Headlines

Sanjay Kakade Appeal Sharad Pawar Over Congress Slams Sunetra Pawar


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सडकून टीका केली. संजय काकडे यांनी काँग्रेसला माफी मागण्यासाठी 48 तासांचा वेळ दिला आहे. माफी मागितली नाही तर काँग्रेस नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच संजय काकडे यांनी शरद पवारांना देखील काँग्रेसपासून दूर जाण्याचं आवाहन केलं आहे.

Sharad Pawar Ans Sanjay Kakade
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : काँग्रेसने सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटलं आहे. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर करण्यात आलेल्या या टीकेचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समर्थन केलं आहे. तसेच सुनेत्रा पवार यांनी गुंगी गुडिया म्हटलेलं चुकीचं असेल तर दुर्गा असल्याचं सिद्ध करुन दाखवावं, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी या टीकेवरुन ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.

संजय काकडे यांनी पवारांना नेमकं काय आवाहन केलं?

“जर काँग्रेसने आपल्या प्रदेशाध्यक्षांना काढलं नाही किंवा माफी मागितली नाही तर मी ज्येष्ठ नेते शरद पवारांना विनंती करेन की, आघाडीतून बाहेर पडावं. काँग्रेस सोडा. काँग्रेस कोणत्या स्तरावर जात आहे ते पाहा. तुमच्या घरातील एका सुनेला असं बोलत असतील तर शरद पवारांनी काहीही करुन काँग्रेस पक्षापासून लांब जावं. तुमच्या सुनेला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष एवढं घाणेरडं बोलत आहे, उद्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही हे लोकं असं काहीतरी बोलतील. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेस पासून लांब राहावं”, असं आवाहन संजय काकडे यांनी केलं आहे.

संजय काकडे यांचा हर्षवर्धन सपकाळेंवर घणाघात

“महाराष्ट्र काँग्रेसची घाणेरडी वृत्ती दिसून आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षाने याला दुजोरा देणं म्हणजे निर्लज्जपणा आहे. सगळ्यात घाणेरडी वृत्ती या लोकांची झाली आहे. ह्यांना आया-बहिणी नाहीत. या लोकांना लाज राहिली नाही. दुर्दैवाने एक स्त्री अशा संकटाशी सामना करत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्यासाठीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वत:ला वाहून दिलं आहे”, असं संजय काकडे म्हणाले.

“मला नैतिकतेने पटत नाही. पण या घाणेरड्या अध्यक्षांच्या वक्तव्यामुळे असं वाटतं की, जेव्हा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी गेले तेव्हा तुमची गुडिया लापता झाली होती का? असं म्हटलं तर ते किती घाणेरडे वाटेल? आम्हालाही असं बोलायला लाज वाटते. तेवढी अक्कल पाहिजे. एका स्त्रीबद्दल बोलताना महाराष्ट्राची संस्कृती विसरला का तू?”, असा घणाघात संजय काकडे यांनी केला.

‘काँग्रेस नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही’

“माझं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आवाहन आहे की, हर्षवर्धन सपकाळ यांचा तातडीने राजीनामा घ्या. नाहीतर माफी मागायला लावा. अन्यथा आम्ही कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. आम्ही काँग्रेसच्या नेत्यांसमोर निदर्शने देऊन त्यांच्या तोंडाला काळे फासू”, अशा इशारा संजय काकडे यांनी दिला.

“माझे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, हर्षवर्धन सपकाळ जिथे दिसेल तिथे त्याच्या तोंडाला काळे फासा. आम्ही काँग्रेसला माफी मागण्यासाठी 24 तासांची वेळ देतो”, असा इशारादेखील संजय काकडे यांनी दिला. “महिलांवर अशा पद्धतीने बोलणं हे काँग्रेसच्या संस्कृतीत नव्हतं. पण या अध्यक्षाला काँग्रेस संपवायची आहे”, असा आरोप संजय काकडे यांनी केला.