NCP Merger : शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर पडदा टाकल्याचे म्हटले तरी त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधींचा दबाव वाढल्यास येत्या काळात पुन्हा काहीतरी नवे मार्ग शोधले जाऊ शकतात, असे राष्ट्रवादी पक्षाच्या एका ज्येष्ठ खासदाराने ‘मटा’शी बोलताना सांगितले.

चर्चा बंद, संपर्क बंद नाही
‘राजकारणात कोणत्याही गोष्टीवर कायमचा पडदा टाकला जात नाही. आज शरद पवार यांनी या चर्चेवर पडदा टाकल्याचे म्हटले तरी त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधींचा दबाव वाढल्यास येत्या काळात पुन्हा काहीतरी नवे मार्ग शोधले जाऊ शकतात. शरद पवारांनी चर्चा बंद केल्याचे सांगितले तरी संपर्क बंद असल्याचे दोन्ही पक्षांतील ज्येष्ठांनी कधीही म्हटलेले नाही’, असे राष्ट्रवादी पक्षाच्या एका ज्येष्ठ खासदाराने याबाबत ‘मटा’शी बोलताना सांगितले.
सत्ताधाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने (शप) दिल्लीतील नीट परीक्षा पेपरफुटीविरोधात रस्त्यावर उतरलेल्या जेन-झींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका घेतली असल्याचे समजते. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार अनेक खासदार व आमदार पुढील तीन वर्षे कशी काढायची, या विवंचनेत असल्याने ते विविध मार्गांनी सत्ताधारी पक्षांशी सौहार्दाचे संबंध ठेवण्यासाठी धडपडत आहेत.
Uddhav Thackeray : शिवरायांनाही अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटलेले, युवकांना झुरळ म्हणणारे आणि त्यांच्यात काय फरक? ठाकरेंचा घणाघात
कामाच्या निमित्ताने भेटी, चर्चा एकत्रीकरणाची
राष्ट्रवादीतील (शप) अनेक लोकप्रतिनिधी सुनेत्रा पवार यांच्याकडे तसेच पक्षातील इतर मंत्र्यांकडे अधिकृत कामाचे निमित्त काढून भेटत असून या तिढ्यातून लवकरात लवकर मार्ग काढावा, असे सांगत असल्याचे अत्यंत ज्येष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले. पार्थ पवार यांचा पुण्यात वाङ्निश्चय झाला. त्यात शरद पवार कुटुंबीयांसोबतच त्यांच्या पक्षातील अनेकांची उपस्थिती होती, याकडेही अनेकांनी लक्ष वेधले.
Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीत कर्ज आणि यादीचा घोळ, ‘हेअरकट’ प्रकरण काय?
पवार काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना मंगळवारी शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला होता. ‘राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचा कोणताही संबंध नाही. दोन्ही पक्षांचे विलीनीकरण अशक्य आहे,’ असे ठाम विधान करून त्यांनी राजकीय तर्क-वितर्कांना विराम दिला.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी ही भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) संभाव्य एकत्रीकरणाबाबत राज्याच्या राजकारणात विविध चर्चा सुरू असतानाच पवार यांनी कोणतीही संदिग्धता न ठेवता विलीनीकरणाची शक्यता फेटाळली.
Sanjay Ghadi : आधी मुंबईत सरकारी बंगल्याची मागणी; आता नव्या कोऱ्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाडीच्या प्रस्तावावर उपमहापौर संजय घाडींचं उत्तर
दिल्लीतील घडामोडींनंतर चर्चा
काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणास विरोध केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर दिल्लीत खासदार पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याने विविध राजकीय शक्यता व्यक्त केल्या जात होत्या.

