Headlines

Prabhakar Kolte: मी रिता झालेलो नाही… – veteran painter prabhakar kolte entered 80th year on 27 june 2026


-प्रभाकर कोलतेमाझं बालपण तसं साधंच होतं. आई-वडील साधेच होते. पण वडिलांची विविध क्षेत्रातील लोकांशी मैत्री होती. ते त्यांच्यात रमायचे. अशा लोकांना पाहता पाहता मला असं वाटायचं की आपणही असं खास काही केलं पाहिजे. मोठं झाल्यावर या लोकांसारखं झालं पाहिजे. ते नेमकं काय ते माहीत नव्हतं. पण कदाचित मनाशी खूणगाठ तिथे बांधली गेली असेल. जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्राध्यापक, दिग्गज चित्रकारांकडे पाहताना हे जास्त जाणवलं. जेजेचं विश्वच खरं तर वेगळं. तिथे येणारे लोक, विद्यार्थी हे सारंच भारावणारं. मी या सगळ्यात गुंतलो. आजही वडिलांनी दिलेला पाठिंबा, पळशीकर सरांकडे बघत सुरू झालेला प्रवास असं सारं आठवतं.

मी राहायचो बीडीडी चाळीत. टीव्ही टॉवरचा चौथा पाय आमच्या चाळीजवळ होता! या चाळीमध्ये भजन, किर्तन, श्रावणातली पारायणं अशा अनेक गोष्टी अनुभवल्या. चाळीमधील गणेशोत्सवात आपली सजावट इतरांपेक्षा कशी वेगळी असेल याचा विचार रुजताना चित्रकलेशी जवळचं नातं तयार झालं. चित्रांमधून उमटणाऱ्या विचारांचा पाया कदाचित तिथे घातला गेला असेल. इतर अभ्यासाची मला फारशी आवड नव्हती, पण चित्रं आवडायची. शाळेतल्या शिक्षकांनी माझ्या चित्रप्रवासाला अधिक चांगलं वळण दिलं. त्यांची चित्रं पाहताना त्यांच्यासारखं चित्र काढलं पाहिजे, असं सातत्यानं वाटायचं. त्यावेळी दिवाळी अंक, पुस्तकं यावर दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर यांची चित्रं पाहायला मिळायची.

रिअॅलिझम शैलीतील ही चित्रं पाहताना भारावल्यासारखं व्हायचं. अशी चित्रं काढता आली पाहिजे, असं वाटायचं. पण शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की, ‘कॉपी करू नका. माझं चित्र पाहा, पण तसंच्या तसं काढू नका. तसंच काढलंत तर वर्गातून बाहेर काढून टाकेन.’ हे ऐकून आमचा दृष्टिकोन बदलला. स्वतःचं काही करावं याचं बीज रुजलं. शिक्षक आम्हाला पुस्तकंही वाचायला सांगायचे. दलाल तर आमच्यासाठी देव होते. आमच्या शिक्षकांनी ‘हे सारं पाहता ना?’, असं विचारून आम्हाला चित्रं पाहण्याची दिशा दाखवली. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मग पुढे जे. जे. स्कूल ऑफ आर्टला प्रवेश घेतला. चित्रकलेसाठीचं साहित्य परवडेल अशी तेव्हाची स्थिती नव्हती. मात्र वडिलांचे प्रोत्साहन, पाठिंबा खूप महत्त्वाचा होता. वडिलांना चित्रकला आवडायची. ते मोठे चित्रकार नव्हते. पण मला मात्र ते ‘आज काय करणार आहेस?’, असं आवर्जून विचारायचे.

कॉलेजमध्ये विविध प्राध्यापकांच्या मार्गदर्शनानं चांगलं वाचायलाही लागलो. त्यावेळी संभाजी कदम, विश्वनाथ शोलापूरकर आणि अर्थातच शंकर पळशीकर यांच्यासारखे प्राध्यापक आम्हाला शिकवायला होते. पळशीकर अधिष्ठाता होते; त्यामुळे तसा संपर्क कमी होता सुरुवातीला. आमचे प्राध्यापक, शिक्षक आम्हाला विविध पुस्तकं, चित्रकारांनी लिहिलेलं साहित्य वाचायला सांगायचे. मला सुरुवातीला ‘भारतीय पॉल क्ले’ असंही म्हटलं गेलं. पण खरं तर अगदी सुरुवातीला पॉल क्ले कोण हेही माहीत नव्हतं! जेजेने आम्हाला घडवलं. आम्ही आमच्या प्राध्यापकांची चित्रं पाहायचो. त्यांचं काम पाहतच आम्ही शिकत गेलो. आमच्या कामांमध्ये चुका असायच्या.

कदम, शोलापुरकर यांच्याकडे पाहत आमचा चित्र काढण्याचा दृष्टिकोन घडत गेला. शोलापुरकर एकदा वर्गात आले. त्यांनी हातातलं भांडं जमिनीवर फेकलं, ते फुटलं. त्यानंतर त्यांनी हे चित्र रंगवा, असं म्हटलं. तेव्हाच्या बुद्धीनुसार काहीच सुचेना. यात काय रंगवायचं, असा प्रश्न पडला होता. पण सरांनी एक कागद घेतला, त्यावर चौकोन काढला. ‘यातून काही दिसतंय का?’ असं म्हणत विचारांना चालना दिली. अशा घटनांमधून पाहण्याचा दृष्टिकोन घडत गेला. कदम सरांच्या सौंदर्यशास्त्राच्या जाणीवा अतिशय प्रगल्भ होत्या. त्यांच्या सान्निध्यात विचारांना वेगळ्या दिशा मिळाल्या. रंगलेपन शिकत गेलो. रंग लोण्यासारखा लावायचा, असं ते सांगत. ते कधी वर्गात शिकवताना जागेवरून उठवायचे आणि स्वतः बसायचे. बदाबदा रंग ओतायचे. त्यावेळी पहिला विचार ‘रंग संपले’ हा असायचा. पण जेव्हा ते काम पूर्ण व्हायचं तेव्हाची अनुभूती महत्त्वाची असायची.

एकदा कार्ल्याला गेलो होतो. नदीच्या काठी बसून इतर विद्यार्थी चित्रं काढत होते. मी नदीत जाऊन उडी मारली. नदीचं नदीपण अनुभवायचं होतं. अनुभवल्याशिवाय चित्र कसं काढायचं, हा प्रश्न समोर होता. नदीत उतरल्यानंतरही तिथे बसून चित्र काढलंच नाही. दुसऱ्या दिवशी ते काम सादर करायचं होतं. मग रात्री घरी आल्यावर जाणिवेतून चित्र काढलं. मी बघून चित्र काढत नाही, आधी चित्र काढतो मग बघतो… हा प्रवास कदाचित इथूनच सुरू झाला. त्या चित्राची खूप प्रशंसा झाली, पुरस्कार मिळाला. कदाचित त्या चित्रातल्या भावना इतरांना भावल्या असतील. अमूर्ताकडे मी वळलो ते खूप नंतर. अमूर्त चित्रं ही नंतरची पायरी. त्या आधी चित्रं काढायला आवडायची हे महत्त्वाचं होतं. व्यक्तिचित्रणामध्ये हातखंडा होता. मला एकदा एका व्यक्तीचित्रणासाठी पुरस्कार मिळाला. ते जाऊन मी पळशीकरांना सांगितलं. तेव्हा त्यांनी विचारलं की, ‘पुरस्कार मिळाला म्हणजे तुला चित्रकला यायला लागली का?’ त्यांचा हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता. यातूनच स्वतःची शैली गवसते का, हे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला.
माझ्या आयुष्यात पळशीकरांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे.

माझ्या स्टुडिओमध्ये पळशीकरांचं मी केलेलं एक व्यक्तिचित्र आहे. त्यापासून मला आजही प्रेरणा मिळते. त्यांनी सांगितलेलं की, इफ यू वॉण्ट टू सी द सोल, लूक अॅट द सन. त्यांचं हे वाक्य ऐकून मी रोज बीडीडीच्या गच्चीत जाऊन सूर्याकडे पाहायचो. याचा गर्भितार्थ मला २५ वर्षांनी कळला. तो सूर्य आतच आहे हे कळलं. एकदा आम्हाला डोळे काढायला सांगितले. सगळ्यांनी एकसारखंच काम केलं. मला वाटलं काहीतरी वेगळं करू या. मग मी काहीतरी वेगळं काढलं आणि ते सरांना आवडलं. पण मला म्हणाले की, यावर अजून जरा काम कर. तेव्हा मी सावध झालो. सरांना काम तर आवडलं पण पूर्ण नाही आवडलं. मग मी संध्याकाळी बसून त्यावर अजून काय करता येईल हा विचार केला. मी यातून अधिक वेगळं काय करायचं असतं, असा विचार करायला शिकलो. मी पळशीकरांच्या घरी जायचो. त्यांचं काम पाहायचो. त्यांचं काम खूप सहज होतं. ते आत पाझरत गेलं. मग एका क्षणी वाटलं की, आपणही करू शकू असं. ते वर्गाला काम सांगायचे. आम्ही करायचो. मग ते पाहताना पळशीकर ‘असंच करत बसणार का’, असं विचारायचे आणि त्यातून दिशा मिळायची. त्यांनी कधीच ‘हे कर, ते करू नको’ असं सांगितलं नाही. मला मुळात वाचनाची आवड होती. पण पळशीकरांनी मला अधिक वाचायला शिकवलं. मी कविता वाचायचो. लिहायचोही. यातून, रंगलेपनातून काव्य जन्मलं असंही म्हणता येईल.

कॉलेजमध्ये मला जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा पंडोल कलादालनानं माझ्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्याची मला संधी दिली. मी हे पळशीकरांना जाऊन सांगितलं. तेव्हा म्हणाले, ‘तुला तुझं चित्र सापडलं का?’ ते म्हणाले, ‘आधी चित्रकार हो. चित्र काढायला शिक.’ हा खूप मोठा धडा होता. मी ते प्रदर्शन केलं नाही.

कॉलेजात असताना इतरांच्या चित्रांचा खूप प्रभाव पडत होता. पळशीकरांची चित्रंही आम्ही सतत पाहायचो. पण त्यांनीच एकदा ती चित्रं कुठेतरी उचलून ठेवली. आमच्यावर प्रभाव पडू नये, यासाठी त्यांचा प्रयत्न होता. पण आम्हाला ते पाहायला मिळालं म्हणून काय करायचं हे कळलं. आपल्याला काहीतरी वेगळं करायला हवं आहे, हे जाणवलं. यातूनच ‘मिसिंग सोल’ हे चित्र केलं. त्याला ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चं सुवर्णपदक मिळालं. या आधी पळशीकरांना हे सुवर्णपदक मिळालं तेव्हा त्यांनी ते वितळवून कन्येला चेन केली होती. मलाही तशीच चेन करायची होती. पण ते सुवर्णपदक वडिलांनी स्वतःकडे ठेवलं होतं. त्यांना जेव्हा मी माझा मानस सांगितला तेव्हा ते म्हणाले ‘तू आधी पळशीकर हो…’ त्यावेळी जाणवलं की, मी अजून कुठेच पोहोचलेलो नाही. पारितोषिक मिळणं म्हणजे सार्थक झालं असं नाही.

मी १९९४ पर्यंत जेजेमध्ये शिकवत होतो. या शिकवण्यात काही प्रयगो केले. पाश्चिमात्य देशातील हॅपनिंग हा प्रकार विद्यार्थ्यांना शिकवला. आजही मला विद्यार्थ्यांमध्ये रमायला आवडतं.

पळशीकरांच्या प्रभावाचं एक उदाहरण मला आठवतंय. मी एका बोटीवरच्या कमांडरचं व्यक्तिचित्र काढलं. केमोल्डमध्ये ते चित्र मी फ्रेम करायला दिलं. पळशीकर तिथेच चित्रं फ्रेमिंगसाठी द्यायचे. त्यांनी माझं चित्र पाहिलं आणि विचारणा केली. ते व्यक्तिचित्रं त्यांच्याच शैलीत काढलं होतं. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्याबद्दल विचारलं आणि ‘व्यक्तिचित्रं काढत राहा’ असं सांगितलं. पण इतर चित्रं काढण्यात मग्न असताना मी व्यक्तिचित्रं रोज काढत नसे. त्यांना मात्र ‘हो काढतो’ असं सांगितलं. एक दिवस मला वाटलं की ते माझ्याकडे ही चित्रं पाहायला मागतील. मग मात्र मी ४५ दिवस बसून ही चित्रं पूर्ण केली. या चित्रांचं प्रदर्शन केलं. पण तेव्हा पळशीकर हयात नव्हते. त्यांचं एका अपघातात निधन झालं. त्यांना श्रद्धांजली म्हणून मी या चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं.

मी १९७२ पासून सेमी रिअॅलिझमकडे वळलो. पॉल क्लीचा तेव्हा पगडा निर्माण झाला होता. क्ली वाचल्यावर, त्यांचं काम पाहिल्यावर प्रभाव न पडणं अशक्यच होतं. मग मला माझं काहीतरी असावं, असं वाटायला लागलं. १९८४ नंतर माझी चित्रभाषा बदलली. प्रकाश, रेषा, रंग, कवडसे, मातीचे रंग, अवकाशात तरंगताना काही दिसणं हे सारं चित्रात आलं. ही शैली पळशीकरांनी पाहिली होती. त्याची प्रशंसाही केली होती. त्यांनी यासाठी लिहिलेलं पत्र आजही माझ्यासाठी खूप खास आहे. मी काढलेलं चित्र मला सांगतं की ते पूर्ण झालं. ते संपलं की माझा आणि त्याचा संबंध संपतो. आधीचं चित्र माझा पाठलाग करत नाही. तिथून नवीन प्रवास सुरू होतो. प्रत्येक चित्रातून असा नवीन प्रवास घडत जातो. कोलतेंची म्हणून ही शैली प्रसिद्ध झाली तेव्हा इतरांवर त्याचा प्रभाव दिसला. पण मी आजही विद्यार्थ्यांना सांगतो की प्रभाव असला तरी मी त्यांच्या कामात दिसता कामा नये. त्या चित्रात तो विद्यार्थीच असला पाहिजे. मला जे विद्यार्थी मिळाले ते माझं भाग्यच आहे, असं मला वाटतं.

आता चित्रकलेसाठी ठरावीक वेळ द्यायची भानगड संपली. मला वाटतं तेव्हा मी काम करतो. दिवसाचे २४ तास माझे असतात. ठरवून काहीच करत नाही. मनात आलं की करतो. कॅनव्हास लावलेला असतो. तिथे चित्र काढायलाच हवं, असं नाही. खूप दिवस तो कॅनव्हास कोरा असतो. मग कधीतरी तो रंगून जातो. हाच रंग हवा, तोच रंग वापरायचा असं काहीच नसतं. सुरुवात एका रंगाने केली तरी तो रंग शेवटी दिसेल असंही नाही. मी खूप प्रयोग केले. कॅनव्हास धुण्यापासून लाथाडण्यापर्यंत प्रयोगातून चित्र घडत गेलं आहे. जेजेच्या इमारतीन मला खूप काही दिलं. कदम, शोलापुरकर, पळशीकर इथे विद्यार्थ्यांशी गप्पा मारत बसायचे. कविता, उतारे वाचले जायचे. कधी मी गाणं म्हणायचो. माझी कविता वाचायचो. जे. कृष्णमूर्ती कळत नव्हते तेव्हा पळशीकर सांगायचे ‘ते कानावरून जाऊ दे.’ अशा अनेक कानावरून गेलेल्या गोष्टी आत पाझरत गेल्या आहेत. त्या चित्रातून उमटत राहतात. सहा दशकांचा हा प्रवास झाला आहे; पण मी अजूनही भरलेला आहे. रितं काहीच झालं नाही. हा प्रवास पूर्ण होणार नाही. सुरूच राहणार…
—————————–
(शब्दांकन : अनुजा चवाथे)

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत