Headlines

Philippines: तगालू भाषेत बोलणाऱ्यांचा देश – telugu speaking country philippines


-शफाअत खान

मी सध्या भारतापासून दूर फिलिपाइन्स नावाच्या देशात आलो आहे. सतत प्रवास आणि अभ्यास सुरू आहे. प्रवासाच्या दगदगीने थकवा आला आहे. मागच्या खेपेस प्रवासवर्णन रचावे म्हणून उत्साहाने जुळवाजुळव करून ‘तिरपा कटाक्ष’ लिहायला बसलो. पण सुरुवात कशी करावी ते कळेना. बराच विचार केला. शेवटी सुरुवातीपासूनच सुरुवात करावी, असे ठरवले. घर ते मुंबई विमानतळापर्यंतच्या प्रवासाने सुरुवात केली; पण प्रवासवर्णनाची गाडी पुढे सरकली नाही. त्यातून मुंबईच्या टॅक्सी ड्रायव्हरने घात केला. त्याने गंडवले नाही. तो विनाकारण खूप चांगला वागला. मी त्याला मीटरप्रमाणे पैसे दिले. तो वरचे सुटे पैसे परत करू लागला. मी उदार मनाने त्याला ‘असू द्या…’ म्हणालो. पण तो दुप्पट उदार मनाने ‘राहू द्या… लांबचा प्रवास आहे. रस्त्यात लागतील,’ असे म्हणाला. गदगदून आले. आता माणसे अशी वागू लागली तर लेखकाने लिहायचे तरी काय, या भल्या माणसांचे करायचे तरी काय, असा प्रश्न पडतो. लेखनसंन्यास घ्यावा, असे मनात येत राहते.

फिलिपाइन्स हा सुमारे सात हजार छोट्या-मोठ्या बेटांनी तयार झालेला देश आहे. इथल्या फक्त दोन हजार बेटांवरच मनुष्यवस्ती आहे, असे म्हणतात. मी फक्त मनुष्यवस्ती असलेल्या दोन-चार बेटांवर जाऊन आलो. तिथला निसर्ग बघितला. आपला एखादा मराठी निसर्गकवी इथे आला तर दोन-चार कवितासंग्रहांचा ऐवज त्याच्या हाती लागू शकेल, असे वाटले.
इथले समुद्रकिनारे स्वच्छ आहेत. समुद्राने नुकतीच आंघोळ केली असावी, असा भास होतो. किनाऱ्यावर कचरा नाही. भेळवाले नाहीत. मालिशवालेही कुठे दिसत नाहीत. गोंगाट नाही. स्वच्छता आणि शांतता अंगावर येते. रस्ते मोठे आहेत. पण खड्डे नसल्यामुळे गचके बसत नाहीत. बिनगचक्यांच्या प्रवासाचा त्रास होतो. शरीर आळसावत जाते. भारतीय मनाला हळूहळू कंटाळा येऊ लागतो. जोरात किंचाळावे, अशी इच्छा होते. मनातल्या मनात किंचाळताही येत नाही. असो!

हा देश आपल्यापेक्षा गरीब आहे, असे म्हणतात; पण इथली माणसे आनंदित दिसतात. मजेत राहतात. इथे ज्येष्ठ नागरिकांना सर्व वस्तूंवर वीस टक्के सवलत आहे. लहान-मोठ्या हॉटेलांत, बारमध्येही सवलत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक कसलाही ताण न घेता निवांत खात-पित बसलेले दिसतात. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक सतत इतरांना उपदेश करून त्यांचे जगणे असह्य करून टाकतात. त्यांना आवरता येत नाही. आपल्याकडेही वीस टक्के सवलतीचा विचार तत्काळ व्हायला हवा. समाजात शांतता नांदावी, सलोखा वाढावा म्हणून ते आवश्यक आहे, असे वाटते.

इथे गोरगरिबांनाही स्वस्तात शुद्ध दारू उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे गरीबही आनंदात दिसतात. संध्याकाळ झाली की दारू चढलेले सगळे सत्तेच्या बाजूने बोलतात. सत्तेचा जयजयकार करतात. जनतेने सत्तेच्या विरोधात बोलू नये म्हणूनच दारू स्वस्त आहे, असे न पिणारे काही जण म्हणतात.

आपल्याकडेही असा प्रयोग करून बघायला हरकत नाही, असे वाटते. चौकशी केल्यावर आपल्याकडे या विषयावर बराच अभ्यास झाला आहे, असे कळले. आपला समाज वेगळा आहे. आपली विचार करण्याची पद्धतही वेगळी आहे. इथे यथेच्छ फुकट पिऊन पाजणाऱ्यालाच शिव्या घालायची पद्धत आहे. त्यामुळे स्वस्त दारूचा विचार मागे पडला, असे म्हणतात. आता नव्याने काही गुप्त गोष्टी कानावर आल्या आहेत. बाजारात नवीन महागडी, उंची दारू आली आहे. त्यात लाचारीचे रसायन मिसळलेले असते. पटकन झिंगायला होते. ही दारू बंडखोराला नाचवते. बंडखोर बरळतो; पण त्या बरळण्याला विचार समजून लोक डोक्यावर घेतात. झिंगलेले बंडखोर आनंदाने उड्या मारून दुसऱ्या पक्षात जातात. दुसऱ्या पक्षातले तिसऱ्या पक्षात घुसतात. कोण कुठला कळत नाही. हीच तर नव्या दारूची खरी गंमत आहे. असो!

फिलिपाइन्समध्ये लोक तगालू भाषेत बोलतात. अनेकदा ते बोलतात की गातात, हे कळत नाही. मीदेखील त्यांच्याशी संवाद साधतो. आता गाऊन बोलणे मलाही जमू लागले आहे. मला तगालू कळत नाही. पण तगालूतून बोलणे सुरू झाले की मी खी-खी किंवा खो-खो करून हसतो. परवा तिथला एक जण तगालूत बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. मी खी-खी, खो-खो करत संवाद सुरू ठेवला. शेवटी तर मी हसून-हसून गडाबडा लोळलो. तो गेल्यावर, तो त्याची आई खूप आजारी असल्याचे सांगत होता, असे कळले. त्यावरही मी हसलो. आता आपण हसणे थांबवता कामा नये, एवढे मी शिकलो आहे. खो-खो, खी-खीला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यावा, असे वाटते.

फिलिपाइन्समध्ये अनेक वर्षांपासून इथेच स्थायिक झालेले अनेक भारतीय आहेत. ते उत्तम तगालू बोलतात. शिवाय आपली पंजाबी, सिंधी भाषाही बोलतात. त्यांना इथले स्थानिक लोक ‘फाइव्ह-सिक्स’ असे म्हणतात. नावाचे कुतूहल वाटले म्हणून चौकशी केली. बरीच माहिती मिळाली.

‘फाइव्ह-सिक्स’ लोक सकाळी बाजार भरण्यापूर्वी बाजारात किरकोळ धंदा करणाऱ्यांना भांडवल पुरवतात. सकाळी पाच रुपये देऊन संध्याकाळी बाजार उठण्यापूर्वी सहा रुपये वसूल करतात, असे कळले. त्या लोकांना इथले गरीब लोक घाबरतात. आता ‘फाइव्ह-सिक्स’ तिथल्याच स्त्रियांशी लग्न करून तिथलेच होऊन गेले आहेत. त्यांनी बंगले उभारले आहेत. तिथल्या लोकांनी माझ्याकडे भारतातल्या फाइव्ह-सिक्सांची चौकशी केली.

‘भारतात फाइव्ह-सिक्सची पद्धत नाही. पण सकाळी पाचशे रुपये घेऊन संध्याकाळी हातावर पाच रुपये ठेवणारे लोक भारतात आहेत. ते बाजारात उभे नसतात, ते राजकारणात असतात. त्यांचा सन्मान करण्याची पद्धत आमच्याकडे आहे,’ अशी माहिती मी त्यांना पुरवली. हे ऐकल्यावर तिथल्या लोकांना विशेष आनंद झाला. आपण सुखात आहोत, असे वाटून ते रात्री दोन घोट जास्त प्यायले.

आपल्या देशात गोंधळ सुरू आहे आणि आपण देशाबाहेर आहोत, त्याचे वाईट वाटते. मी इथे बसून सतत बातम्या बघतो आहे. मी मनाने जंतरमंतरवरच आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बडवणारे पोलिस बघून यातना होतात. आपल्याच मुलांचे हात-पाय तोडणाऱ्या पोलिसांची दया येते. माणसातला माणूस मरणे यापेक्षा भयंकर दुसरे काही असू शकत नाही. मी फोनवर काही लेखक मित्रांशी बोललो. ते मुलांच्या असभ्य भाषेवर, त्यांच्या अश्लील घोषणांवर, त्यांच्या कपड्यांवर, विनोदांवर बोलत होते. लेखक, कलावंतांमधला माणूस मरणे हे तर जास्तच भयंकर आहे. आंदोलनातली काही चित्रे मनात रुतून बसली आहेत.

मुंबईत पोलिस व्हॅन अडवणारी मुलगी, पोलिसांसमोर उभा राहून हसत-हसत लाठ्या झेलणारा तरुण आणि शेवटी आपल्याच जीवावर उठलेल्या पोलिसांना फुले देणारी मुले बघितली की, या पिढीत गांधी झिरपला, याचा आनंद होतो. पुढचा दरवाजा बंद केला की गांधी मागच्या दाराने आत शिरतो. गांधी मागच्या पिढीची गोची करतो. काळजी घ्या. चीअर्स…

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत