School Girls Report Bad Road: रायगडमधील कोंदिवडे गावातील दोन शाळकरी मुलींनी खराब रस्त्याचं उपरोधिक शैलीत केलेलं रिपोर्टिंग केलं. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून राज्यभरातील लोकं या मुलींचं कौतुक करत आहेत.

काय म्हणाल्या मुली?
हा व्हिडीओ @Mahadev_Balgude आणि @AdvYashomatiINC अशा अनेक सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतील दोन मुली आपल्या गावातील रस्त्याची दुर्दशा दाखवत आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे, या मुलींनी उपरोधिक शैलीत रस्त्याचं वर्णन केलंय. त्या म्हणताहेत, हा रस्ता जणू राज्यातील इतर मोठ्या हायवेंसारखा दिसतोय. हा रस्ता इतका भारी आहे की, त्याच्या पोटातील पाणी सुद्धा निघत नाहीये. खड्ड्यामध्ये रस्ता आहे की रस्त्यामध्ये खड्डा, काहीच कळत नाहीये. आणि व्हिडीओच्या शेवटी त्यांनी या खड्डेमय रस्त्याची दृश्यं दाखवली आहेत.
रस्त्यात खड्डा की खड्ड्यामध्ये रस्ता?
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. अन् राज्यभरातील नेटकरी या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये राज्य सरकारवर टीका करत आहेत आणि रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करत आहेत.
रस्त्याचं काम झालं सुरू
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं या रस्त्याची गांभीर्यानं दखल घेतली आणि अवघ्या काही तासांत रस्त्याची पुनर्बांधणी केली. @ThorveMahendra या एक्स हँडलवरून रस्त्याचं काम सुरू झाल्याची माहिती देणारे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो पाहून लोकांनी समाधान व्यक्त केलंय आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

