S Janaki (1957-2018): गायनाची रीतसर तालीम घेतली नसली तरी, आपला गळा काय कमाल करू शकतो याचे पूर्ण भान जानकीअम्मांना होते. गायनावर शिस्तीने परिश्रम घेण्याची तयारी होती. हे भान नि तयारी अशा अनेक घटकांचा मिलाफ म्हणजे, एस. जानकी यांचा गायिका म्हणूनचा प्रवास. १९५७ ते २०१८ अशी तब्बल ६१ वर्षे! ११ जुलै रोजी त्यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.

एरिक सिगलच्या ‘मॅन, वूमन अॅण्ड चाइल्ड’ या कादंबरीवर बेतलेला एक चित्रपट १९८२ साली मल्याळीत आला. नाव, ‘ओलांगळ’. या शब्दाचा अर्थ लाटा. दिग्दर्शक बालू महेंद्र. प्रमुख भूमिकेत पूर्णिमा जयराम आणि आपले अमोल पालेकर. या चित्रपटात एकूण तीन गाणी; ‘ज्ञानपीठ’प्राप्त ज्येष्ठ मल्याळी कवी ओएनव्ही कुरूप यांनी लिहिलेली. संगीतकार इलायराजा. यातील एक अजरामर गाणे, ‘तुम्बी वा…’ गायिका एस. जानकी. मागच्या शतकातील ऐंशीच्या दशकातील मूळ गाणे या शतकातील युवा ऐकतात. ‘कव्हरअप्’ करण्याचा उत्तम प्रयत्न करतात. ही जादू आहे, कुरूपांच्या शब्दांची, इळयराजांच्या संगीताची आणि अर्थातच एस. जानकी यांच्या आवाजाची.
गाता येते हे जाणवणे नि स्वत:ला तयार करणे आणि गाता येते हे कळणे आणि स्वत:ला विनासायास घडविणे यांतला फरक एस. जानकी यांनी पुरता ओळखला होता. गायनाची रीतसर तालीम घेतली नसली तरी, आपला गळा काय कमाल करू शकतो याचे पूर्ण भान त्यांना होते. गायनावर शिस्तीने परिश्रम घेण्याची तयारी होती. हे भान नि तयारी अशा अनेक घटकांचा मिलाफ म्हणजे, एस. जानकी यांचा गायिका म्हणूनचा प्रवास. १९५७ ते २०१८. ६१ वर्षे! १९५७ साली वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी तमिळ चित्रपट ‘विधियिन विलैयाट्ट’पासून पार्श्वगायनास सुरुवात केली. याच वर्षी त्यांनी सहा विविध भाषांत गाणी गायली. नंतर एकदा कुण्या तरी रेकॉर्डिंगच्यावेळी बप्पी लाहिरींनी त्यांचा आवाज ऐकला. त्यांनी हिंदीत गाण्याची संधी दिली. हिंदीत एस. जानकी यांची गाणी कमी आहेत. आठवणीतही आहेत, मात्र हा आवाज एस. जानकी यांचा आहे, हे अनेकांच्या लक्षात येत नाही.
‘यार बिना चैन कहां रे…’ एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या वाट्याला जितकी काही हिंदी चित्रपटसृष्टी आली, तितकी एस. जानकी यांच्या वाट्याला आली नाही. के. एस. चित्रा यांच्यासारखी ओळख त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मिळाली नाही. याची त्यांना बहुधा फिकीर नसावी. त्यांच्या समकालीन वाणी जयराम या कुमार गंधर्वांसोबतच्या ‘ऋणानुबंधाच्या…’ने मराठी मनांत हक्काची जागा करत्या झाल्या. एस. जानकी यांच्या वाट्याला एकही मराठी गाणे आले नाही. दक्षिणेने त्यांच्यावर अमाप प्रेम केले. दक्षिणेतील चारही भाषांमध्ये त्या भाषांतील रस-भाव आत्मसात करून गाणे वाटते तितके सोपे नाही. तेही अशा काळात; जेव्हा तांत्रिकबाजू आजइतकी भक्कम नव्हती. चित्रपट, अल्बम, टीव्ही, रेडिओ अशा विविध माध्यमांसाठी २० भाषांत ४८ हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली.
एस. जानकी यांचा आवाज ऐकणाऱ्याला एका भावावस्थेत बोट धरून घेऊन जातो. ‘तुम्बी वा…’बाबत हा अनुभव प्रकर्षाने येतो. सुरुवातीची एस. जानकी यांच्या आवाजातील ‘लऽल’कारी झाल्यानंतर शब्द कानी पडू लागतात… ‘तुम्बी वा तुम्बकुडत्तीन तुंजत्ता युन्न्यायडा, आकाश पोन्नानिल गळे आयत्तील तोट्टे वराम…’ आणि ऐकणारा नकळत बोट सोडून मनमोकळा विहार करू लागतो. ‘हे चतुरा, थुंबीच्या गुच्छावरती छान तू झोके घे/ हे चतुरा, थुंबीच्या गुच्छावरती छान तू झोके घे/ आकाशीच्या सोनेरी पिंपळपानाला स्पर्श तू कर… झेप घे/ आकाशीच्या सोनेरी पिंपळपानाला स्पर्श तू कर… झेप घे…’ ‘आकाश पोन्नानिल गळे आयत्तील तोट्टे वराम/ उंजाळेऽ… पाडामोऽऽ… उंजाळेऽ… पाडामोऽऽ…’ म्हणजे, ‘घे झोकेऽ… गाणं गाऽऽ’ एस. जानकी श्रोत्याला आपल्या गाण्यांत असे एकरूप करायच्या. त्यांची मातृभाषा तेलुगू.
तमिळ, तेलुगू, कानडी आणि मल्याळी या चार प्रमुख भाषांतील सत्तर, ऐंशी आणि नव्वदची दशके ‘एस. जानकी’मय राहिली आहेत. या प्रत्येक भाषेत त्यांचा ‘इरा’ राहिला आहे. पेंड्याला ते ‘अरेबिक कुथू’वाला आजचा अनिरुद्ध असा संगीतकारांसोबतचा त्यांचा हा प्रवास आहे. मल्याळी संगीतकार एम. एस. बाबुराज यांच्यासोबत त्यांनी सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केलीत. दक्षिणामूर्ती, श्याम, उमर, राघवन, एम. के. अर्जुनन, रवींद्रम, एम. जी. राधाकृष्णन, जॉन्सन या मल्याळी संगीतकारांच्या स्वररचनांना एस. जानकी यांनी आवाज दिला. दक्षिणामूर्ती यांच्या संगीत दिग्दर्शनातील पहिले गाणे १९५०च्या दशकात आणि शेवटचे गाणे २००८मध्ये गायले. सर्वाधिक गाणी कानडी भाषेत गायली. या चित्रपटसृष्टीत जी. के. वेंकटेश, राजन नागेंद्र, विजयभास्कर, एम. रंगराव, उपेंद्र कुमार आदी संगीतकारांसोबत काम केले. एस. जानकी यांची सर्वाधिक तमिळ गाणी इलायराजांसोबतची आहेत. एम. एस. विश्वनाथन, शंकर-गणेश, चंद्रबोस, ए. आर. रहमान, विद्यासागर, देवा, सिरपी या तमिळ चित्रपटसृष्टीतील संगीतकारांसोबतही त्यांनी काम केले. तेलुगूत इळयराजा, सत्यम, के. व्ही. महादेवन, चक्रवर्ती, रमेश नायडू, राज-कोटी, वंदेमातरम श्रीनिवास, माधवपेद्दी या संगीतकारांसोबत शेकडो गाणी दिलीत. या साऱ्या संगीतकारांमध्ये सर्वाधिक हिट्स दिले ते इलयराजा-एस. जानकी यांनी.
एस. जानकी यांची एकल गीते हा आणखी स्वतंत्र विषय ठरावा. त्या दक्षिणेतील तीनशेहून अधिक अभिनेत्रींचा ‘आवाज’ झाल्या होत्या. ‘ओळख’ झाल्या होत्या. ‘जानकीअम्मांचा आवाज लाभला म्हणून लोकप्रियता मिळाली’, असे अनेक दिग्गज अभिनेत्री अगदी जाहीरपणे सांगतात. एस. जानकी यांची युगुलगीतांची यादीही मोठीच. तेलुगूमधील घंटासाला, पी. बी. श्रीनिवास, एस. पी. बालसुब्रमण्यम, मनो यांच्यासोबतची युगुलगीते किती सांगावीत; तमिळमधील टी. एम. सौंदरराजन, पी. बी. श्रीनिवास, एस. पी. बालसुब्रमण्यम (एसपीबी), येशूदास, जयचंद्रन, मलेशिया वासुदेवन, इळयराजा, मनो यांच्यासोबतची कोणती गाणी सांगावीत! कानडी भाषेत पी. बी. श्रीनिवासन, डॉ. राजकुमार, एसपीबी, येशूदास तर, मल्याळीमधील येशूदास, जयचंद्रन यांच्यासह दिलेल्या श्रवणीय गाण्यांची यादी करतो म्हटले तर कोणती घ्यावीत आणि कोणती सोडावीत. प्रश्नच पडतो.
इळयराजा-एस. जानकी यांनी संगीतकार-पार्श्वगायिका म्हणून जशी अजरामर गाणी दिली आहेत, तशीच एस. जानकी आणि एसपीबी यांची गाणी आहेत. मुख्य गायक एसपीबी आणि एस. जानकी यांचा केवळ आलाप वा हमिंग अशा ‘रवी वर्माके…’सारख्या गाण्यांचीही संख्या कमी नाही. ‘जानकीअम्मा यांच्याशिवाय माझी ही अशी सारी गाणी अपुरी असती’, असे एसपीबींनी या आलाप वा हमिंगच्या अनुषंगाने जानकीअम्मांबाबत अनेकदा आवर्जून सांगितले आहे. ‘नीरांजनम’ नावाचा एक तेलुगू चित्रपट होता. याचे संगीत ओ. पी. नय्यर यांनी दिले होते. यातील ‘निनू चुडक नेनूडलेनू’ हे गाणे एस. जानकींनी एसपीबींसोबत गायले आहे. यातील एस. जानकी यांच्या आलापाने ओ. पी. नय्यर जाम खूश झाले होते.
एस. जानकी खमक्या आणि खोडकरही. त्यांचा खोडकरपणा संगीतकारांनी सुरावटींत बेमालूम मिसळला. ‘मोठ्या’ एस. जानकी यांनी लहान मुलांसाठी लहान होऊन गाणी गायली आहेत. ‘तरुण’ एस. जानकी यांनी वृद्ध व्यक्तिरेखेला वयाला साजेसा आवाज दिला आहे. पुरुषाचाही आवाज दिला आहे. अशा गाण्यांची संख्या चार-पाच नाही तर पन्नासच्या वर आहे. या गाण्यांत ओढूनताणून हा भाव नाही. सहजता आहे. गायनात अदाकारी करणारे पार्श्वगायक वा पार्श्वगायिका फार कमी. मोहम्मद रफी हमखास आठवतात. त्यांना तोड नाही! अगदी असेच एस. जानकी यांच्याबाबत होते. त्या गाण्याची नस पकडत, अभिनेत्रीचा कस जाणत आणि गायनकौशल्याचा रस ओतत. हा मिलाफ इतका बेमालूम होत असे की श्रोते गारद! एस. जानकी या स्वत: रफींच्या चाहत्या. एका स्टेज शोमध्ये त्यांनी ‘दोस्ती’मधील ‘चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…’ हे गाणे सादर केले होते. राहणीमानातील साधेपणा त्यांची जानकीअम्मांची ठळक ओळख. नोटेशन स्टँड त्यांनी क्वचितच वापरले असावे. गाणी लिहिलेली छोटीशी डायरी हाती असे ‘रेखाचित्र’ हमखास दिसत असे.
पी. सुशीला यांची कारकिर्द एस. जानकी यांच्यापूर्वी सुरू झाली असली तरी तीन-चार दशके दोघीही दक्षिणेतल्या चित्रपटसृष्टीत समकालीन राहिल्या. दोघींमध्ये स्पर्धा आहे, दोघींमध्ये असूया आहे, अशा चर्चा सतत होत राहिल्या. या चर्चांना अर्थ नव्हता. एका कॉन्सर्टमध्ये दोघींनी गातागाता एकमेकींच्या ऑन स्टेज काढलेल्या खोड्या अनेक चाहत्यांच्या स्मरणात आहेत. एस. जानकी यांच्या निधनानंतर ९२ वर्षांच्या पी. सुशीला यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला. यात त्या म्हणाल्या. ‘तमिळ चित्रपटसृष्टीतील कोणतीही गायिका एस. जानकी यांच्या बहुमुखी प्रतिभा आणि अभिव्यक्तिपूर्ण आवाजाशी बरोबरी करू शकत नाही. एकत्र काम करण्याचे भाग्य आम्हाला लाभले.’
एस. जानकी यांनी २०१६ साली निवृत्तीची घोषणा केली होती. त्या वर्षीचा मल्याळी चित्रपट ‘पथ् कल्पनगळ’मधील ‘अम्मापूविन्यूम’ हे त्यांचे तसे शेवटचे गाणे असणार होते. पण, ‘पन्नाडी’ या राजेश रामलिंगम यांनी संगीतबद्ध केलेल्या तमिळ चित्रपटातील एका युगुलगीतासाठी त्या राजी झाल्या. २०१८ सालच्या या चित्रपटातील ‘उ उसुरु कातुला…’ हे गाणे एस. जानकी यांचे शेवटचे गाणे ठरले. पार्श्वगायनाची सुरुवात तमिळ गीताने आणि निरोप तमिळ गीताने. जानकीअम्मांनी लौकिकार्थाने या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचा आवाज चाहत्यांचा मनात झोके घेत राहणार आहे. त्यांचे गाणे कित्येक जण कितीतरी काळ गात राहणार आहे, उंजाळेऽ… पाडामोऽऽ ‘घे झोकेऽ… गाणं गाऽऽ’

