म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहर, जिल्ह्यासह सर्वदूर सलग तीन दिवस मुसळधार बरसलेल्या पावसाचा जोर मंगळवारी ओसरला. दिवसभरात अधूनमधून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणेकरांना काही वेळासाठी तरी उघडीप बघायला मिळाली. जिल्ह्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळपासूनच वारा सुटल्याने हवेत गारवा जाणवला.
वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने शहरात सहा दिवस सलग जोरदार हजेरी लावली. जुलै महिन्याची सरासरी सहा दिवसांत ओलांडली. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्य रस्त्यांवर, उपनगरांतील गल्ल्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाचे पाणी साठले होते. अनेक सोसायट्या आणि वस्त्यांमध्येही पाणी शिरले होते. पावसाचा जोर पाहून प्रशासनाने दोन दिवस शाळांना सुट्ट्याही दिल्या; पण मंगळवारी पावसाने अधूनमधून विश्रांती घेतली. सकाळी दहानंतर वारा सुटला होता. दुपारपर्यंत हलक्या सरी बरसल्या आणि तीनच्या सुमारास मोठी सर आली. संध्याकाळीही पावसाची रिपरिप सुरू होती. शहरात दिवसभरात कमाल २६.७ आणि किमान २२.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. संध्याकाळी हवेत गारवाही जाणवला.
मध्यम पावसाची शक्यता
पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरणार असून, शहरात आकाश प्रामुख्याने ढगाळ राहणार आहे. दिवसभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या आणि घाटात मुसळधार पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे. पुण्यात एक जून ते सात जुलै या कालावधीत ३७१ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीतील सरासरीच्या तुलनेत १७४.८ मिलिमीटर जास्त पाऊस पडला आहे.
सुरक्षेस्तव शिवनेरी बंद
जुन्नर : मुसळधार पावसामुळे किल्ले शिवनेरी पदपथ मार्गावर दोन दिवसांत दोन ठिकाणी कातळकड्यांवरील दगड ढासळले होते. त्यातच मंगळवारी कुलूप दरवाजा आणि हत्ती दरवाजा या पदपथ मार्गावर कड्यावरून दरड कोसळून रस्ता बंद झाला. त्या वेळी तिथे पर्यटक नसल्याने दुर्घटना टळली. त्यामुळे किल्ले शिवनेरी पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे, किल्ले परिसरात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. गड बंद राहणार आहे. त्यामुळे शिवभक्त आणि पर्यटकांनी पुढील आदेशापर्यंत शिवनेरी किल्ल्यावर येणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सिंहगडावर प्रवेश आज बंद
घाट रस्त्यात दरड पडण्याचा धोका ओळखून सिंहगड आज, बुधवारी बंद राहणार आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले यांनी दिली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा