनी मी खाली गेले. भोचकपणा त्याच्याकडूनच शिकले होते ना!
पाहते तर हे दोघे घराखालच्या इराण्याकडे निवांत चहा पीत, गप्पा मारत बसलेले. मी वर येऊन इमानेइतबारे आईला बातमी दिली. वणवा पेटला! डॅडींनी तो समजूतदारपणे विझवला.
माझा प्रश्न मात्र कायम –
‘घरचा चहा आवडत नाही, की काही खासगी बोलायचं असतं?’
निवास काकाने नेहमीप्रमाणे ओठ दाबले.
आणि हसला.
अशा कितीतरी आठवणी आहेत.
निवास काकाच्याच भाषेत – ‘अशा गोष्टी आहेत, आणखीही आहेत!’
खूप वेळ गप्पा मारून आम्ही शांत झालो, की तो हे वाक्य हमखास म्हणायचा. त्या वेळी ते गप्पा पुढे चालू ठेवण्याचं वाक्य वाटायचं. आज त्याचा अर्थ वेगळाच वाटतो.
खरंच, अशा गोष्टी आहेत. आणखीही आहेत. काही आठवतात, काही विस्मरणाच्या कडेला उभ्या आहेत. काही फोटोंमध्ये राहिल्या, काही पत्रांत, काही त्याच्या त्या वळणदार अक्षरात. काही त्याच्या ओठ दाबून हसण्यात.
आणि एक गोष्ट तर कायमचीच राहून गेली.
निवास काका, माझ्या आणि सुमुखीच्या मैत्रीबद्दल तुला एवढं कुतूहल का होतं? आमचं एकमेकींचं उष्टं खाणं तुझ्या त्या बारीक नजरेने नेमकं कसं टिपलं होतंस? आणि त्यातून तू कोणता ललित लेख लिहिला असतास?
तू नेहमी धमकी द्यायचास –
‘तुम्हा दोघींविषयी एक ‘ल ले’ पक्षी ललित लेख लिहिला पाहिजे!’
तुझ्या लेखनातला नेमका शब्द शोधण्यासाठी तू दोन-दोन दिवस थांबायचास.
पण आमच्यावरचा तो लेख लिहिण्यासाठी मात्र कदाचित थोडं जास्तच थांबलास.
तो ‘ल ले’ राहिलाच की रे…
————————————–
(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
