Headlines

Rickshaw fares will increase in pune how much will passengers have to pay from september 1; पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील रिक्षा प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार


Pune Rikshaw Fare Hike: वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असल्याचे रिक्षा संघटनांनी सांगितले.

pune riskshaw
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील रिक्षा प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील रिक्षा प्रवाशांना एक सप्टेंबरपासून वाढीव भाडे मोजावे लागणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) सोमवारी झालेल्या बैठकीत रिक्षा भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, पहिल्या दीड किलोमीटरसाठीचे किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले असून, त्यानंतर प्रति किलोमीटरचा दर १७ रुपयांवरून २० रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खर्चात वाढ होणार असली, तरी वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या रिक्षाचालकांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘आरटीए’च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत रिक्षा भाडेवाढीबरोबरच परिवहन क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पुण्यात सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यामध्ये रिक्षांचा मोठा वाटा आहे. पुण्यात साधारण दीड लाखांच्या आसपास रिक्षा आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी सातत्याने करण्यात येत होती. सीएनजीच्या वाढलेल्या किमती, वाहनांच्या सुट्या भागांचे वाढलेले दर, विमा, देखभाल आणि दुरुस्तीवरील खर्च; तसेच सर्वसाधारण महागाईमुळे सध्याच्या भाडेदरात व्यवसाय करणे परवडत नसल्याचे संघटनांचे म्हणणे होते. या संदर्भात आरटीएने तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली होती.

या मागणीची दखल घेऊन ‘आरटीए’ने नव्या भाडेदरांना मंजुरी दिली. हे दर १ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सर्व रिक्षाचालकांना आपल्या मीटरचे रिकॅलिब्रेशन करून घ्यावे लागणार आहे. नवीन भाडेदरांनुसार मीटरमध्ये आवश्यक बदल झाल्यानंतरच वाढीव भाडे आकारता येणार आहे. हा निर्णय पुणे जिल्ह्यातील सर्व परवानाधारक रिक्षांसाठी लागू राहणार आहे.

दरम्यान, भाडेवाढीचा परिणाम सर्वसामान्य प्रवाशांच्या दैनंदिन प्रवास खर्चावर होणार आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा