Headlines

Senior MP positive about NCP Merger amid talks of Sharad Pawar Sunetra Pawar led parties; चर्चा बंद, संपर्क सुरुच! दोन्ही NCP विलिनीकरणाची दारं किलकिली, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ खासदाराचे सूचक विधान


NCP Merger : शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर पडदा टाकल्याचे म्हटले तरी त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधींचा दबाव वाढल्यास येत्या काळात पुन्हा काहीतरी नवे मार्ग शोधले जाऊ शकतात, असे राष्ट्रवादी पक्षाच्या एका ज्येष्ठ खासदाराने ‘मटा’शी बोलताना सांगितले.

Sharad Pawar NCP Merger Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला असला तरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत सावध भूमिका घेण्यात आली आहे.

चर्चा बंद, संपर्क बंद नाही

राजकारणात कोणत्याही गोष्टीवर कायमचा पडदा टाकला जात नाही. आज शरद पवार यांनी या चर्चेवर पडदा टाकल्याचे म्हटले तरी त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधींचा दबाव वाढल्यास येत्या काळात पुन्हा काहीतरी नवे मार्ग शोधले जाऊ शकतात. शरद पवारांनी चर्चा बंद केल्याचे सांगितले तरी संपर्क बंद असल्याचे दोन्ही पक्षांतील ज्येष्ठांनी कधीही म्हटलेले नाही’, असे राष्ट्रवादी पक्षाच्या एका ज्येष्ठ खासदाराने याबाबत ‘मटा’शी बोलताना सांगितले.

सत्ताधाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने (शप) दिल्लीतील नीट परीक्षा पेपरफुटीविरोधात रस्त्यावर उतरलेल्या जेन-झींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका घेतली असल्याचे समजते. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार अनेक खासदार व आमदार पुढील तीन वर्षे कशी काढायची, या विवंचनेत असल्याने ते विविध मार्गांनी सत्ताधारी पक्षांशी सौहार्दाचे संबंध ठेवण्यासाठी धडपडत आहेत.
Maharashtra TimesUddhav Thackeray : शिवरायांनाही अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटलेले, युवकांना झुरळ म्हणणारे आणि त्यांच्यात काय फरक? ठाकरेंचा घणाघात

कामाच्या निमित्ताने भेटी, चर्चा एकत्रीकरणाची

राष्ट्रवादीतील (शप) अनेक लोकप्रतिनिधी सुनेत्रा पवार यांच्याकडे तसेच पक्षातील इतर मंत्र्यांकडे अधिकृत कामाचे निमित्त काढून भेटत असून या तिढ्यातून लवकरात लवकर मार्ग काढावा, असे सांगत असल्याचे अत्यंत ज्येष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले. पार्थ पवार यांचा पुण्यात वाङ्निश्चय झाला. त्यात शरद पवार कुटुंबीयांसोबतच त्यांच्या पक्षातील अनेकांची उपस्थिती होती, याकडेही अनेकांनी लक्ष वेधले.

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीत कर्ज आणि यादीचा घोळ, ‘हेअरकट’ प्रकरण काय?

पवार काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना मंगळवारी शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला होता. ‘राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा कोणताही संबंध नाही. दोन्ही पक्षांचे विलीनीकरण अशक्य आहे,’ असे ठाम विधान करून त्यांनी राजकीय तर्क-वितर्कांना विराम दिला.

बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी ही भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) संभाव्य एकत्रीकरणाबाबत राज्याच्या राजकारणात विविध चर्चा सुरू असतानाच पवार यांनी कोणतीही संदिग्धता न ठेवता विलीनीकरणाची शक्यता फेटाळली.
Maharashtra TimesSanjay Ghadi : आधी मुंबईत सरकारी बंगल्याची मागणी; आता नव्या कोऱ्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाडीच्या प्रस्तावावर उपमहापौर संजय घाडींचं उत्तर

दिल्लीतील घडामोडींनंतर चर्चा

काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणास विरोध केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर दिल्लीत खासदार पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याने विविध राजकीय शक्यता व्यक्त केल्या जात होत्या.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा