Headlines

Rickshaw driver from parbhani decorates home into a golden palace for daughters welcome; माझ्या मुलीत मला माझी आई दिसली; परभणीच्या रिक्षाचालकाने सजवला सोन्याचा महाल


सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: दोन वर्षांपूर्वी जवळच्या लोकांनीच दूर केलं… हमाली करणाऱ्या वडिलांचे २००६ मध्ये अपघातात निधन, तर तीन वर्षांपूर्वी आईलाही हृदयविकाराच्या झटक्याने गमावलं…अवघ्या ८ वीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि रिक्षा चालवून पोट भरणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर कमी नव्हते. मात्र, याच जावेद यांच्या घरात जेव्हा एक गोंडस परी जन्माला आली, तेव्हा त्यांनी आपल्या पत्र्याच्या घराचा थेट सोन्याचा महाल करून तिचे स्वागत केले.​ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमागे एका बापाचे आपल्या मृत आईवरील अथांग प्रेम आणि एका मानलेल्या बहिणीची मोठी साथ दडलेली आहे.

​शेख जावेद रफिक (वय ३०, रा. सेवक नगर, परभणी) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.​ जावेद यांचा वर्षभरापूर्वी शेख आलिया फातिमा यांच्याशी विवाह झाला. पत्नी गरोदर असतानाच जावेद यांनी मनात एक स्वप्न बाळगलं होतं की, घरात मुलगीच जन्माला यावी.​ यामागचं भावुक कारण सांगताना जावेद म्हणाले, “माझं माझ्या आईवर खूप-खूप प्रेम होतं. ती अचानक सोडून गेली. मला मुलगीच व्हावी अशी माझी तीव्र इच्छा होती, कारण मला माझ्या मुलीमध्ये माझ्या मृत आईचं रूप बघायचं आहे.”

​मानलेल्या बहिणीने दिली साथ अन् झोपडी सजली

​दोन वर्षांपूर्वी जेव्हा जवळच्या नातेवाईकांनी जावेद यांना एकटं पाडलं, तेव्हा रेखा सुभाष शिर्के या त्यांना भाऊ मानून पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. रेखा शिर्के यांनीच पुढाकार घेऊन जावेद यांचं लग्न जमवून दिलं होतं.​ जावेद जेव्हा दवाखान्यात पत्नी आणि बाळाला आणायला गेले, तेव्हा या मानलेल्या बहिणीनेच (रेखा शिर्के) जावेद यांना घर सजवण्यासाठी मोलाची मदत केली. घरात निळ्या-गुलाबी फुलांची सजावट, फुगे आणि कॉटवर ताज्या गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा पसरवून “Welcome It’s My Baby Girl” असा बोर्ड लावून त्यांनी घराचे रूपच बदलून टाकले.

​घरच्या तयारीने पत्नी भारावली

​जावेद यांची पत्नी आलिया म्हणाल्या, आम्हाला मुलगीच हवी होती. मुलगा असो की मुलगी, आम्ही कधीच भेदभाव करत नाही. मी दवाखान्यात असताना पतीने घरी एवढी मोठी तयारी केली असेल याची मला कल्पनाच नव्हती. जेव्हा मी बाळाला घेऊन घरी आले, तेव्हा मला आनंदाचा मोठा धक्का बसला. स्त्रीभ्रूण हत्या आणि मुलगाच हवा या हट्टामुळे अनेक ठिकाणी मुलींना जन्माआधीच मारले जाते किंवा जन्मल्यावर रस्त्यावर फेकून दिले जाते. अशा भीषण वास्तवात परभणीतील या ८ वी पास रिक्षाचालकाने दाखवलेले हे प्रेम समाजाला मोठा संदेश देऊन जात आहे.