Headlines

Pune Has Failed As A City Viral X Post Raises Questions Over Traffic and Infrastructure | ‘पुणे शहर म्हणून अपयशी ठरलंय’; खराब रस्ते, ट्रॅफिक आणि नागरी सुविधांवरून लोकांमध्ये संताप, पुणेकरांची पोस्ट व्हायरल


Pune Civic Issues: पुण्यातील वाहतूक, खराब रस्ते, नागरी सुविधा, पर्यावरणाची हानी आणि ट्रॅफिक यावर एका पुणेकरानं केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टला बहुतांश लोकांनी समर्थन दिलं आहे. तसंच शहरासमोरील प्रश्न गंभीर होत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Pune traffic problems
(फोटो सौजन्य – @ninaad_pai/x.com)
पुणे हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या देशातील अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. त्यामुळे पुण्याला ‘विद्येचं माहेरघर’ म्हणूनही ओळखलं जातं. शिवाय, उद्योगधंद्यांच्या बाबतीतही पुणे मुंबई, बेंगळुरू आणि देशातील इतर कुठल्याही मोठ्या शहराच्या तुलनेत मागे नाही. पण इतकं विकसित आणि महत्त्वाचं शहर असूनदेखील एका व्यक्तीनं पुणे हे आता संपलेलं शहर आहे, असं म्हटलं. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत असून, त्यामुळे एक वेगळाच वाद तयार झाला आहे. कोणी म्हणतंय, पुणे हे एक अपयशी शहर आहे, तर कोणाच्या मते लोकांना सामावून घेण्याची क्षमता आता पूर्णपणे संपली आहे. चला, पाहूया या पोस्टमध्ये नेमकं म्हटलंय तरी काय?

काय लिहिलंय पोस्टमध्ये?

ही पोस्ट @ninaad_pai या एक्स अकाउंटवरून करण्यात आली आहे. ही पोस्ट पुण्यातच राहणाऱ्या एका व्यक्तीनं केली आहे. तो म्हणतोय, “पुणे हे ठिकाण शहर म्हणून अपयशी ठरलंय. माझा जन्म पुण्यातच झालाय. पुण्यातच मी लहानाचा मोठा झालो. पण शहरातील वाहतूक, खराब रस्ते आणि नागरी सुविधांची अवस्था पाहून निराशा होते. राजकीय नेते आणि सरकारी यंत्रणा केवळ आश्वासनं देतात. पण परिस्थिती काही बदलत नाही. शहराला ठोस उपाययोजनांची गरज आहे. पण याकडे कोणीच लक्ष देत नाही. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचं नुकसान होतंय, झाडांची कत्तल होतेय. तर दुसरीकडे नव्याने बांधलेले पूलही पडताहेत. बेशिस्त वाहनचालक, वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि वाढता रोडरेज यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.”

नेटकऱ्यांनी दर्शवली सहमती

ही पोस्ट आतापर्यंत १ लाख ६८ हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. तसंच, अनेकांनी प्रतिक्रिया देत या पोस्टमधील मतांशी सहमत असल्याचं वक्तव्य केलंय. वास्तविक, यापूर्वी अनेकदा शहर व्यवस्थापनावर चर्चा झाली आहे. राजकीय नेत्यांनी त्यावर मोठमोठी भाषणं केली आहेत. स्थानिकांनी पायाभूत सुविधांच्या अभावासाठी आंदोलनं केली आहेत. पण तरीदेखील परिस्थिती फारशी बदलली नाही, हे वास्तव आहे. किंबहुना, वाढत्या लोकसंख्येमुळे हे प्रश्न आणखी तीव्र होत चालल्याची भावना या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्येही पाहायला मिळतेय. असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा