Headlines

Parbhani Mayor Election Sayyed Iqbal Khawja Uddhav Thackeay led Shiv Sena UBT won; परभणीच्या महापौरपदी ठाकरेसेनेचे इकबाल सय्यद, काँग्रेसच्या साथीने सत्ता, भाजप उमेदवाराचा पराभव


Parbhani New Mayor Election : तेरा मतांनी विजय मिळवत ठाकरेसेनेचे इकबाल सय्यद परभणीच्या महापौरपदी विराजमान झाले आहेत.

Parbhani Mayor Maharashtra Times
धनाजी चव्हाण, परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आज संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार इकबाल सय्यद विजयी झाले आहेत. मतदानामध्ये इकबाल सय्यद यांना 65 पैकी 39 मते मिळाली असून त्यांच्या विरोधात भाजपच्या तिरूमला खिलारे यांना 26 मते मिळाली आहेत. तेरा मतांनी विजय मिळवत इकबाल सय्यद परभणीच्या महापौरपदी विराजमान झाले आहेत.

चंद्रपूर सारखं परभणीमध्ये देखील भाजपकडून फोडाफोडीचा राजकारण करण्यात आलं होतं, पण याला मात्र महाविकास आघाडीने कसल्याही प्रकारचा थारा दिला नाही. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेवटपर्यंत एकत्र राहिले आणि त्याचाच परिणाम होऊन परभणी महापालिकेत पहिल्यांदाच शिवसेनेचा महापौर विराजमान झाला आहे. राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांना अपयश आलं तरी परभणीत मात्र उद्धव ठाकरेंचा महापौर बसल्याने पुन्हा एकदा परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे.

काय झालं महापौर निवडणुकीत?

परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर 65 पैकी तब्बल 25 जागा जिंकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्या पाठोपाठ काँग्रेस 12, भारतीय जनता पक्ष 12, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 11 आणि जनसुराज्य पक्ष तीन, यशवंत सेना एक आणि अपक्ष एक असे 65 नगरसेवक या महापालिकेत निवडून आले होते. निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने युती करून परभणी शहर महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती आणि तब्बल आघाडीने 37 जागा जिंकून बहुमत सिद्ध केले होते. 65 सदस्य असलेल्या या सभागृहात 33 हा बहुमताचा आकडा हा शिवसेना आणि काँग्रेसने ओलांडला होता आणि त्यांचाच महापौर उपमहापौर बसेल हे मात्र आधीच ठरले होते.

काँग्रेस पक्ष बुडवण्याची कृती राष्ट्रहितासाठी पुढे न्या, हर्षवर्धन सपकाळांना मुनगंटीवारांचा टोला

14 जणांचे उमेदवारी अर्ज

पण चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आल्यानंतर देखील महापौर पद मिळू न शकल्यामुळे परभणीतही भाजप काहीतरी प्रयोग करील अशी अपेक्षा होती आणि त्यामुळेच कालपासून परभणी महापालिका कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली होती. आज महापौर पदाची निवड संपन्न झाली. महापौर पदासाठी तब्बल 14 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी बारा जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
Maharashtra TimesRajendra Janjal : संजय शिरसाटांना लेकीला उपमहापौर करायचं होतं, म्हणून मला विरोध; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
शिवसेना आणि काँग्रेसकडून इकबाल सय्यद तर भाजपकडून तिरूमला खिल्लारे या दोघांचेच उमेदवारी अर्ज राहिले आणि या दोघांमध्ये लढत झाली. तिरूमला खिल्लारे यांना भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि जनसुराज्य पक्षाची एकूण 26 मते मिळाली त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार इकबाल सय्यद यांना काँग्रेस आणि शिवसेनेची मिळून 38 मते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अक्षय देशमुख यांचे एक मत मिळाल्याने सय्यद इकबाल यांना तब्बल 39 मध्ये पडली आणि त्यांनी तिरूमला खिल्लारे यांचा 13 मतांनी पराभव केला.
Maharashtra TimesAir India Crash : पायलटने मुद्दाम विमान पाडलं? इंधन स्वीच जाणुनबुजून बंद केलं, तपास अहवालात धक्कादायक निष्कर्ष असल्याचा दावा

ठाकरेसेना खासदार-आमदाराचे यश

राज्यामध्ये शिवसेनेची पडझड सुरू असताना देखील परभणीच्या महापालिकेत मात्र ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आपला करिष्मा दाखवला आहे. परभणीच्या महापौरपदी शिवसेनेचा आणि तोही मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचा चेहरा बसवून राज्याला एक वेगळाच संदेश देण्याचे काम करण्यात आले आहे. खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यातील एकोप्याने हा सर्व करिष्मा घडला असल्याचे आता बोलले जात आहे भाजपने कितीही प्रयत्न केले तरी मात्र महापौर पदांमध्ये कसल्याही प्रकारचा बदल भाजप घडवून आणू शकला नाही.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा