Headlines

63, 60, 39, 38, 33… शेवटच्या सामन्यात इंग्लंडने भारताच्या गोलंदाजांचा धूरच काढला; आता 258 धावांचा डोंगर पार करणार?


IND vs ENG 5th T20 News : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ व्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय बॉलर्सची पार हवा काढलीये. पहिल्या डावात इंग्लंडने २५८ धावांचा महाकाय डोंगर उभा केला असून भारताला केवळ ३ विकेट्स मिळाल्या. आता भारताची इभ्रत वाचवण्यासाठी फलंदाजांना चमत्कार करावा लागेल.

IND vs ENG 5th T20 Match Updates
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी-२० इंटरनॅशनल सामना आज साउदम्पटनच्या मैदानावर खेळवला जातोय. या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस जिंकून आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय पुरता अंगाशी आलाय. कारण पहिल्या डावात इंग्लंडच्या बॅट्समननी भारताच्या बॉलर्सची पार हवाच काढली आहे. इंग्लंडने २० ओव्हर्समध्ये ३ विकेट्स गमावून तब्बल २५७ धावांचा महाकाय डोंगर उभा केला असून भारतासमोर २५८ रन्सचे कठीण आव्हान ठेवले आहे.

लागोपाठच्या पराभवानंतर या शेवटच्या सामन्यात भारताच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण प्रभावी कामगिरी करण्यात आताही टीमला यश मिळालेले नाही. आता सर्वांचे लक्ष भारतीय फलंदाजांकडे लागले आहे. एवढ्या मोठ्या रन्सना चेज करण्यासाठी कोणालातरी आज ऐतिहासिक खेळी करावीच लागेल.

बटलर आणि ब्रूकचे वादळ, भारतीय बॉलर्सची पार धुलाई

इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. फिल साल्टला अवघ्या ६ रन्सवर प्रसिद्ध कृष्णाने आऊट केले. पण त्यानंतर जोस बटलर आणि हॅरी ब्रूक या जोडीने भारतीय बॉलर्सचा पार खुर्दा उडवला. बटलरने अवघ्या ६४ बॉल्समध्ये १२ फोर आणि ८ सिक्स ठोकून १३१ रन्सची तुफानी इनिंग खेळली. त्याला कॅप्टन हॅरी ब्रूकने जबरदस्त साथ दिली. ब्रूकने ४५ बॉल्समध्ये ४ फोर आणि ८ सिक्सच्या मदतीने नाबाद ९५ रन्स कुटले.

भारताकडून प्रिन्स यादवने ४ ओव्हर्समध्ये ६० रन्स आणि अक्षर पटेलने ४ ओव्हर्समध्ये ६३ रन्स मोजले. पदार्पण करणाऱ्या सूर्यांश शेडगेला ३ ओव्हर्समध्ये ३९ रन्स पडले. अखेरच्या ओव्हरमध्ये आलेल्या शिवम दुबेने २२ रन्स देऊन जोस बटलर आणि जेकब बेथेल (०) यांना आऊट केले. भारताला या डावात फक्त ३ विकेट्स काढता आल्या, ज्यातील २ विकेट्स दुबेने आणि १ विकेट प्रसिद्ध कृष्णाने घेतली.

फ्लॉप ठरलेल्या वैभवचा पत्ता कट, संजू सॅमसनची एन्ट्री

या सामन्यात टीम इंडियामध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. गेल्या काही मॅचेसपासून सातत्याने फ्लॉप ठरलेल्या आणि प्रचंड चर्चेत आलेल्या वैभव सूर्यवंशीला अखेर प्लेइंग-११ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याच्या जागी फॅन्सचा लाडका खेळाडू संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. संजूला या सामन्यात आता भारताच्या डावामध्ये प्रभावी कामगिरी करण्याची मोठी संधी आहे. दरम्यान, वैभवशिवाय वॉशिंग्टन सुंदरच्या जागी सूर्यांश शेडगेला संघात स्थान मिळाले आहे.

आता २५८ रन्सचे आव्हान पार करताना भारताचे बॅट्समन आपली इभ्रत वाचवण्यात यशस्वी ठरतात का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा