Pune MH 12 Number Plate Series to remain Pratap Sarnaik talks with Nitin Gadkari; पुण्याची MH12 ओळख टिकणार? इंग्रजी अक्षरं संपत आली, प्रताप सरनाईकांनी पर्याय सांगितले, गडकरींशीही चर्चा
Pune MH 12 Number Plate Series to remain Pratap Sarnaik talks with Nitin Gadkari; पुण्याची MH12 ओळख टिकणार? इंग्रजी अक्षरं संपत आली, प्रताप सरनाईकांनी पर्याय सांगितले, गडकरींशीही चर्चा
Pune MH12 Number Plate Series : पुण्यातील वाहन क्रमांकासाठी वापरली जाणारी ‘एमएच १२’ ही इंग्रजी अक्षरांची मालिका संपत आल्यामुळे पुढील काळात पुण्याला ‘एमएच ६०’ ही मालिका मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील वाहन क्रमांकासाठी वापरली जाणारी ‘एमएच १२’ ही इंग्रजी अक्षरांची मालिका संपत आल्याने पुढील काळात पुण्याला ‘एमएच ६०’ मालिका मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पुण्याची ओळख असलेली ‘एमएच १२’ हीच मालिका कायम ठेवण्यासाठी ‘ए वन’ किंवा ‘वन ए’ अशा नव्या मालिकेचा पर्याय सुचविण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा सुरू असून, या पर्यायाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिली.
पुण्याची जुनी ओळख कायम ठेवणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी सरनाईक यांनी शुक्रवारी पुणे स्थानक बसस्थानकाची पाहणी केली. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुण्याच्या वाहन क्रमांक मालिकेबाबत माहिती दिली. पुण्याची जुनी ओळख कायम ठेवण्याच्या दृष्टीने पर्यायांवर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी भाषा न आल्यास रिक्षा चालकांवर कारवाई
‘रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कोणतीही वाढ केली जाणार नाही. १८ ऑगस्टपासून मराठी भाषा न शिकलेल्या परप्रांतीय रिक्षाचालकांवर कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल,’ असा इशारा सरनाईक यांनी दिला. मुदतवाढीसाठी कोणी भेटले किंवा विनंती केली, तरी निर्णयात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा या निर्णयाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे स्थानक बसस्थानकाच्या पाहणीदरम्यान सरनाईक यांनी हिरकणी कक्ष, पाणपोई, प्रसाधनगृहे; तसेच प्रवाशांसाठी उपलब्ध विविध मूलभूत सुविधांची पाहणी केली. बसस्थानकातील स्वच्छता, प्रसाधनगृहांची देखभाल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि महिला प्रवाशांसाठीच्या सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. आढळलेल्या त्रुटींबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्या तातडीने दूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बसस्थानकांची नियमित स्वच्छता, प्रसाधनगृहांची योग्य देखभाल आणि पिण्याच्या पाण्याची अखंड उपलब्धता याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यांनी काही प्रवाशांशी थेट संवाद साधून एसटी बससेवेबाबत त्यांचे अनुभव जाणून घेतले.
… तर ठेकेदार ‘ब्लॅकलिस्ट’
एसटीच्या विविध स्थानकांमध्ये खड्डे पडले असून, ते तातडीने बुजविण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले. एसटी महामंडळाच्या जागांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. स्थानकांवरील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगून कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर संबंधित व्यवस्थापन आणि आगारप्रमुखांनी ठेकेदारांना ‘ब्लॅकलिस्ट’ करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरटीओ कार्यालयांमध्ये एजंटगिरी असल्याचेही सरनाईक यांनी मान्य केले. ‘माजी आरटीओ अधिकाऱ्यांकडून वसुलीचे रॅकेट चालविले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ‘एसआयटी’ची स्थापना केली आहे. एसआयटीच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आरटीओच्या सर्व्हरमधील तांत्रिक समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल,’ असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा