Headlines

Pune Ganeshotsav 2026: आवाज ‘थांबव’ डीजे… – pune ganeshotsav 2026 dj loud speaker restrictions meeting special explainer


गणेशोत्सवाला काही दिवसांचा अवधी असताना राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पुन्हा ध्वनिवर्धकांच्या अतिरेकामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि ‘निर्बंधमुक्त उत्सवा’चा अट्टाहास यांचा झगडा ऐरणीवर आला आहे. मुंबईत उंच गणेशमूर्ती कोसळून दुर्घटना घडली; तर पुण्यात महापौरांच्या बैठकीत कार्यकर्ते आक्रमक झाले. ‘डीजे’ नावाच्या कानठळ्या बसवणाऱ्या यंत्रणेमुळे होणाऱ्या त्रासाचे अनुभव पुण्या-मुंबईपासून कोल्हापूर-नागपुरापर्यंत ठिकठिकाणचे नागरिक पूर्वीपासून सोसत आहेत; उत्तर प्रदेशात याच आवाजामुळे इमारती थरथरत असल्याचे ताजे दृश्य नागरिकांनी पाहिलेच असेल.

पुण्यात पोलिसांनी सुरू केलेल्या कक्षाकडे गेल्या आठ महिन्यांत ध्वनिप्रदूषणाच्या तब्बल १४ हजार तक्रारी आल्या, त्यावरून हे प्रकार एखाद्या उत्सवापुरते मर्यादित राहिले नसून, वर्षभराचा त्रास झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता तरी राज्यकर्त्यांनी लोकानुनयी भूमिका सोडावी आणि नागरिकांच्याही आरोग्याची दखल घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह व नागरिकांची मानसिकता यांचा सुवर्णमध्य साधावा, ही अपेक्षा आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारने नुकताच ‘राज्योत्सवा’चा दर्जा दिला. त्यापूर्वीही गणेशोत्सव उत्साहात साजरा होत होताच; पण त्या निमित्ताने राज्यकर्त्यांनी ‘निर्बंधमुक्त उत्सवा’ची घोषणा दिली आणि विविध घटकांमधून त्याचा सोयिस्कर अर्थ काढण्यास सुरुवात झाली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ‘डीजे’ नामक छोटेखानी यंत्रणेची नागरिकांच्या कानांचे पडदे फाडून टाकण्याची भीतीदायक क्षमता सर्वांनीच अनुभवली आहे. कोल्हापुरात आणि पुण्याच्या उपनगरात या आवाजाने कोणाला प्राण गमवावे लागले, तर वृद्ध, रुग्ण, गर्भवती महिला आणि सर्वसामान्यांना कायमचा बहिरेपणा-ह्रदयविकार असे शेकडो अनुभव लक्षात घेऊन सोलापुरात जाणत्यांनी मिरवणुकीत ‘डीजे’वरच बंदी आणली, मग तेच सत्ताधारी असताना पुण्यात तो पुढाकार का घेतला जात नाही? बरे, हे ध्वनिवर्धक मर्यादेत असते, तर नागरिकांनी विरोध केलाही नसता. पण, ६० ते ८५ डेसिबलपर्यंत गोंगाटाची मानवी कानांची क्षमता असताना ‘डीजे’चे आवाज सगळ्या मर्यादा धाब्यावर बसवून सव्वाशे ते दीडशे डेसिबलपर्यंत पोहोचू लागले.

ज्याचा आवाज जास्त; त्याची म्हणे परिसरात ‘हवा’ निर्माण होते; त्यातूनच ‘आवाज वाढव डीजे’ची स्पर्धा लागते, असे त्यामागील वर्चस्वाचे अजब मानसशास्त्र. ‘एखाद्याने ‘डीजेमुक्ती’चे आवाहन केले, म्हणून ‘मी अधिक जोरात ‘डीजे’ वाजविणार,’ अशा मानसिकतेमधून आपण सर्वांचेच आरोग्य धोक्यात आणत आहोत, याचे भान विस्मृतीत जात आहे. पुण्यातील बैठकीत कार्यकर्त्यांच्या संघटित आक्रमकपणामुळे तक्रार करणाऱ्या नागरिकालाच बाहेर काढले गेले आणि ‘लोकनेते’ म्हणवून घेणारेही निमूटपणे बसून राहिले; मग सामान्यांनी दाद मागावी कुठे, असा प्रश्न पडल्यास नवल नाही. ‘अन्य उत्सवांमध्ये कारवाई का होत नाही,’या युक्तिवादात तथ्य आहेच. ध्वनिप्रदूषणाचा त्रास जात-धर्मापलीकडे सगळ्याच समाजाला होतो, त्यामुळे वर्षभर हे उल्लंघन रोखण्याची जबाबदारी पोलिसांना टाळता येणार नाही.

पुण्यात ध्वनिक्षेपकांबाबतचा निर्णय पोलिस आयुक्तांवर सोपवण्यात आला; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या वेळ आणि ध्वनिमर्यादेच्या निकषांमध्ये सूट-सवलती देण्याचा अधिकार आयुक्त किंवा सरकारला तरी आहे का? गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुंडागर्दी आणि ध्वनिप्रदूषणामुळे नवरात्रीतील तोरण मिरवणुकांवर बंदी घातली आणि पुणेकरांनीही त्यांना दुवा दिली, याची आठवण ताजी आहे.

हे नियम म्हणजे उत्सवातील कार्यकर्त्यांवरचा अन्याय नाही, तर सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करून आखलेली चौकट आहे, हे कार्यकर्त्यांना पटवून देण्याची जबाबदारी राजकीय आणि गणेशोत्सवातील नेत्यांचीही आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनाही विश्वासात घ्यावे लागेल. हा साऱ्या समाजाचा उत्सव असल्यानेे संयमाचा सल्ला देणाऱ्या सर्वांनाच ‘उत्सवविरोधी’ ठरवून बाद करणेही योग्य नाही. अशा कंठाळी ‘इव्हेंटीकरणा’तून निवडक मंडळींचा ‘संघटना’चा हेतू साध्य होईलही; पण ‘प्रबोधना’चा उद्देश मागे पडून चालणार नाही.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत