Headlines

Phu Quoc Island Accident : व्हिएतनाममध्ये 15 भारतीय पर्यटकांचा बुडून मृत्यू, फु क्वोक बेटाजवळ स्पीडबोट उलटून दुर्घटना


Indian tourists boat capsized in Vietnam : व्हिएतनाममधील ‘फू क्वोक’ बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून भीषण अपघात झाला

Indian tourists boat capsized near Phu Quoc Island in Vietnam Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : व्हिएतनाममधील फु क्वोक बेटावर (Phu Quoc Island) ३२ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट उलटून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत किमान १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने ‘एक्स’ सोशल मीडिया हँडलवर दिलेल्या माहितीनुसार ते स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. स्थानिक वेळेनुसार शनिवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने ‘एक्स’वर म्हटल्याप्रमाणे एका दुर्दैवी घटनेत, काही तासांपूर्वी व्हिएतनाममधील ‘फू क्वोक’ बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली आहे. स्थानिक प्रशासनाकडून शोध आणि बचाव कार्य सुरु असून, या घटनेचा सविस्तर तपशील मिळवण्याचे काम चालू आहे. अपघातग्रस्त बोटीत ३२ पर्यटक आणि चार क्रू मेंबर होते. त्यापैकी किमान १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून इतरही काही जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मदत कक्ष स्थापन

पीडित कुटुंबांना माहिती आणि मदत पुरवण्यासाठी, हो ची मिन्ह सिटी येथील ‘कॉन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया’मध्ये (भारतीय वाणिज्य दूतावास) एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाशी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल:
+84 36 281 7930,
+84 91 552 37 14
आणि
+84 33 452 0414.

तसेच, हनोई येथेही एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, तिथे +84 91 308 9165 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. कोणत्याही मदतीसाठी किंवा चौकशीसाठी आम्ही उपलब्ध आहोत.

पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

फु क्वोक बेटाला पर्ल आयलंड किंवा ‘मोत्याचे बेट’ म्हणूनही ओळखले जाते. हे व्हिएतनामचे सर्वात मोठे बेट आहे. थायलंडच्या आखातात वसलेले हे बेट, आपल्या पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यांसाठी, स्फटिकासारख्या स्वच्छ नीलमणी रंगाच्या पाण्यांसाठी आणि विशाल सागरी संवर्धन क्षेत्रांसाठी प्रसिद्ध आहे. बेटाचा अर्ध्याहून अधिक भाग युनेस्कोच्या संरक्षित बायोस्फीअर रिझर्व्हने व्यापलेला आहे. तिथे हिरवीगार जंगले आणि जागतिक दर्जाचे भव्य रिसॉर्ट्स आहेत. हे पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत असतात. फु क्वोक बेटाला भेट देणाऱ्या प्रवाशांमध्ये भारतीयांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा