Relationship Reality and Financial Struggles: प्रेम करणं सोपं असतं, पण जेव्हा जबाबदाऱ्या अंगावर येतात, तेव्हा प्रेमाचा खरा कस लागतो. अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ती एका मोडकळीस आलेल्या झोपडीत संसार करत आहे. घरातून पळून जाऊन लग्न केल्यानंतरचं वास्तव तिनं या व्हिडिओमधून दाखवलं आहे.

काय म्हणाली तरुणी?
हा व्हिडिओ @RealNainaSingh या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये झळकणारी तरुणी प्रेमविवाहानंतरचं वास्तव मांडताना दिसते. तिच्या घराचं छप्पर गळतं, भिंतींना प्लास्टर केलेलं नाही. घरात ना फर्निचर आहे, ना बसण्यासाठी सोफा. धान्य ठेवण्यासाठी ते प्लास्टिकच्या ड्रमचा वापर करतात. तर स्वयंपाकघराच्या नावाखाली फक्त एक छोटीशी चूल आहे. तरुणी सांगते की, घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय जितका रोमँटिक वाटतो, तितकंच त्यानंतरचं आयुष्य कठीण असतं. मात्र, व्हिडिओच्या शेवटी ती म्हणते, “आमच्याकडे सोयी-सुविधा नसल्या तरी आम्ही आनंदी आहोत. रडत बसण्यापेक्षा संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
नेटकरी काय म्हणताहेत?
हा व्हिडिओ आतापर्यंत ६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या परिस्थितीला प्रेमाची खरी परीक्षा म्हटलं आहे, तर काहींनी तरुणीला पालकांकडे परत जाण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आयुष्य जगण्यासाठी केवळ प्रेम पुरेसं नसतं; आर्थिक स्थैर्यही तितकंच महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर नवरा-बायकोनं एकमेकांना खंबीर साथ दिली, तर आर्थिक संकटावरही मात करता येऊ शकते. असो, या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या.

